आनंदी, हसतमुख, सकारात्‍मक आणि शिकण्‍याची वृत्ती असलेला अमरावती येथील श्री. महेश चौधरी !

अमरावती येथील साधिका श्रीमती विभा चौधरी (आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के) यांचा मुलगा श्री. महेश चौधरी रामनाथी आश्रमात त्‍याच्‍या आईच्‍या समवेत आला आहे. त्‍याच्‍याविषयी जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

श्री. महेश चौधरी
श्री. अतुल पवार

१. ‘श्री. महेश आनंदी, हसतमुख आणि मनमोकळा आहे.

२. कुठलीही सेवा करण्‍याची सिद्धता असून सेवा आनंदाने करणे

आश्रमात शिबिरासाठी आलेले एक साधक रुग्‍णाईत होते. रुग्‍णाईत असलेल्‍या साधकाला प्रसाद-महाप्रसाद देण्‍याची सेवा करण्‍यासाठी, तसेच त्‍यांना अन्‍य काही साहाय्‍य लागले, तर त्‍यासाठी मी श्री. महेश याला विचारले, ‘‘तू रुग्‍णाईत असलेल्‍या साधकाला साहाय्‍य करशील का ?’’ त्‍यावर त्‍याने आनंदाने होकार दिला. तेव्‍हा त्‍याच्‍या चेहर्‍यावर ही सेवा मिळाल्‍याचा आनंद जाणवत होता. ‘रुग्‍ण साधकाला प्रसाद-महाप्रसाद देणे, तसेच ‘त्‍याला आणखी काही हवे का ?’, असे विचारून ‘ही सेवा महेश मनापासून करत आहे’, असे माझ्‍या लक्षात आले. त्‍याला कोणतीही सेवा सांगितली, तरी ती सेवा आनंदाने करण्‍याची त्‍याची सिद्धता असते.

३. ‘तो आधीपासूनच आश्रमात रहात आहे’, अशा पद्धतीने त्‍याचे वागणे-बोलणे असणे

महेश हा रामनाथी आश्रमात प्रथमच आला आहे; पण त्‍याच्‍याकडे पाहून ‘तो आधीपासूनच आश्रमात रहात आहे’, अशा पद्धतीने त्‍याचे वागणे-बोलणे आहे. त्‍याने बोलतांनाही मला सांगितले, ‘‘मी येथे आधीपासूनच रहात आहे, असे मला वाटते.’’ तसेच ‘आश्रमात यायला मिळाले’, याबद्दल त्‍याला कृतज्ञता वाटते.

४. अहं अल्‍प असणे

श्री. महेश हा उच्‍चशिक्षित असून एका नामांकित संगणकीय आस्‍थापनात चांगल्‍या पदावर असूनही त्‍याच्‍या वागण्‍या-बोलण्‍यातून मोठेपणा किंवा त्‍याविषयीचा अहं जाणवत नाही.

५. सकारात्‍मक

श्री. महेश चौधरी याच्‍या कुटुंबावर काही दुःखद प्रसंग आले, तरीही त्‍याचे कुटुंबीय स्‍थिर आहेत. ‘श्री. महेशच्‍या मनात असे प्रसंग माझ्‍या जीवनात का आणि कसे आले ?’, असे विचार आले नाहीत. उलट ‘तो सकारात्‍मक आहे’, असे मला जाणवले.

६. शिकण्‍याची वृत्ती

६ अ. स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेविषयी योग्‍य दृष्‍टीकोन असणे : त्‍याला आश्रमात राहून स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शिकण्‍याची इच्‍छा आहे. तो म्‍हणाला, ‘‘मला प्रक्रियेच्‍या आढाव्‍याला शिकण्‍यासाठी बसता येईल का ?’’ त्‍याला कुणाकडून तरी समजले की, ‘प्रक्रिया कठीण असते. प्रक्रिया करतांना मनाचा संघर्ष होतो आणि वाईट वाटते, तर तुला ते जमेल का ?’ यावर तो म्‍हणाला, ‘‘साधकांना त्‍यांच्‍या चुका स्‍वीकारता येत नाहीत; म्‍हणून त्‍यांना वाईट वाटून रडायला येते. तो त्‍यांच्‍या अहंचा भाग असतो. मी दोन – अडीच मासांतच प्रक्रिया पूर्ण करीन.’’ यावरून त्‍याच्‍यातील आत्‍मविश्‍वास, प्रक्रियेविषयीचा योग्‍य दृष्‍टीकोन आणि दृढनिश्‍चय हे गुण माझ्‍या लक्षात आले.

६ आ. तो आश्रमातील आध्‍यात्मिक पातळी अधिक असलेल्‍या साधकांना ‘‘तुम्‍ही कसे प्रयत्न करता ? किंवा काय भाव ठेवता ?’’, असे स्‍वतःहून विचारतो.’’

७. स्‍थिरता

एकदा बोलतांना त्‍याने एक प्रसंग सांगितला. त्‍याची नवीन दुचाकी गाडी त्‍याच्‍या घरून चोरीला गेली. त्‍यावर मी त्‍याला विचारले, ‘‘याबद्दल तुला काय वाटते ?’’ तो म्‍हणाला, ‘‘ती गाडी आपली नव्‍हतीच’’, असे मी समजलो. या प्रसंगातही वाईट वाटून किंवा दुःख न करता त्‍याने हा प्रसंग सहजपणे स्‍वीकारला आणि तो ‘त्‍या प्रसंगात स्‍थिर होता’, असे मला वाटले.

रामनाथी आश्रमात वास्‍तव्‍यास असतांना त्‍याला काही संतांचे दर्शन झाले आणि सत्‍संग मिळाला. त्‍याबद्दल त्‍याला पुष्‍कळ आनंद झाला आणि कृतज्ञता वाटली. मनमोकळेपणाने बोलणे, निरागसता, अहं अल्‍प असणे, इतरांना साहाय्‍य करणे, योग्‍य दृष्‍टीकोन असणे, परिस्‍थितीचा स्‍वीकार करणे, सकारात्‍मकता असे गुण मला त्‍याच्‍यामध्‍ये जाणवले.’