गोवा : खाण क्षेत्रातील गावांतील नागरिकांची पुन्हा जनसुनावणी घेण्याची मागणी

वेदांता आस्थापनाच्या खाणींसाठी डिचोली येथे झाली जनसुनावणी

वेदांता आस्थापन, गोवा

डिचोली, ११ ऑगस्ट (वार्ता.) – सरकारने वेदांता आस्थापनाला ई-लिलावाच्या माध्यमातून लीज (लीज म्हणजे काही वर्षांसाठी भूमी वापरण्यास देण्याचा करार) परवाना दिला आहे. ४७८ हेक्टर भूमीत खाण व्यवसाय होणार आहे. यामुळे मुळगाव, मये, शिरगाव, डिचोली, बोर्डे आणि लामगाव या गावांवर त्याचा परिणाम होणार आहे. खाण व्यवसाय चालू असतांना शेती, बागायती, नैसर्गिक जलस्रोत कसे संकटात आले ? याचा अभ्यास करण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने खाणींमुळे परिणाम होणार्‍या परिसराची पहाणी करावी, लोकांच्या शंकांचे निरसन करावे आणि दिशाभूल थांबवावी, अशी आग्रही मागणी या परिसरातील नागरिकांनी ११ ऑगस्टला डिचोली येथे झांट्ये महाविद्यालय परिसरात झालेल्या जनसुनावणीच्या वेळी केली. जनसुनावणी पुन्हा घ्यावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली. वेदांता आस्थापनाला नव्याने खाण व्यवसाय चालू करण्यासाठी पर्यावरण दाखल्याची आवश्यकता असून त्यासाठी ही जनसुनावणी घेण्यात आली होती.

खाण व्यवसायाला विरोध नाही; पण सरकारने नागरिकांना विश्वासात घेतले नाही, अशी येथील लोकांची भावना आहे. ‘वेदांता आस्थापनाचे पर्यावरणीय अहवाल एकतर्फी आणि वस्तूस्थितीला धरून नाहीत’, असाही आरोप करण्यात आला. या वेळी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी मोहन गिरप आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे उपस्थित होते.

डिचोली येथील एका नागरिकाने म्हटले आहे की, येथील खाणीमुळे ६ समाजांवर परिणाम होणार आहे, तरीही वेदांताचा अहवाल स्थानिक भाषेत भाषांतर करण्याचे कष्ट सरकारने घेतलेले नाहीत. खाण व्यवसायाचे परिणाम काय होणार आहेत ? याविषयी नागरिक अनभिज्ञ आहेत. नागरिकांना अंधारात ठेवून खाण व्यवसाय रेटला जात आहे. गेल्या ५० वर्षांत खाणींमुळे सुपीक भूमी आणि जलस्रोत नष्ट झाले. त्यामुळे पुढील ५० वर्षांत आणखी किती हानी होईल ?, याची कल्पनाच करू शकत नाही.

शिरगाव येथील खाण व्यवसायामुळे लईराई मंदिरावर कोणताही परिणाम होणार नाही ! – खाण संचालनालय

खाण संचालनालयाने ११ ऑगस्टला शिरगाव येथील खाण व्यवसायामुळे येथील श्री लईराई देवस्थानवर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

संचालक डॉ. सुरेश शानभाग म्हणाले, ‘‘श्री लईराईदेवीचे मंदिर खाण पट्ट्यातच येते; पण ते पुष्कळ वर्षांपासून तेथे आहे. त्यामुळे मंदिराचा परिसर जसा आहे तसाच रहाणार आहे.’’