परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी आशीर्वाद दिल्‍याने ‘कविता आणि लेख लिहिणे’ यांद्वारे पू. शिवाजी वटकर यांनी केलेली लेखनसेवा !

सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास

‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने अध्‍यात्‍म शिकवून साधना आणि सेवा करून घेणे, तसेच ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना अपेक्षित अशी साधना होत नाही’, याविषयी पू. शिवाजी वटकर यांना वाटणारी खंत !’, यांविषयी आपण ११.८.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या भागात पाहिले. आज पुढील भाग पाहू.

(भाग १०)

भाग ९ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/709837.html

२३. असा झाला लेखनसेवेला आरंभ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२३ अ. इतर वर्तमानपत्रांनी अध्‍यात्‍मविषयक लिखाण छापण्‍यास टाळाटाळ करणे, तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी ‘आपण दैनिक चालू करू आणि तुमचे लिखाण प्रकाशित करू’, असे सांगणे : वर्ष १९९२ मध्‍ये मुंबई येथे प.पू. भक्‍तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा झाली. तेव्‍हा मी त्‍याविषयीच्‍या वार्ता आणि लेख इतर वर्तमानपत्रांत लिहून दिले होते. आरंभी इतर वर्तमानपत्रे मी लिहिलेले अध्‍यात्‍माविषयीचे लिखाण प्रकाशित करण्‍यास टाळाटाळ करत. तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टर मला म्‍हणाले, ‘‘आपणच दैनिक चालू करू. तेव्‍हा तुम्‍हाला लिहायचे आहे, तेवढे लिहा. आपणच ते प्रकाशित करू !’’ असा आशीर्वाद देऊन त्‍यांनी मला आश्‍वस्‍त केले.

नंतर वर्ष १९९८ मध्‍ये साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’ आणि वर्ष १९९९ मध्‍ये दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने त्‍यांसाठी वार्ता आणि लेख लिहिण्‍यास माझा आरंभ झाला.

२३ आ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी लेखनाला दिलेली दिशा : त्‍या वेळी गुरुदेवांनी माझ्‍या मनावर ‘सनातनचे साधक केवळ वार्ता लिहिणारे नसून वार्ता निर्माण करणारे कृतीशील साधक आहेत’, हे बिंबवले. ‘केवळ वार्तांकन न करता इतिहास घडवायचा आणि त्‍याचे लिखाण करायचे’, हे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी स्‍वतःच्‍या आचरणातून शिकवले.

२३ इ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी ‘लिखाण लिहून देणे’, हे समष्‍टी साधनेच्‍या दृष्‍टीने पुष्‍कळ महत्त्वाचे आहे’, असे मनावर बिंबवणे : आरंभी माझ्‍याकडून ‘मी आणि माझी सेवा’, असे होत होते. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी आम्‍हाला सांगितले, ‘‘एखादी सेवा केल्‍यावर ती सेवा करण्‍यासाठी केलेले प्रयत्न अन् शिकायला मिळालेली सूत्रे लिहून दिली, तर ती वाचून इतरांना शिकता येते. ती सर्व सूत्रे ग्रंथात प्रकाशित झाली, तर पुढील पिढ्यांसाठी त्‍यांचा उपयोग होऊ शकतो. यामुळे ‘लिहून देणे’, ही समष्‍टी साधना असून साधनेच्‍या दृष्‍टीने त्‍याला अधिक महत्त्व आहे.’’ असे सांगून त्‍यांनी लिहून देण्‍याचे महत्त्व माझ्‍या मनावर बिंबवले.

पू. शिवाजी वटकर

२३ उ. लिखाण करून देण्‍यामुळे झालेले लाभ

२३ उ १. लिखाण केल्‍यास साधकाला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा संकल्‍प आणि त्‍यांची चैतन्‍यशक्‍ती यांचा पूर्ण लाभ होत असणे : आरंभी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे आज्ञापालन करण्‍यासाठी मी लिखाण करत असे. ‘सेवा पूर्ण झाल्‍यावर त्‍या विषयीची सूत्रे त्‍वरित लिहून दिल्‍याने श्री गुरूंची चैतन्‍यशक्‍ती आणि संकल्‍पशक्‍ती यांचा लाभ होतो’, याची मला जाणीव झाली. ते लिखाण प्रकाशित झाल्‍यावर श्री गुरु कौतुक करून मला प्रसादरूपी आशीर्वादही देतात. परात्‍पर गुरु डॉक्‍टर हे चैतन्‍याची मूर्तीच आहेत. त्‍यांच्‍याकडून चैतन्‍याचा प्रचंड ओघ माझ्‍याकडे वहात रहातो. त्‍यांच्‍याकडून येणार्‍या चैतन्‍यशक्‍तीमुळे माझ्‍याकडून लिखाण आपोआप होते, म्‍हणजेच ते करून घेतात. आतापर्यंतच्‍या लिखाणातून हे माझ्‍या लक्षात आले आहे.

२३ उ २. लिखाण करतांना सतत परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या अनुसंधानात रहाता येणे; कारण तेच लिखाणाचा केंद्रबिंदू असणे : साधनेविषयी लिखाण करतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या अनुसंधानात रहाता येते; कारण ‘श्री गुरु’ हाच कृती आणि लिखाण करतांनाचा केंद्रबिंदू असतो. त्‍यामुळे माझ्‍याकडून श्री गुरुपादुका स्‍मरण आणि श्री गुरुस्‍मरण सतत होते. साधनेची कोणतीही कृती करतांना ती ‘श्री गुरु करून घेत आहेत, ती श्री गुरूंच्‍या समष्‍टी रूपासाठी आहे अन् ते माझ्‍यावर कृपेचा वर्षाव करत आहेत’, याची मला सतत अनुभूती येते.

माझ्‍यासारख्‍या रुक्ष व्‍यक्‍तीमत्त्वाला त्‍यांनीच भावपूर्ण लिखाण करण्‍यास शिकवले.

२३ ऊ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी लिखाणाचा केलेला गौरव !

२३ ऊ १. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी कविता वाचून काढलेले कौतुकोद़्‍गार ! : मी ‘परम पूज्‍य एके परम पूज्‍य’ ही पाढ्यावरची कविता, तसेच ‘गुरुस्‍मरण आणि अवतारस्‍तुती केल्‍यावर परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेली बाराखडी !’ या दोन कविता लिहिल्‍या होत्‍या. दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या अंकात दोन कविता प्रकाशित झाल्‍या. त्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी त्‍याविषयी पुढील चौकटही दिली होती.

 ‘आतापर्यंत साधकांनी माझ्‍यावर शेकडो कविता लिहिल्‍या आहेत; पण (पू.) श्री. शिवाजी वटकर यांनी केलेल्‍या दोन कविता कल्‍पनेच्‍या पलीकडच्‍या आहेत. संतांची प्रतिभा कशी असते, याचे हे एक अप्रतिम उदाहरण आहे. त्‍याबद्दल (पू.) श्री. शिवाजी वटकर यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’

– (परात्‍पर गुरु) डॉ. आठवले

२३ ऊ २. ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या स्‍मरणातील परमानंद !’, या लेखाविषयी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी केलेला गौरव ! : दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या स्‍मरणातील परमानंद !’ हा माझा लेख प्रकाशित झाला होता. त्‍या लेखाच्‍या निमित्ताने परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी पुढील चौकट दिली होती.

 ‘मी ‘गुरूं’वर ग्रंथ लिहिले आहेत; पण त्‍या ग्रंथांतील उणीव (पू.) श्री. शिवाजी वटकर यांच्‍या लेखामुळे भरून निघाली आहे. मी हा लेख ग्रंथांच्‍या पुढच्‍या आवृत्तीत घेणार आहे. इतका तो चांगला आहे.’

– (परात्‍पर गुरु) डॉ. आठवले

२४. जातीभेदाचा कलंकच पुसून टाकणार्‍या सनातन संस्‍थेचा स्‍वतःला अनुभव आल्‍यावर जातीविषयक संवेदनशील विषयावरही लिखाण करता येणे 

२४ अ. सनातन संस्‍थेवर जातीवादाचे केले जाणारे आरोप चुकीचे असून येथे सर्व जातीधर्मांचे साधक एकमनाने साधना करत असणे : काही बुद्धीप्रामाण्‍यवादी, धर्मद्रोही आणि पुरोगामी यांचा ‘सनातन संस्‍थेमधे ब्राह्मणांचा भरणा असून तिथे जातीवादाला प्राधान्‍य दिले जाते’, असा आरोप आहे. प्रत्‍यक्षात सनातन संस्‍थेमध्‍येे विविध जातीधर्मांचे साधक एकमनाने साधना करत आहेत. यापूर्वी सनातन संस्‍थेत साधना करणार्‍या काही साधकांची जातीविषयक सूची दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रकाशित केली होती. माझा जन्‍म मागासवर्गातील जातीमध्‍ये झाला आहे. कर्मधर्मसंयोगाने मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांमुळे सनातन संस्‍थेच्‍या संपर्कात आलो आणि माझ्‍या जीवनाला कलाटणी मिळाली. त्‍यामुळे मला न सुटणारे जातीवर्णाचे कोडेही कायमचे सुटले.

२४ आ. सनातन संस्‍थेमध्‍ये कुठलाही जातीभेद नसून ‘एक साधना करणारा जीव’ या दृष्‍टीने प्रत्‍येक साधकाकडे पाहिले जाणे : आरंभापासून म्‍हणजे वर्ष १९८९ पासून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी किंवा संस्‍थेतील साधकांनी ‘मी कोणत्‍या जातीचा आहे ?’, याविषयी मला कधीही विचारले नाही. त्‍यांनी मला जातीवरून कधी सवलत दिली नाही किंवा माझ्‍यावर अन्‍यायही केला नाही. त्‍यांनी मला मानसिक स्‍तरावर न पहाता ‘साधना करणारा जीव’, या भावाने आध्‍यात्मिक स्‍तरावर सांभाळले. सनातन संस्‍थेत ‘साधना करणारा जीव’ एवढे एकच आत्मिक नाते असते. सनातन संस्‍थेचे सर्व संत आणि साधक हे मायेतील नातलगांच्‍या ऐवजी आत्‍मलग आहेत.

सनातन संस्‍थेनेे माझ्‍यावरील जातीभेदाचा कलंक पुसून माझ्‍याकडून चातुर्वर्णानुसार साधना करून घेतली आणि मला मोक्षाच्‍या मार्गावर नेले. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने मला ‘जातीभेद’ या संवेदनशील विषयावर लेख लिहिता आले. त्‍यांनी मला जातपात, स्‍वार्थ आणि माया यांच्‍या चिखलातून बाहेर काढले अन् मला आत्‍मविकासाची संधी दिली. त्‍यांनी त्‍यांच्‍या अध्‍यात्‍म आणि धर्मप्रचार या कार्यांत मला केवळ सहभागीच करून घेतले नाही; तर माझा आत्‍मविकास करून घेऊन माझी आध्‍यात्मिक प्रगतीही केली आहे.

(क्रमशः)

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.५.२०२०)


भाग ११ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/710745.html