‘साठी बुद्धी नाठी’ नव्‍हे हिंदुद्वेषी !

मुंबईतील दादर येथे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्‍या वतीने रौप्‍य महोत्‍सवी सांगता समारंभात ज्ञानपीठ पुरस्‍कार विजेते आणि लेखक भालचंद्र नेमाडे यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करून सतीप्रथा आणि पेशवे यांच्‍याविषयी चुकीची माहिती देऊन अकलेचे तारे तोडले आहेत. भालचंद्र नेमाडे म्‍हणाले, ‘‘गेल्‍या काही दिवसांपासून राज्‍यात औरंगजेब आणि ज्ञानव्‍यापी मशीद यांसारख्‍या विषयांवरून राजकारण चालू आहे. त्‍यामुळे सर्वांनी खरा इतिहास वाचण्‍याची आवश्‍यकता आहे. काशी विश्‍वेश्‍वराला गेलेल्‍या औरंगजेब बादशहाच्‍या २ हिंदु राण्‍यांना तेथील हिंदु पुजार्‍यांनी भ्रष्‍ट केले. ही गोष्‍ट औरंगजेबाला समजल्‍यावर त्‍याने काशी विश्‍वेश्‍वराची तोडफोड केली. इतिहासात औरगंजेबाला हिंदुद्वेष्‍टा म्‍हटले गेले; पण त्‍याच्‍या सैन्‍यात ५० टक्‍क्‍यांहून अधिक लोक हे हिंदु होते. एवढेच नाही, तर सतीप्रथा बंद करणारा औरंगजेब हा पहिला राजा होता ! दुसर्‍या बाजीरावाचा अपवाद वगळता बाकी पेशवे नीच होते.’’

यावरून नेमाडे यांच्‍यावर टीकेची झोड उठली असून अनेक स्‍तरांतून त्‍यांच्‍या वक्‍तव्‍याचा विरोध होत आहे. नेमाडे यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍याविषयी राज्‍याचे मंत्री गिरीश महाजन म्‍हणाले, ‘‘त्‍यांचे वय झाले असून ते चुकीचा इतिहास सांगत आहेत. हे सहन करण्‍यापलीकडे आहे. वयोमानानुसार तुम्‍ही काहीही बोलावे.’’ शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्‍ते संजीव भोर पाटील यांनी नेमाडे यांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध केला आहे. यापूर्वी नेमाडे यांनी ‘मोघल सम्राट अकबर हिंदु होते. आता धर्म आणि राष्‍ट्र या २ संकल्‍पना नष्‍ट केल्‍या पाहिजेत. त्‍याविना जगाची सुटका होणार नाही’, असे अर्थहीन वक्‍तव्‍य केले आहे.

नेमाडे यांनी केलेल्‍या तथ्‍यहीन भाषणांवरून त्‍यांना कोणत्‍या आधारे ज्ञानपीठ पुरस्‍कार मिळाला आहे, याचे संशोधन करणे आवश्‍यक आहे. एखाद्याचे वय झाल्‍यानंतर म्‍हणजे ६० वर्षांच्‍या पुढे व्‍यक्‍तीचे विस्‍मरण होऊन त्‍याचे मानसिक संतुलन ढासळते. त्‍यामुळे ती व्‍यक्‍ती मनाला येईल ते बडबडत असते. त्‍या व्‍यक्‍तीचे बोलणे असेच चालू राहिल्‍यास घरातील लोक ‘साठी बुद्धी नाठी’, असे म्‍हणून त्‍याकडे दुर्लक्ष करतात. भालचंद्र नेमाडे यांचेही वय झाले असून तेही विचित्र पद्धतीने चुकीचा इतिहास सांगून समाजातील लोकांची दिशाभूल करत आहेत. लाखो हिंदूंची हत्‍या करून सहस्रो मंदिरांची तोडफोड करणारा, हिंदु महिलांवर अत्‍याचार करणारा औरंगजेब हिंदूंचा आदर्श होऊच शकत नाही. त्‍याने सतीची प्रथा बंद केली, याचे कोणतेही पुरावे नसतांना नेमाडे निर्धास्‍तपणे वरील चुकीची माहिती देत आहेत. पेशवे हे मराठा साम्राज्‍याचे पंतप्रधान होते. साम्राज्‍याच्‍या उत्तरार्धात पेशवे साम्राज्‍याचे शासक होते. श्रीवर्धनकर भट घराण्‍यातील पेशव्‍यांनी मुलकी आणि लष्‍करी अशा दोन्‍ही आघाड्यांवर असा पराक्रम गाजवला की, लोकांनी त्‍यांना सहजच ‘श्रीमंत’ हा किताब (पुरस्‍कार) दिला होता. पेशवे छत्रपतींचे एकनिष्‍ठ सेवक होते. असे असतांना त्‍यांच्‍याविषयी अशा खालच्‍या स्‍तरावर वक्‍तव्‍य करणे, हे नेमाडे यांच्‍यासारख्‍या साहित्‍यिकांना शोभत नाही. काशी विश्‍वनाथाचे मंदिर पाडून ज्ञानवापीची मशीद बांधली गेली आहे. खरे शिवलिंग मशिदीच्‍या मुख्‍य घुमटाखाली आहे, याविषयी पुरातत्‍व विभागाला पुरावे मिळाले आहेत. या गोष्‍टी नेमाडे का सांगत नाहीत ? केवळ हिंदु धर्माच्‍या द्वेषापोटी नेमाडे यांनी याविषयी अवाक्षरही काढले नाही, उलट ते राजकारण चालू असल्‍याचे धादांत खोटे सांगत आहेत.

समाजाची दिशाभूल करणारे नेमाडे !

यापूर्वी भालचंद्र नेमाडे लिखित ‘हिंदू : जगण्‍याची समृद्ध अडगळ’ या कांदबरीत बंजारा समाज आणि अन्‍य मागास समाज यांच्‍या स्‍त्रियांविषयी अश्‍लील अन् असभ्‍य लिखाण करण्‍यात आल्‍यामुळे त्‍यांच्‍या कांदबरीच्‍या विक्रीवर निर्बंध आणून प्रकाशन रहित करावे, तसेच त्‍यांचा पुरस्‍कार परत घ्‍यावा, यासाठी बंजारा समाज बांधवांनी आंंदोलन केले होते. यावरून नेमाडे यांची समाजात किती (कु)प्रतिष्‍ठा आहे, हे समजते. श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजी भिडे (गुरुजी) यांनी मोहनदास गांधी यांच्‍याविषयी केलेल्‍या विधानावरून समाजात काँग्रेस पक्षासह विद्रोही लोकांकडून मोठा कांगावा केला गेला. खरेतर पू. भिडेगुरुजी यांनी गांधींविषयी केलेले वक्‍तव्‍य चुकीचे कि योग्‍य ? हे ठरवण्‍याचा अधिकार न्‍यायालयाला आहे. त्‍यात इतरांनी नाक कशाला खुपसायचे ? गेल्‍या वर्षी ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम्’ या पुस्‍तकाला मिळणारा पुरस्‍कार रहित झाल्‍यानंतर माध्‍यमांशी बोलतांना ‘नॅशनलिझम्’मुळे (राष्‍ट्रवादामुळे) फार हानी होत आहे’, असे वक्‍तव्‍य भालचंद्र नेमाडे यांनी केले. ‘राष्‍ट्रवादाच्‍या सीमा पुसल्‍या जाऊन सारे जग एक झाले पाहिजे’, असा त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याचा रोख होता. ‘संपूर्ण जग आपले मानणे’, ही वेगळी संकल्‍पना आहे आणि ‘प्रखर राष्‍ट्रप्रेम’ ही वेगळी संकल्‍पना आहे. जगावर प्रेम करतांनाही ‘राष्‍ट्र प्रथम’ हीच भूमिका केव्‍हाही असायला नको का ? प्रतिदिन आजूबाजूच्‍या राष्‍ट्रांमधून घुसखोरी होत असतांना वरील विधाने करणे लांच्‍छनास्‍पद आहे. माओवाद्यांच्‍या पुस्‍तकाचा पुरस्‍कार रहित झाल्‍याविषयी टिपणी करतांना नेमाडे म्‍हणाले, ‘‘हरामखोर लोकांना आपण निवडून देतो.’’ अनेक नक्षलवादी आक्रमणांचा कट रचल्‍याचा आरोप असणार्‍या लेखकाच्‍या पुस्‍तकाच्‍या अनुवादावर शासनाने बंदी घातली, तर नेमाडे यांना ती आक्षेपार्ह वाटते; म्‍हणजे नक्षलवाद्यांना नाकारणारा शासनाचा ‘राष्‍ट्रवाद’ नेमाडे यांना नको. नेमाडे यांनी चीनमधील गरीब जनतेचा कळवळा येऊन ‘चीन देश नव्‍हे, तर चीनचे सरकार आपले शत्रू आहे’, असे आणखी एक दिशाभूल करणारे वक्‍तव्‍य केले होते. नेमाडेसारखे साहित्‍यिक समाजात वावरत असल्‍याने देशाचा खरा इतिहास लुप्‍त होऊन दिशाभूल करणारा इतिहास शिकवला जात आहे. हे थांबवण्‍यासाठी राष्‍ट्रप्रेमी साहित्‍यिक आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे.

भालचंद्र नेमाडे यांच्‍यासारख्‍या हिंदुद्वेषी साहित्‍यिकांना राष्‍ट्रप्रेमी साहित्‍यिक आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी रोखायला हवे !