मोहरमनिमित्त प्रीतीसंगम उद्यानात मंदिराच्‍या परिसरात मांसाहारी जेवण करून हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर गुन्‍हे नोंद करा ! – हिंदु एकता आंदोलनाची मागणी

कराड, ४ ऑगस्‍ट (वार्ता.) – येथील प्रीतीसंगम उद्यानामध्‍ये मोहरमच्‍या दिवशी या समाजातील लोकांकडून ताबूत विसर्जनावेळी मांसाहारी जेवणाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्‍यात आले होते. उद्यानात मांसाहार जेवण करण्‍यास बंदी आहे, तसेच या परिसरात हिंदूंंची अनेक मंदिरे असूनही या ठिकाणी मांसाहार जेवण करण्‍यात आल्‍याने हिंदु समाजाच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍या गेल्‍या आहेत. तरी कराड नगर परिषदेने या ठिकाणचे सीसीटीव्‍ही चित्रण पडताळून संबंधितांवर गुन्‍हे नोंद करून कठोर कारवाई करण्‍यात यावी, तसेच हे चित्रण मिळण्‍याविषयीची मागणी कराड नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी शंकर खंदारे, तसेच कराड पोलीस ठाण्‍याचे वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक प्रताप सूर्यवंशी यांना निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.

कराड येथील प्रीतीसंगम उद्यान

या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे सर्वश्री अजय पावसकर, रूपेश मुळे, प्रकाश जाधव, गणेश महामुनी, शिवसेनेचे काकासाहेब जाधव, अक्षय मोहिते, हिंदु जनजागृती समितीचे अनिल कडणे, गोरक्षण बचाव समितीचे सुनील पावसकर, शिवतेज संघटनेचे गणेश कापसे, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे सागर आमले, सनातन संस्‍थेचे चिंतामणी पारखे आदी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.