श्री. अरुण डोंगरे (वय ७० वर्षे) यांच्‍या हृदयाच्‍या शस्‍त्रक्रियेच्‍या कालावधीत त्‍यांचा मुलगा श्री. विक्रम डोंगरे यांना जाणवलेली सूत्रे आणि गुरुकृपेने आलेल्‍या अनुभूती !

देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणारे श्री. अरुण डोंगरे यांची डिसेंबर २०२२ मध्‍ये हृदयाची मोठी शस्‍त्रक्रिया झाली. या कठीण काळात डोंगरे कुटुंबियांना आलेल्‍या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे आपण या लेखमालेतून पहात आहोत.

आज श्री. अरुण डोंगरे यांचा मुलगा श्री. विक्रम यांना जाणवलेली सूत्रे पाहूया.

१. मोठी शस्‍त्रक्रिया होणार असतांनाही बाबा शांत आणि स्‍थिर असणे

श्री. अरुण डोंगरे

१ अ. शस्‍त्रक्रिया करण्‍याचा निरोप मिळाल्‍यावर आधी ताण येणे; परंतु गुरुकृपेने मन शांत होऊन परिस्‍थिती स्‍वीकारता येणे : ‘मला ‘बाबांच्‍या (श्री. अरुण डोंगरे यांच्‍या) हृदयाची शस्‍त्रक्रिया करायची आहे’, असे कळल्‍यावर आधी पुष्‍कळ ताण आला. तेव्‍हा मी एका सेवेत होतो; परंतु गुरूंना प्रार्थना केल्‍यावर मन हळूहळू शांत आणि स्‍थिर होऊ लागले. त्‍यानंतर सर्व परिस्‍थिती स्‍वीकारता आली.

१ आ. शस्‍त्रक्रियेच्‍या आधी बाबा अत्‍यंत शांत आणि स्‍थिर असणे : बाबांच्‍या शस्‍त्रक्रियेच्‍या ८ दिवस आधी मी देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात आलो. तेव्‍हापासून प्रतिदिन मी रुग्‍णालयात जात असे. तेव्‍हा बाबा अत्‍यंत शांत आणि स्‍थिर असल्‍याचे लक्षात आले. त्‍यांना पुढे होणार्‍या मोठ्या शस्‍त्रक्रियेविषयी कोणतीच चिंता नव्‍हती, जणूकाही त्‍यांनी सर्व विचार श्री गुरुचरणी अर्पण केले होते.

१ इ. परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारणे : शस्‍त्रक्रियेच्‍या आधी रुग्‍णालयात असतांना बाबा प्रतिदिन स्नान करत असत. तेथे गरम पाण्‍याची व्‍यवस्‍था नव्‍हती, तरी बाबांनी ते आनंदाने स्‍वीकारले होते. शस्‍त्रक्रियेच्‍या आदल्‍या दिवशी आधुनिक वैद्यांनी बाबांच्‍या अंगावरील केस काढण्‍याचा आम्‍हाला निरोप दिला आणि रुग्‍णालयातील एका कर्मचार्‍याची त्‍यासाठी नेमणूक केली. केस काढल्‍यानंतर एका औषधाने अंंघोळ करण्‍यास बाबांना सांगण्‍यात आले होते. संबंधित कर्मचार्‍याने केस काढण्‍याची कृती वेळेत करावी, यासाठी मी त्‍याचा पाठपुरावा घेत होता; परंतु तो रात्री १२ वाजता आला. तेव्‍हा बाबांनी सर्वकाही शांतपणे करवून घेतले आणि पहाटे ६ वाजता औषध लावून उपलब्‍ध थंड पाण्‍याने अंघोळ केली. मी मुक्‍कामी आश्रमात आल्‍याने हा सर्व प्रकार मला सकाळी रुग्‍णालयात पोचल्‍यावर समजला. त्‍या स्‍थितीतही बाबा अत्‍यंत स्‍थिर होते. बाबांची ही मनाची स्‍थिती पाहून माझी भावजागृती झाली.

२. शस्‍त्रक्रियेच्‍या दिवशी

शस्‍त्रक्रियेच्‍या प्रत्‍यक्ष दिवशी निर्धारित वेळेला केवळ ३० मिनिटे राहिली होती. तेव्‍हा बाबा अतीदक्षता विभागात शांतपणे शस्‍त्रक्रियेसाठी बोलावण्‍याची वाट पहात होते. त्‍या वेळी आईने भ्रमणभाषवर त्‍यांची दोन छायाचित्रे टिपली. त्‍या छायाचित्रांकडे पाहून त्‍यांची मनाची स्‍थिरता आणि शांत वृत्ती सहजपणे लक्षात येत होती. शस्‍त्रक्रियेसाठी बाबांना चाकांच्‍या आसंदीवरून नेत असतांनाही ते अत्‍यंत शांत होते. भीतीचा लवलेशही त्‍यांच्‍या मुखावर अथवा देहबोलीतून जाणवत नव्‍हता.

३. शस्‍त्रक्रियेच्‍या वेळी आलेल्‍या अनुभूती !

श्री. विक्रम डोंगरे

३ अ. अन्‍य रुग्‍णांचे नातेवाईक मोठमोठ्याने रडत असतांना साधकाच्‍या डोळ्‍यांमध्‍ये गुरुकृपेमुळे भावाश्रू येणे : बाबांना शस्‍त्रक्रियेसाठी नेल्‍यावर माझ्‍या मनात विचार आला, ‘सर्वकाही सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवच करवून घेणार आहेत !’ त्‍यानंतर ‘ऑपरेशन थिएटर’मध्‍ये बाबांची शस्‍त्रक्रिया करण्‍यासाठी स्‍वतः गुरुदेवच आले आहेत. आधुनिक वैद्य हे दुसरे-तिसरे कुणी नसून गुरुदेवच आहेत’, असा भाव माझ्‍या मनात आपोआप निर्माण झाला. जेव्‍हा जेव्‍हा मी डोळे मिटत होतो, तेव्‍हा हेच दृश्‍य डोळ्‍यांसमोर येऊन माझी पुष्‍कळ भावजागृती होत होती. रुग्‍णालयातील ‘ऑपरेशन थिएटर कॉम्‍प्‍लेक्‍स’च्‍या बाहेर अन्‍य रुग्‍णांचे अनेक नातेवाईक काळजी करत बसलेले दिसत होते. काही जण रडत होते. एकूणच तेथील वातावरण जड झाल्‍याचे जाणवत होते. दुसरीकडे माझ्‍या डोळ्‍यांतही अश्रू होते; परंतु ‘ते भगवंत करत असलेल्‍या कृपेमुळे आलेले अश्रू होते’, असे मला जाणवले. त्‍या वेळी ‘श्री गुरूंची शिष्‍यांवर कशी कृपा असते ? श्री गुरु शिष्‍य-साधकांना कशा प्रकारे संरक्षककवचामध्‍ये ठेवतात (मग ते स्‍थुलदेहाच्‍या भोवतीचे असो अथवा मनोदेहाच्‍या भोवतीचे संरक्षककवच असो.)?’, हे मला अनुभवता आले. त्‍यामुळे सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या चरणी माझ्‍याकडून आणखी कृतज्ञता व्‍यक्‍त होत होती. मला अधूनमधून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचेही शल्‍यकर्म कक्षामध्‍ये अस्‍तित्‍व असल्‍याचे जाणवत होते.  या संपूर्ण कालावधीत ‘गुरु आपल्‍यासाठी किती करतात !’, याच भावानंदात माझे मन डुंबत होते.

३ आ. शस्‍त्रक्रियेच्‍या वेळी देवद आश्रमातून पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांचा भ्रमणभाष आला. त्‍यांचे आश्‍वस्‍त करणारे बोल ऐकून श्री गुरुचरणी पुष्‍कळ कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

३ इ. शस्‍त्रक्रियेच्‍या वेळी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची आठवण येऊन त्‍यांचे अस्‍तित्‍व जाणवणे : बाबांच्‍या शस्‍त्रक्रियेचा दिनांक ठरत नव्‍हता. रुग्‍णालयात केवळ बुधवार आणि शुक्रवार या दोनच दिवशी ‘बायपास सर्जरी’ होत असल्‍याने काही कारणांस्‍तव बाबांच्‍या शस्‍त्रक्रियेचा दिनांक पुढे जात होता. अंततः ७.१२.२०२२ या दिवशी शस्‍त्रक्रिया करायचे ठरले. त्‍याच दिवशी दत्तजयंती आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा वाढदिवस होता. हे लक्षात आल्‍यावर आम्‍हा सर्वांची पुष्‍कळ भावजागृती झाली आणि सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली. शस्‍त्रक्रियेच्‍या दिवशी पुष्‍कळ चैतन्‍य जाणवत होते. तसेच श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळकाकूंची आठवण येऊन अधूनमधून त्‍यांचे अस्‍तित्‍व जाणवत होते.

४. सहरुग्‍णांना आधार देऊन बाबांनी त्‍यांचे मन जिंकणे

बाबांसमवेत असणारे सर्व रुग्‍ण वयाने बाबांपेक्षा ७ ते २२ वर्षांनी लहान होते; पण ते सर्वजण ‘स्‍वत:वर शस्‍त्रक्रिया होणार’, या विचाराने पुष्‍कळ घाबरलेले होते. त्‍यांच्‍यापैकी मधुमेह असणार्‍या काही रुग्‍णांचे रक्‍तातील साखरेचे प्रमाण ‘स्‍वत:च्‍या हृदयावर शस्‍त्रक्रिया होणार’, या ताणामुळे वाढत असे. एका रुग्‍णाच्‍या शस्‍त्रक्रियेचा दिनांक त्‍यामुळे पुढे ढकलावा लागला होता. बाबा या सर्व रुग्‍णांना समजावत आणि त्‍यांना आध्‍यात्मिक स्‍तरावरील दृष्‍टीकोन देत. यातून त्‍यांचा समाजातील लोकांविषयी असलेला प्रेमभाव जाणवला.

बाबांच्‍या शस्‍त्रक्रियेनंतर ते बेशुद्धावस्‍थेत असतांना, तसेच नंतरही काही दिवस त्‍यांना बोलणे शक्‍य नसतांना अनेक सहरुग्‍ण ‘बाबांचे स्‍वास्‍थ्‍य कसे आहे ?’, हे पहाण्‍यासाठी सातत्‍याने आम्‍हा कुटुंबियांकडे विचारणा करत असत. यातून ‘बाबांनी त्‍या सर्वांचे मन कसे जिंकले होते ? त्‍यांना कशा प्रकारे आधार दिला होता ?’, हे लक्षात येऊन गुरुचरणी कृतज्ञता व्‍यक्‍त होत असे. या सर्वांतून ‘जीवनभर साधना करण्‍याचे महत्त्व लक्षात आले.

५. सद़्‍गुरु श्री. राजेंद्र शिंदे यांनी केलेले आध्‍यात्मिक स्‍तरावरील साहाय्‍य

‘बाबांच्‍या शस्‍त्रक्रियेच्‍या आधीपासून ते त्‍यांना बरे वाटेपर्यंत सद़्‍गुरु राजेंद्रदादा आमच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे होते. सद़्‍गुरु दादांनी सांगितलेले आध्‍यात्मिक उपाय केल्‍यानंतर एका दिवसात बाबांच्‍या जवळपास प्रत्‍येक त्रासामध्‍ये कमालीची घट होत असे. प्रसाद-महाप्रसादाच्‍या वेळी सद़्‍गुरु दादा स्‍वतःहून माझ्‍याकडे बाबांच्‍या प्रकृतीची चौकशी करून आढावा घेत असत. त्‍यांनी केलेल्‍या आध्‍यात्मिक साहाय्‍यामुळेच बाबा बरे होऊ शकले. सद़्‍गुरु राजेंद्रदादा यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !

६. आश्रमातील साधकांनी केलेले साहाय्‍य

६ अ. बाबांना रक्‍ताची आवश्‍यकता असतांना साधक लगेच उपस्‍थित होणे : बाबांच्‍या शस्‍त्रक्रियेसाठी रक्‍ताच्‍या किमान ४ बाटल्‍यांची आवश्‍यकता होती. आश्रमात याविषयी निरोप दिल्‍यावर ६ साधक लगेच रुग्‍णालयात उपस्‍थित झाले. सर्व साधकांमध्‍ये ‘डोंगरेकाकांना रक्‍त द्यायचे आहे’, असा आपलेपणाचा भाव जाणवत होता. रुग्‍णालयात असलेल्‍या अन्‍य रुग्‍णांच्‍या कुटुंबियांना त्‍यांचे मित्र, आप्‍तेष्‍ट यांना जमवण्‍यासाठी परिश्रम घ्‍यावे लागत असल्‍याचे मी पहात होतो. काहीजण तर आप्‍तेष्‍टांच्‍या अभावी रक्‍ताच्‍या बाटल्‍या विकत घेत होते. या प्रसंगी सनातनच्‍या ‘साधक परिवारा’चे महत्त्व लक्षात आले. श्रीगुरूंनी साधकांना कसे सिद्ध केले आहे, तसेच त्‍यांनी साधकांमध्‍ये कोणतीही कृती अत्‍यंत सहजतेने, आपुलकीने आणि स्‍वत:ची साधना म्‍हणून करण्‍याचा संस्‍कार कसा रुजवला आहे, हे अनुभवल्‍याने गुरूंच्‍या समष्‍टी रूपाविषयी पुष्‍कळ कृतज्ञता वाटून साधक रक्‍तदान करत असतांना माझी भावजागृती झाली.

६ आ. साधक रात्री रुग्‍णालयात रहाण्‍यासाठी जात असणे : शस्‍त्रक्रियेनंतर रुग्‍णाच्‍या किमान एका नातेवाइकाने २४ घंटे रुग्‍णालयात रहाणे आवश्‍यक असते. मी दिवसभर डॉक्‍टरांच्‍या संपर्कात रहाण्‍यासाठी, बाबांना हवे-नको ते पहाण्‍यासाठी रुग्‍णालयात असे. रात्री आश्रमातील एक साधक रुग्‍णालयात मुक्‍कामासाठी येत होता. रुग्‍णालयात झोपण्‍याची व्‍यवस्‍था नसल्‍याने खालीच भूमीवर झोपावे लागे. तरीही जे साधक मुक्‍कामी येत, ते सर्व परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारून रुग्‍णालयात रहात असत. रात्री १ – २ वेळा डॉक्‍टरांनी काही कारणास्‍तव बोलावल्‍यास साधक उठून आवश्‍यक ते सर्व करत. याविषयी कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरी ती अल्‍पच आहे. व्‍यवहारात अनेक वेळा नातेवाइकांकडून असे साहाय्‍य मिळण्‍याचा भाग अल्‍प असतो, परंतु सनातनच्‍या परिवारात पूर्णत: उलटे चित्र असल्‍याचे अनुभवास आले.

६ इ. बाबांना आसंदीवर बसवून ३ माळे चढणे – उतरणे यांसाठी साधकांनी साहाय्‍य करणे : बाबांना रुग्‍णालयातून आश्रमात आणल्‍यावर त्‍यांना आसंदीवर बसवून तिसर्‍या माळ्‍यावर असलेल्‍या त्‍यांच्‍या निवासाच्‍या खोलीमध्‍ये नेण्‍यासाठी साधक उपस्‍थित असायचे. जेव्‍हा जेव्‍हा बाबांना रुग्‍णालयात न्‍यायचे वा तेथून आणायचे असायचे, तेव्‍हा ३ – ४ साधक बाबांना वरून खाली आणणे आणि रुग्‍णालयातून आल्‍यावर वर नेणे यांसाठी तत्‍परतेने साहाय्‍य करत असत.

६ ई. जेवणातील पथ्‍याची सर्व काळजी घेतली जाणे : बाबांच्‍या पथ्‍याच्‍या जेवणाची सर्व काळजी आश्रमात घेतली जात होती. एके दिवशी रुग्‍णालयातील आहारतज्ञाकडे गेलो असता त्‍या आम्‍हाला म्‍हणाल्‍या, ‘तुम्‍ही तर आश्रमात रहाता, मग तुमच्‍या आहाराची काळजी कशी घेतली जाईल ?’ सनातन आश्रमाचे महत्त्व ज्ञात नसल्‍याने आणि सर्वसाधारण अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रम यांसारखा हा आश्रम असल्‍याचे त्‍यांना वाटल्‍याने त्‍या असे म्‍हणाल्‍या असाव्‍यात; परंतु गुरुकृपेने आश्रमातील सर्व साधकांनी अत्‍यंत प्रेमाने अन् आपुलकीने बाबांना ‘काय हवे-नको’, ते सर्व पाहिले.

कृतज्ञता

सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि त्‍यांचे साक्षात् स्‍वरूप असलेले सद़्‍गुरु, संत आणि साधक यांच्‍यामुळेच जीवनात आलेल्‍या या कठीण परिस्‍थितीला आम्‍हाला सहजपणे सामोरे जाता आले. त्‍यांच्‍या चरणी कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरी ती अल्‍प आहे. खरेतर त्‍यासाठी शब्‍दच अल्‍प पडतील !’

– श्री. विक्रम डोंगरे, फोंडा, गोवा. (२४.३.२०२३)

आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपायांचे लक्षात आलेले अद्वितीयत्‍व

१. ‘स्‍थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्‍ठ’ असल्‍याने स्‍थुलातील उपचारांसमवेत सूक्ष्मातील आध्‍यात्मिक उपायांनी लवकर इलाज होणे

प्राचीन जगतातील ७ आश्‍चर्यांचे आधुनिक जगतातील महत्त्व केवळ भौतिक आणि त्‍यामुळेच वैज्ञानिक म्‍हणजे स्‍थूलदृष्‍टीपुरतेच मर्यादित आहे. ‘स्‍थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्‍ठ’, या वैश्‍विक सिद्धांतानुसार या आश्‍चर्यांच्‍या पलीकडे अशी अनेक आश्‍चर्ये आहेत, जी सनातन वैदिक हिंदु धर्माने जगासमोर ठेवली आहेत. आधुनिक जगतातील असेच एक आश्‍चर्य म्‍हणजे ‘प्राणशक्‍तीवहनद्वारे शोधलेले आध्‍यात्मिक उपाय आणि त्‍यांमुळे होणारे दृश्‍य स्‍वरूपातील परिणाम !’ बाबांच्‍या आजारपणात आम्‍हाला यासंदर्भात अनेक अनुभूती आल्‍या.

बाबांना शस्‍त्रक्रियेनंतर त्‍यांना जे शारीरिक आणि प्रसंगी मानसिक त्रास झाले, त्‍यांवर शब्‍दश: प्रत्‍येक वेळी केवळ औषधोपचार करून विशेष परिणाम झाला नाही; परंतु जेव्‍हा त्‍याच त्रासांवर आम्‍ही संतांनी सांगितलेले आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय केले, तेव्‍हा त्‍या त्रासांपासून मुक्‍ततेची गती पुष्‍कळ वाढायची. अनेक वेळा असे लक्षात आले की, औषधोपचार आवश्‍यक असले, तरी त्‍यांची परिणामकारकता साधारणत: ३० ते ४० टक्‍केच होती, तर आध्‍यात्मिक उपायांची परिणामकारकता ६० ते ७० टक्‍के होती. ‘शस्‍त्रक्रियेनंतर मोठ्या प्रमाणात असलेला अशक्‍तपणा, पोटात अन्‍न न जाणे, अपचन होऊन अनेक दिवस शौचाला न होणे, झाल्‍यास खडा होणे, ‘बेड सोर’ (टीप ) होणे, मनातील नकारात्‍मक विचारांचे प्रमाण वाढणे, हात-पाय थरथरणे, असंबद्ध बोलणे, विसर पडणे, भास होणे, रक्‍तदाब धोकादायक पातळीपर्यंत उणावणे, यांसारख्‍या विविध प्रकारच्‍या त्रासांवर उपाय केल्‍यावर अल्‍प कालावधीतच १०० टक्‍के सकारात्‍मक परिणाम झाल्‍याचे आमच्‍या लक्षात आले. (हृदयाच्‍या मोठ्या शस्‍त्रक्रियेनंतर साधारण ३० ते ४० टक्‍के रुग्‍णांना ‘असंबद्ध बोलणे, तसेच विसर पडणे’, ‘भास होणे’ यांसारखे मानसिक स्‍तरावरील त्रास अधिक काळ होतात. (यांस ‘cognitive dysfunction’ म्‍हटले जाते.)

टीप : ‘बेड सोर’ म्‍हणजे शय्‍याव्रण किंवा दाबव्रण. (अंथरुणाला खिळून राहिल्‍याने रुग्‍णाच्‍या दाब आलेल्‍या जागेवर निर्माण झालेले दाबव्रण किंवा जखमा)

२. ‘जीवनातील ८० टक्‍के समस्‍यांमागे आध्‍यात्मिक कारण असते’, या आध्‍यात्मिक सिद्धांताची प्रत्‍यक्ष अनभूती घेणे

वरील अनुभूतींमुळे सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्‍या आध्‍यात्मिक सिद्धांताची आठवण झाली. मानवी जीवनातील ८० टक्‍के समस्‍यांमागे आध्‍यात्मिक कारण असते. त्‍यामुळे साहजिकच केवळ शारीरिक आणि मानसिक स्‍तरांवरील उपाय हे वरवरचे असून त्‍यांवर आध्‍यात्मिक स्‍तरांवरील उपाय आवश्‍यक असतात. सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी २५ वर्षांपूर्वी सांगितलेले हे शास्‍त्र आज सनातनचे साधक प्रतिदिन अनुभवत आहेत. ‘मानवी जीवनातील दु:ख अल्‍प करण्‍यासाठी सूक्ष्म स्‍तरावर कार्य करणार्‍या साधनेसमवेत स्‍थुलातून लगेच परिणाम करणार्‍या या आध्‍यात्मिक उपायांना समाजात रुढ करणे आवश्‍यक आहे’, असे मला प्रकर्षाने वाटते. आज ‘ग्रॉस नॅशनल हॅपिनेस इंडेक्‍स’ म्‍हणून जी संज्ञा नावारूपाला आली असून, जिच्‍या माध्‍यमातून राष्‍ट्रांतील नागरिकांच्‍या आनंदाचे प्रमाण मोजले जाते, त्‍या दृष्‍टीने पाहिल्‍यास ‘साधना आणि आध्‍यात्मिक उपायांना अनन्‍यसाधारण महत्त्व देणे अत्‍यावश्‍यक आहे’, हे अधोरेखित करावेसे वाटते. हिंदु राष्‍ट्रात यांना मुख्‍य प्रवाहात घेतले गेल्‍यास समाजपुरुष सुखी, समाधानी आणि एकोप्‍याने राहील.

– श्री. विक्रम डोंगरे, फोंडा, गोवा. (२४.३.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक