नूंह (मेवात) येथील भीषण दंगलीनंतर तेथे वार्तांकनासाठी गेलेले ‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीचे पत्रकार आणि निवासी संपादक मुकेश कुमार यांना पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली आहे. प्रारंभी ‘मुकेश कुमार यांचे काही गुंडांनी अपहरण केले आहे’, अशा बातम्या होत्या. त्यांना कह्यात घेतल्यानंतर ७ घंट्यांनी गुरुग्राम पोलिसांनी त्यांच्या अटकेविषयी प्रसिद्धीपत्रक काढले. या प्रसिद्धीपत्रकात पोलिसांनी म्हटले आहे, ‘मुकेश कुमार यांनी असत्य, भ्रामक ट्वीट केल्यामुळे त्यांना अटक केली आहे.’ याविषयी ‘सुदर्शन न्यूज’चे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी माहिती देतांना सांगितले, ‘पोलिसांनी ‘राष्ट्रीय सुरक्षेला धोका’ या कलमाखाली आणि साध्या वेशात येऊन गुंडांप्रमाणे मुकेश कुमार यांना कह्यात घेतले, जे कायदाबाह्य आहे.’ या अटकेविषयी सुरेश चव्हाणके यांनी काही प्रश्न विचारले आहेत. ‘मेवात येथे जिहाद्यांच्या झुंडीला अटक करण्यास घाबरणारे पोलीस एका पत्रकाराशी गुंडांप्रमाणे वर्तन का करतात ? हिंदु महिलांवर अत्याचार करणारे उजळ माथ्याने फिरत असतांना पत्रकाराच्या एका ट्वीटवरून लगेच अटक का ? या अटकेप्रकरणी राष्ट्रवादी पत्रकार गप्प का ? मेवातमध्ये हिंदुहिताची गोष्ट करणे चुकीचे आहे का ?’, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती चव्हाणके यांनी ट्वीट करून केली आहे. संबंधित निवासी संपादकाने एक ट्वीट केले होते, ज्यामध्ये ‘अल् झजिरा’ या वाहिनीने कतार येथून मेवातच्या पोलिसांना दंगलीच्या प्रकरणी हिंदूंवर कारवाई करण्यासाठी दबाव आणला’, अशा स्वरूपाची माहिती होती. या ट्वीटमुळे मुकेश कुमार यांना अटक केल्याचे म्हटले जाते. ‘या ट्वीटमधील माहितीविषयी पुरावे देण्यास सिद्ध आहे’, असे चव्हाणके यांनी ‘व्हिडिओ’ संदेशाद्वारे सांगितले आहे.
नूंह येथील हिंदूंच्या यात्रेवर धर्मांध मुसलमानांच्या आक्रमणानंतर तेथील परिस्थिती चिघळली होती आणि वातावरण संवेदनशील बनले होते. परिणामी पोलिसांनी ‘खोटी माहिती आणि प्रक्षोभक संदेश पाठवू नका’, असे आवाहन केले होते. पोलिसांनी असे आवाहन केले असले, तरी काही हिंदुद्वेषी वाहिन्यांनी असे चित्र रंगवले होते की, कारवाई केवळ मुसलमानांवर होत आहे. एका हिंदुद्वेषी वाहिनीने एका ठिकाणी मैदानात लागलेली आग दाखवून ‘गरीब मुसलमानांच्या झोपड्यांना आग लावली’, अशी बातमी दिली; पण प्रत्यक्षात त्या भागात भंगाराचे साहित्य, कचरा अशा गोष्टींना आग लागली होती. ‘सुदर्शन न्यूज’ वाहिनीने या खोटेपणाचा भांडाफोड केला. पोलिसांनी धर्मांधांची अनधिकृत दुकाने, घरे भुईसपाट करण्याची मोहीम हाती घेतल्यानंतर काही हिंदूंची दुकाने आणि घरे यांवरही कारवाई करण्यात आली, असे हिंदुत्वनिष्ठांनी सामाजिक माध्यमांद्वारे सांगितले. पोलिसांनी ही कारवाई का केली ? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का ? कि मुसलमानांचे मन सांभाळण्यासाठी केली ? हे लक्षात आले नाही. पोलिसांचा आतापर्यंतचा इतिहास असाच आहे की, दंगल कुणीही घडवू दे; पण कारवाई करतांना हिंदु आणि मुसलमान यांच्यावर केली जाते. यातून ‘आम्ही कुणाला पाठीशी घालत नाही’, असा संदेश द्यायचा असतो म्हणे; मात्र सर्वसामान्य लोकांमध्ये अयोग्य संदेशच जातो; कारण पोलिसांची कृतीच कायदाबाह्य असते.
पोलिसांची अकार्यक्षमता !
नूंह येथे धर्मांध आक्रमण करत असतांना पोलिसांनी सहस्रो हिंदूंना सुरक्षितरित्या धोकादायक भागातून बाहेर काढले, याविषयी त्यांचे कौतुकच आहे; मात्र हिंदूंविरुद्ध रचल्या जात असलेल्या एवढ्या मोठ्या कटाची कल्पना कशी आली नाही ? तसेच हरियाणाच्या गृहमंत्र्यांना नूंह येथे काय घडते आहे, याची कल्पना दुपारी ३ वाजेपर्यंत कशी दिली गेली नाही ? ही पोलिसांची अकार्यक्षमता नाही का ? ही गुप्तचर विभागाचे अपयश आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण करणारे उदाहरण नाही का ? आता काही माध्यमांनी तेथील धर्मांधांच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप प्रसारित केली आणि ज्यामध्ये ‘यात्रेत किमान २० ते ३० हिंदूंची हत्या करायची’, असे बिनदिक्कतपणे बोललेले आहे. त्याची पुसटशी कुणकुण पोलिसांना का लागली नाही ? यातून पोलीस झोपलेले होते आणि त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणार, यात शंकाच नाही.
‘सुदर्शन न्यूज’ वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी मेवात येथील हिंदूंवर होणारे अत्याचार, तेथील हिंदूंचे पलायन यांविषयी सत्य जाणून घेण्यासाठी २ वर्षांपूर्वी दौरा केला आणि हिंदूंची भीषण स्थिती १० कार्यक्रमांमधून देशाला लक्षात आणून दिली होती. खरेतर मेवातमधील सत्य परिस्थिती सुदर्शन वाहिनीवर दाखवल्यावर तरी पोलीस आणि प्रशासन यांनी कालबद्ध कृती ठरवून हिंदूंचे रक्षण केले पाहिजे होते; मात्र तसे का केले नाही ? याचे उत्तर पोलिसांनी दिले पाहिजे. त्यामुळेच परिस्थिती चिघळत गेली आणि धर्मांधांचे हिंदूंवर अतिशय नियोजनबद्ध, आधुनिक शस्त्रे घेऊन आक्रमण करण्यापर्यंत धाडस झाले आहे. ‘सुदर्शन न्यूज’ ही एक राष्ट्रप्रेमी वाहिनी असून त्यावर हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या बातम्या स्पष्टपणे, नेमकेपणाने दाखवल्या जातात. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या बातम्यांचा आधार घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. नूंह येथील आक्रमण हे हिंदु धर्म, हिंदु जनता, हिंदु महिला आणि हिंदूंचे अस्तित्व यांवरील आक्रमण आहे, हे पोलिसांनी लक्षात घ्यायला हवे. नूंह येथील आक्रमणात हिंदूंवर आक्रमण झाले असूनही ‘मुसलमान पीडित आहेत’, असे सांगण्याचा काही माध्यमांचा प्रयत्न झाला. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे का ? केली नसल्यास त्याचे कारण काय ?, हेसुद्धा हिंदूंना कळले पाहिजे; कारण यामुळे या आक्रमणाचे गांभीर्य, हिंदूंवर झालेले क्रूर अत्याचार यांची तीव्रता न्यून करण्याचा आणि काहीच झाले नसल्याचा देखावा निर्माण करण्यात हिंदुद्वेष्टे यशस्वी ठरतात. कारवाई करतांना पोलिसांनी या सर्व गोष्टींचा विचार केल्यास त्यांना दंगलीचे खरे गुन्हेगार सापडतील, यात शंकाच नाही.
दंगलीच्या प्रकरणात धर्मांधांऐवजी राष्ट्रप्रेमी पत्रकार आणि वाहिन्या यांवर केली जाणारी कारवाई निषेधार्हच ! |