गणेशभक्‍तांनो धर्महानी रोखा !

एका मूर्तीकाराने शेतकर्‍याच्‍या वेशात हातात भिंगरी असलेली प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसची श्री गणेशमूर्ती सिद्ध केल्‍याचे छायाचित्र एका दैनिकात प्रसिद्ध झाले. सध्‍या ‘इको फ्रेंडली’ (पर्यावरणपूरक) म्‍हणून कागद, गोमय, तुरटी, पुठ्ठा आदींच्‍या गणेशमूर्ती बनवल्‍या जातात. तसेच अभिनेते, अंतराळवीर वा राजकीय नेत्‍यांच्‍या रूपातही गणेशमूर्ती सिद्ध केल्‍या जातात. श्री गणेशाची मूर्ती जर मूर्तीशास्‍त्रानुसार योग्‍य आकारातील, म्‍हणजेच प्रत्‍यक्ष श्री गणेश या देवतेच्‍या प्रत्‍यक्ष रूपाप्रमाणे असेल, तर भाविकांना चैतन्‍याचा लाभ होतो.

पूर्वीच्‍या साधेपणाने साजर्‍या होणार्‍या; पण सात्त्विक आनंद देणार्‍या गणेशोत्‍सवाचे रूप सध्‍या पालटले आहे. त्‍याला २१ व्‍या शतकातील आधुनिकीकरणाची, जागतिकीकरणाची, भांडवलशाहीची आणि विज्ञापनबाजीची बाधा झाली आहे ! श्री गणेशाला मानवी रूपात दाखवणे, हे त्‍याचे विडंबनच आहे. अन्‍य पंथीय स्‍वत:च्‍या श्रद्धास्‍थानांचा असा अवमान कदापि करत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. धर्मशिक्षणाचा अभाव असल्‍यानेच अशा शास्‍त्रविसंगत कृती घडतात. आपण आपल्‍या माता-पित्‍यांचे विडंबन किंवा अवमान सहन करू का ? देवता या तर त्‍यांच्‍याहूनही श्रेष्‍ठ आहेत. देवतांचा अवमान करणार्‍यांवर त्‍यांचा कृपाशीर्वाद राहील का ? वर्ष १९५० मध्‍ये महाराष्‍ट्र शासनाने श्री गणेशमूर्तीचे वेशांतर आणि मानवीकरण यांवर बंदी घातली होती; मात्र कालांतराने या नियमांमध्‍ये शिथिलता आली. ‘वेगवेगळ्‍या रूपांतील आणि वेशभूषांतील मूर्तींमुळे लोकांच्‍या मनातील त्‍या देवतेविषयीच्‍या श्रद्धेवर अन् भावावर परिणाम होतो’, हे लक्षात घेतले पाहिजे. देवतांच्‍या उपासनेच्‍या मुळाशी श्रद्धा असते. ‘देवतांचे कोणत्‍याही प्रकारचे विडंबन हे श्रद्धेवर घाला घालते’, यामुळे ही धर्महानी ठरते.

दुबई हे मुसलमान राष्‍ट्र असूनही गणेशोत्‍सवाच्‍या काळात तिथे प्रतिदिन अथर्वशीर्षाचे पठण होते, कीर्तन आणि प्रवचनेही होतात. संपूर्ण जगात भारत गेली सहस्रो वर्षे आध्‍यात्‍मिक केंद्र होता, आहे आणि पुढेही असेल; पण सध्‍या आपण आपल्‍या मूळ धर्मपरंपरा, संस्‍कृती, ग्रंथ, शिक्षणपद्धत हे सर्व विसरून गेलो आहोत. ‘भारतीय संस्‍कृती आता भारताबाहेरच अधिक जपली जात आहे, असे म्‍हणण्‍याची वेळ येऊ नये’, यासाठी गणेशभक्‍तांनीही याविषयी जागरूक होऊन धर्महानी रोखायला हवी आणि शास्‍त्रानुसार योग्‍य अशा सात्त्विक मूर्तीचीच स्‍थापना करायला हवी !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे