दाभोळ खाडीत सांडपाणी सोडणार्‍या कारखान्यांवर कठोर कारवाई करा !

मागणी मान्य न झाल्यास दाभोळ खाडी संघर्ष समितीचे स्वातंत्र्यदिनी उपोषण !

दापोली, १० ऑगस्ट (वार्ता.) – मागील आठवड्यात तालुक्यातील दाभोळ खाडीत मासे मृत झाल्याची घटना घडली. मृत मासे आणि खाडीचे पाणी यांचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. लोटे येथील सामायिक सांडपाणी प्रकल्प योजना (सीईटीपी) सक्षमपणे कार्यरत असतांनाही खाडी प्रदूषण कोणत्या कारणाने होते ? याचा शोध घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने वसाहतीतील नाल्याची तपासणी चालू केली. यामध्ये श्रेया डाय केम, योजना, दीपक कलरकेम, पुष्कर केमिकल्स, श्रेयस इंटरमिडीएट्स आदी कारखान्यांमधून सांडपाणी जवळच्याच नाल्यात सोडले जात असल्याचे अधिकार्‍यांच्या निदर्शनात आले. त्यानुसार पंचनामा करून या कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रस्तावित निर्देश देण्यात आले आहेत; मात्र राजरोसपणे सांडपाणी सोडणार्‍या या कारखान्यांना केवळ नोटीस न देता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दाभोळखाडी संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे.

या प्रकरणी आता दाभोळखाडी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रांताधिकारी यांना निवेदने देऊन स्वातंत्र्यदिनी उपोषण करणार, अशी चेतावणी दिली आहे.

संघर्ष समितीचे उपाध्यक्ष प्रभाकर सैतवडेकर म्हणाले की,

१. खाडी प्रदूषणाने मासेमार समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

२. कारखानदार त्यांचे सांडपाणी नाल्यांमध्ये सोडत आहेत.

३. ‘सीईटीपी’ सुस्थितीत चालवला जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्चून वायु गुणवत्ता निगराणी प्रणालीही (एअर मॉनिटरिंग सिस्टीमही) बसवण्यात आली आहे. ‘सीईटीपी’ तांत्रिक समितीही कार्यरत आहे.

४. कारखान्यातील सांडपाणी सुसज्ज ‘सीईटीपी’मध्ये सोडणे आवश्यक असतांनाही काही ठराविक कारखानदार ते सोडतांना दिसत नाहीत.

५. या कारखान्यांना प्रशासकीय यंत्रणेची आता भीती राहिलेली नाही. त्यांना खाडी परिसरातील जनतेचीही काळजी नाही.

संपादकीय भूमिका

अनेक वेळा मागणी करूनही प्रदूषण पसरवणार्‍या कारखान्यांवर कारवाई न होणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !