नवी मुंबई, ४ ऑगस्ट (वार्ता.) – भाजप जिल्हाध्यक्ष तथा ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ३ ऑगस्ट या दिवशी कोपरखैरणे येथे महारक्तदान, तसेच महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. ३०० हून अधिक नागरिकांनी रक्तदान करून नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या आरोग्य तपासणी शिबिराचा सहस्रो नागरिकांनी लाभ घेतला.
कच्छ युवक संघ, जितो सामाजिक संघटना आणि जैन समाज यांचे सहकार्य कार्यक्रमाला लाभले. लायन्स क्लब ऑफ न्यू बाँबे, तुर्भे यांच्या वतीने नेत्रचिकित्सा आणि मधुमेह तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. ज्या व्यक्तींना मोतिबिंदू झाल्याचे तपासणीमध्ये निदान झाले, त्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहे.
या वेळी संदीप नाईक म्हणाले की, नवी मुंबईत शाळांची कमतरता होती, त्या काळामध्ये श्रमिक शिक्षण मंडळाची स्थापना करून शाळा चालू करून येथील विद्यार्थ्यांची शिक्षणाची परवड थांबवली. गेल्या २० वर्षांच्या सार्वजनिक जीवनामध्ये मिळालेल्या विविध पदांच्या माध्यमातून नवी मुंबईच्या आवश्यकतांची पूर्तता केल्याचे समाधान आहे. पुरस्कारांनी नवी मुंबईच्या विकासावर मोहर उमटवली असून या शहराच्या प्रगतीमध्ये स्वयंसेवी संस्थांचा हातभार आहे.