हिंदुद्वेष्‍टे चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांनी काढलेल्‍या हिंदु देवतांच्‍या विडंबनात्‍मक चित्रांचे प्रदर्शन, तसेच विक्री रोखून धर्मरक्षण करणारे पू. शिवाजी वटकर !

सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास

आतापर्यंतच्‍या भागांत आपण पू. शिवाजी वटकर यांनी केलेले साधनेचे प्रयत्न, त्‍यांना आलेल्‍या अनुभूती, तसेच परात्‍पर गुरु डॉक्‍टरांकडून त्‍यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्‍यांनी अनुभवलेली अपार गुरुकृपा यांविषयीची सूत्रे पाहिली. आजच्‍या भागात आपण पू. शिवाजी वटकर यांनी धर्मरक्षणासाठी केलेले प्रयत्न जाणून घेणार आहोत.

(भाग ११)

भाग १० वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/710218.html

२५. हिंदु जनजागृती समितीच्‍या माध्‍यमातून केलेले धर्मरक्षणाचे कार्य !

पू. शिवाजी वटकर

‘वर्ष २००२ मध्‍ये ‘हिंदु जनजागृती समिती’ची स्‍थापना झाल्‍यावर धर्मजागृती, धर्मरक्षण आणि राष्‍ट्ररक्षण या विषयांच्‍या अनुषंगाने मी ‘समन्‍वयक’ म्‍हणून कार्य करू लागलो. त्‍या वेळी अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना, राजकीय पक्ष, राजकारणी, लोकप्रतिनिधी, तसेच उद्योगपती यांच्‍याशी माझा संपर्क होऊ लागला. मला शंकराचार्य, संत, धर्माचार्य, संप्रदायांचे प्रमुख, तसेच प्रवचनकार आणि कीर्तनकार यांना भेटण्‍याची संधी मिळाली. या सेवेच्‍या निमित्ताने माझा पोलीसयंत्रणा, सरकारी यंत्रणा, प्रतिष्‍ठित व्‍यक्‍ती, व्‍यापारी इत्‍यादींशी जवळून संबंध आला. जणूकाही यातून ‘देवाने मला समष्‍टी सेवेचे प्रशिक्षणच दिलेे’, असे मला वाटते. यातूनच नंतर विविध माध्‍यमांतून होणारे देवतांचे विडंबन, तसेच धर्महानी थांबवणे, यांविषयीचे जनजागृती कार्य आणि मोहिमा चालू झाल्‍या.

२५ अ. हिंदु देवतांचे विडंबन करणार्‍या मकबूल फिदा हुसेन यांच्‍या चित्रांचे प्रदर्शन आणि विक्री यांना विरोध करणे

२५ अ १. हुसेन यांच्‍या चाहत्‍या चित्रकारांची अनुभवलेली अयोग्‍य मानसिकता ! : ‘आम्‍ही हुसेन यांच्‍या चित्रप्रदर्शनाला विरोध करत असतांना काही चित्रकारांनी मला सांगितले, ‘‘माननीय एम्.एफ्. हुसेनसाहेब आमचे दैवत आहेत. आम्‍ही त्‍यांना फार मानतो; कारण त्‍यांनी भारतीय चित्रकला जगभर पसरवली आणि भारताची मान उंचावली. त्‍यांनी पान खाऊन भिंतीवर थुंकले, तरी त्‍याचे चित्र तयार होते. त्‍यांनी रेखाटलेल्‍या चित्रांना लाखो नाही, कोट्यवधी रुपये किंमत येते. त्‍यांच्‍यामुळे आम्‍हा चित्रकारांचा व्‍यवसाय चांगला चालला आहे. त्‍यामुळे आम्‍ही त्‍यांना आमचे दैवत मानतो.’’

२५ अ २. हुसेन यांच्‍या चाहत्‍यांचे बोलणे ऐकून सात्त्विक चीड येणे : हुसेन यांच्‍या चाहत्‍यांचे बोलणे ऐकून मला पुष्‍कळ चीड येत असे. ‘भारतमातेचे नग्‍न चित्र आणि हिंदु देवतांची अश्‍लील अन् नग्‍न चित्रे काढणारे हुसेन हे त्‍यांचे दैवत कसे असू शकते ?’, याचे मला आश्‍चर्य वाटे; मात्र मी माझी सात्त्विक चीड लगेच व्‍यक्‍त करत नसे. श्री गुरूंना (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना) शरण जाऊन मी प्रार्थना करत असे. माझ्‍याकडे हुसेन यांनी रेखाटलेल्‍या चित्रांचा रंगीत संच आणि त्‍यांच्‍या विरोधात केलेल्‍या पोलीस तक्रारी अन् इतर माहिती असायची.

२५ अ ३. हुसेन यांच्‍या भगवान शिवाच्‍या विडंबनात्‍मक चित्राचा उपयोग करून आयोजकांशी संवाद साधणे : धर्मरक्षणाचे कार्य करतांना मी प्राधान्‍याने भगवान शिवाच्‍या विडंबनात्‍मक चित्राचा उपयोग करत असे. प्रदर्शन भरवणारे, पोलीस अधिकारी आणि सर्वसामान्‍य हिंदुत्‍वनिष्‍ठ यांच्‍याशी मी आपुलकीने अन् शांतपणे संवाद साधत असे.

मी : तुम्‍ही हिंदु आहात का ? तुम्‍हाला महाशिवरात्रीविषयी माहिती आहे का ?

ते : हो.

मी : त्‍या दिवशी आपण काय करतो ?

ते : महाशिवरात्रीला आपण उपवास करतो, महादेवाच्‍या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक करतो आणि भावपूर्ण दर्शन घेतो. दिवसभर सर्व हिंदू भगवान शंकराची उपासना करतात. यानिमित्ताने भगवान शिव आणि माता पार्वती यांच्‍याविषयी कथा-कीर्तने केली जातात.

भगवान शिवाच्‍या कृपेने हे सांगतांना त्‍यांचा भाव जागृत होत असे आणि चांगले वातावरण निर्माण होत असे.

२५ अ ४. आयोजकांना हुसेन यांचेे शिवपार्वतीचे विडंबनात्‍मक चित्र दाखवून ‘यातून त्‍यांनी हिंदु देवतांचे कसेे विडंबन केले आहे ?’, हे लक्षात आणून देणे : त्‍यानंतर मी हिंदुद्वेष्‍टे हुसेन यांनी महाशिवरात्रीविषयी काढलेले चित्र आयोजकांना दाखवून या चित्राच्‍या खाली इंग्रजीत लिहिलेली टीप दाखवत असे, ‘Bull copulating with Parvati and Shankar watching on Shivratri’, म्‍हणजे ‘महाशिवरात्रीच्‍या दिवशी नंदी पार्वतीशी संभोग करत असून शंकर ते पहात आहे.’ त्‍यांनी हे चित्र पाहिल्‍यानंतर मी त्‍यांना विचारायचो, ‘‘हे तुम्‍हाला मान्‍य आहे का ? महाशिवरात्रीला आपण भगवान शिवाची उपासना करतो आणि पार्वतीला ‘माता’ म्‍हणतो. ‘त्‍या मातेशी नंदी संभोग करत आहे आणि शिव ते पहात आहे’, हे शक्‍य आहे का ? हे हिंदू सहन करू शकतील का ? हे मोठे पाप आहे. अशा पापी माणसाची चित्रप्रदर्शने तुम्‍ही भरवणार आहात का ? तुम्‍ही त्‍याला तुमचे दैवत का मानता ? अशा दुष्‍ट आणि महापापी हुसेन यांचे काय करायचे’, ते तुम्‍हीच ठरवा !’’

२५ अ ५. आयोजकांचे आपुलकीने; पण ठामपणे प्रबोधन केल्‍यावर त्‍यांचे मतपरिवर्तन होणे : त्‍यानंतर मी त्‍यांना हुसेन यांची इतर चित्रेही दाखवायचो. मी त्‍यांना आपुलकीने; पण ठामपणे सांगायचो, ‘‘सर्व हिंदूंचा याला तीव्र विरोध आहे. सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. ‘तुमच्‍या चित्रप्रदर्शनाचे काय होईल ? तुम्‍हाला किती पाप लागेल ?’, हे मी सांगू शकत नाही; मात्र मला तुमच्‍याविषयी आदर आणि आपुलकी आहे. त्‍यामुळे मी तुम्‍हाला हे प्रदर्शन बंद करण्‍याची विनंती करण्‍यासाठी आलो आहे.’’ या सगळ्‍याचा परिणाम होऊन त्‍यांचे मतपरिवर्तन व्‍हायचे आणि ती व्‍यक्‍ती पूर्णपणे बदलून जायची.

२५ अ ६. प्रबोधन करूनही आयोजकांनी प्रदर्शन चालू ठेवण्‍याचा अट्टहास केल्‍यास पोलीस ठाण्‍यात तक्रार करणे : एवढे प्रबोधन करूनही काही वेळा कलादालनाचे मालक, प्रदर्शनाचे आयोजक किंवा चित्रकार प्रदर्शन थांबवण्‍यास नकार देत. तेव्‍हा मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये याविषयीची वार्ता देणे, पोलीस ठाण्‍यात तक्रार करणे इत्‍यादी कृती करत असे. त्‍यामुळे त्‍यांना वैध मार्गाने विरोध करणार्‍यांचे शेकडो दूरभाष जायचे आणि पोलीस त्‍यांची चौकशी करायचे.

‘असे चित्रप्रदर्शन थांबलेच पाहिजे’, याचा मला दिवसरात्र ध्‍यास लागलेला असायचा. त्‍या वेळी माझ्‍यातील क्षात्रतेज आपोआप जागृत होऊन देवताच मला बळ द्यायच्‍या. ‘हे सर्व भगवान शिवाची उपासना करणारे माझे मूळ पुरुष ‘वीरशैव ककैया महाराज’ यांच्‍या ब्राह्मतेजामुळे होत असे’, असे मला वाटते.

२५ आ. हिंदुद्वेष्‍टे हुसेन यांना दिला जाणारा मानाचा ‘रूपधर २००६ जीवनगौरव पुरस्‍कार’ रहित करण्‍यात मिळालेले यश !

२५ आ १. हुसेन यांना ‘रूपधर २००६ जीवनगौरव पुरस्‍कार’ हा मानाचा पुरस्‍कार देण्‍याचे नियोजन होणे आणि तो पुरस्‍कार रहित करायला लावणेे, ही कठीण गोष्‍ट असणे : मुंबई येथील सुप्रसिद्ध ‘बॉम्‍बे आर्ट सोसायटी’ला १०० वर्षे पूर्ण झाली होती. यामध्‍ये सर्वांत मानाचे स्‍थान असलेला ‘रूपधर २००६ जीवनगौरव पुरस्‍कार’ हुसेन यांना देण्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. या भव्‍य सोहळ्‍यामध्‍ये माननीय राज्‍यपाल एस्.एम्. कृष्‍णा यांच्‍या शुभहस्‍ते हुसेन यांना हा प्रतिष्‍ठेचा आणि मानाचा पुरस्‍कार दिला जाणार होता. निमंत्रणपत्रिका वितरित झाल्‍या होत्‍या. या सोहळ्‍याला मोठे चित्रकार, चित्रप्रेमी, अती महत्त्वाच्‍या आणि प्रतिष्‍ठित व्‍यक्‍ती निमंत्रित केल्‍या होत्‍या. अशा परिस्‍थितीत ‘हा पुरस्‍कार रहित करणे, किती कठीण आहे ?’, हे माझ्‍या लक्षात आले.

२५ आ २. ‘देवतांच्‍या विडंबनात्‍मक चित्रांना वैध मार्गाने विरोध करणे’, ही साधना असून ‘देवताच यासाठी साहाय्‍य करणार’, अशी श्रद्धा असल्‍याने आंदोलनाला यश मिळून हुसेन यांना पुरस्‍कार देण्‍याचे रहित होणे : हुसेन यांच्‍यासारख्‍या प्रसिद्ध चित्रकाराने काढलेल्‍या विडंबनात्‍मक चित्रांना वैध मार्गाने विरोध करण्‍याचा आणि त्‍यासाठी आंदोलन करण्‍याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. ‘देवतांच्‍या विडंबनाला वैध मार्गाने विरोध करणे, हेे धर्मरक्षण असून ती माझी साधनाच आहे’, हे मला ठाऊक होते. ‘देवच माझ्‍याकडून ही सत्‍सेवा करून घेणार आहे’, अशी माझी दृढ श्रद्धा होती. ‘हुसेन यांनी ज्‍या देवतांचे विडंबन केलेे, त्‍या देवताच मला साहाय्‍य करून यश देणार आहेत आणि हुसेन अन् त्‍यांचा गौरव करणारे यांना शिक्षा देणार आहेत’, अशी माझी पूर्ण श्रद्धा होती. यामुळे ३ – ४ दिवसांतच आम्‍हाला यश मिळाले आणि त्‍यांना दिला जाणारा ‘रूपधर २००६ जीवनगौरव पुरस्‍कार’ रहित करण्‍यात आला ! नंतर आम्‍ही त्‍या कार्यक्रमाला सन्‍मानाने गेलो. हुसेन यांचे कार्यक्रमाला येण्‍याचे धाडसही झाले नाही.

२५ आ ३. ‘भगवंताची चैतन्‍यशक्‍ती कशी कार्य करते ?’, ते हुसेन यांच्‍या चित्रांना विरोध करण्‍याच्‍या प्रसंगातून अनुभवता येणे : या प्रसंगातून मला ‘भगवंताची चैतन्‍यशक्‍ती कार्य कशी करते ?’, हे अनुभवता येऊन पुष्‍कळ आनंद मिळाला. हुसेन यांच्‍या चित्रांना विरोध करण्‍याच्‍या या प्रसंगामध्‍ये मला पुष्‍कळ शिकता आले आणि माझ्‍या सेवेला योग्‍य दिशा अन् प्रेरणा मिळाली. परिणामी या कालावधीत हुसेन यांनी रेखाटलेल्‍या चित्रांचे प्रदर्शन आणि विक्री, तसेच त्‍यांच्‍याविषयीचे नाटक अन् कार्यक्रम रहित करण्‍यास १०० टक्‍के यश मिळाले.

या आंदोलनामुळे माझ्‍यातील क्षात्रवृत्तीला चालना मिळाली. माझी व्‍यष्‍टी प्रकृती होती, ती समष्‍टी झाली. माझ्‍यामध्‍ये आत्‍मविश्‍वास निर्माण झाला. मला अशक्‍य त्‍या गोष्‍टी शक्‍य करून दाखवणार्‍या भगवंताचे अस्‍तित्‍व अनुभवता आले. मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची कृपा अनुभवता येऊन या सेवेतून आनंद मिळाला.

२५ इ. मुंबई येथील ‘खुशी’ या संघटनेने आयोजित केलेल्‍या चित्र प्रदर्शनातील हुसेन यांच्‍या चित्राची विक्री होऊ न देणे : मुंबई येथील ‘खुशी’ या संघटनेने आयोजित केलेल्‍या चित्रप्रदर्शनात हुसेन आणि ‘गोदरेज’ आस्‍थापनाच्‍या श्रीमती परमेश्‍वरी गोदरेज यांनी लंडन येथे रेखाटलेले एक चित्र होते. याची माहिती मिळाल्‍यावर आम्‍ही त्‍याला वैध मार्गाने विरोध केला. तेव्‍हा ‘खुशी’ संघटनेचे आयोजक शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्‍याकडे गेले. श्री. ठाकरे यांनी मध्‍यस्‍थी केली. तेव्‍हा ‘काहीही झाले, तरी धर्मरक्षणासाठी या चित्राची विक्री होऊ देणार नाही’, अशी मी ठाम भूमिका घेतली. तेव्‍हा शिवसेनाप्रमुख आयोजकांना म्‍हणाले, ‘‘हे तडजोड करणार्‍यांपैकी नाहीत. तुम्‍हीच माघार घ्‍या.’’ अखेर त्‍या चित्राची विक्री रहित झाली.

त्‍यानंतर ‘सोसायटी’ या इंग्रजी मासिकात याविषयी ‘कव्‍हर स्‍टोरी’ (मुख्‍य लेख) प्रकाशित झाल्‍यावर ‘ते चित्र ६ कोटी रुपयांना विकले जाणार होते’, असे आम्‍हाला कळले. हिंदु जनजागृती समितीने वैध मार्गाने केलेल्‍या विरोधामुळे आणि आग्रही मागणीमुळे ते चित्र प्रदर्शनातून काढून टाकण्‍यात आले.

या प्रसंगानंतर माझी गुरुशक्‍तीवरील श्रद्धा अजूनच वाढली आणि पुढील आंदोलनासाठी मला देवाने प्रेरणा दिली. ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना अपेक्षित असे कार्य ते माझ्‍याकडून करून घेणार आहेत’, याची मला नेहमी निश्‍चिती असायची. त्‍यामुळे मला फार विचार करण्‍याची आणि बुद्धीने विश्‍लेषण करायची आवश्‍यकता भासली नाही.

(क्रमशः)

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.५.२०२०)