न्याय मिळण्यासाठी स्वातंत्र्यदिनी भिंगार्डे कुटुंबीय करणार लाक्षणिक उपोषण
लांजा – तालुक्यातील यश कन्स्ट्रक्शन ठेकेदारी फर्मच्या ‘बँक ऑफ इंडिया’ मधील खात्यातून ९२ लाख ५० सहस्र रुपयांची ‘सायबर’ चोरी झाली. याला ९ मासांचा कालावधी उलटला आहे. अद्यापही या प्रकरणाचे पूर्णत: अन्वेषण झालेले नाही. लांजा पोलिसांच्या अन्वेषण यंत्रणेकडून झालेल्या ढिलाईपणामुळे हे प्रकरण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले. जिल्हा पोलीस दलाकडूनही या ‘सायबर’ चोरीचे अन्वेषण गेले नऊ मास रखडलेलेच आहे. यामुळे मोठ्या आर्थिक हानीची झळ भिंगार्डे कुटुंबियांना बसली असून बँक ऑफ इंडियानेही त्यांना वार्यावर सोडले आहे. योग्य तो न्याय मिळण्याची अपेक्षा फोल ठरत असल्याने शेवटी शासन दरबारी कैफियत मांडण्यासाठी १५ ऑगस्टला लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय भिंगार्डे कुटुंबियांनी घेतला आहे. रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण करण्यात येणार आहे.
भिंगार्डे कुटुंबियांकडून सांगण्यात आले की, या प्रकरणाचे अन्वेषण आणि पाठपुरावा गांभीर्याने झाला नसल्याने अटक करण्यात आलेला आरोपीही जामिनावर सुटला आहे. लांजा पोलिसांनी कोलकाता (पश्चिम बंगाल) येथून पकडलेल्या या आरोपीकडून अन्वेषणात अन्य ५ राज्यांतील संशयितांची नावे समजली होती; परंतु हाती लागलेल्या नावांचा कोणताही पाठपुरावा लांजा पोलिसांकडून योग्य रीतीने झालेला नाही. या प्रकरणात बँक ऑफ इंडियानेही तिचे दायित्व नाकारले आहे. बँकेने या प्रकरणी आम्हाला कोणतेही सहकार्य केलेले नाही. ‘व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज आकारणी तूर्तास बंद करावी’, अशी विनवणी आम्ही केली होती; मात्र बँकेकडून कसलाही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाचे अन्वेषण जलद गतीने होण्यासाठी आणि पोलीस यंत्रणेने या प्रकरणाच्या मुळाशी जावे, या हेतूने आम्ही उपोषण करण्याचा निर्धार केला आहे.