सनातनच्या ७१ व्या संत पू. (कै.) श्रीमती आशा दर्भेआजी (वय ९४ वर्षे)  यांच्या देहत्यागापूर्वी आणि देहत्यागानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती 

२२.७.२०२३ या दिवशी सनातनच्‍या ७१ व्‍या संत पू. (श्रीमती) आशा दर्भेआजी यांनी देहत्‍याग केला. ३.८.२०२३ या दिवशी पू. आजींच्‍या देहत्‍यागानंतरचा तेरावा दिवस झाला. त्‍या निमित्त त्‍यांच्‍या देहत्यागापूर्वी आणि देहत्यागानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती ३.८.२०२३ या दिवशी पाहिल्या. आज उर्वरीत भाग पाहू. 

पू. (श्रीमती) आशा दर्भे

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/707491.html 

(भाग २)

२. अश्‍विनी अनंत कुलकर्णी (पू. आजींची नात, मुलीची मुलगी), फोंडा, गोवा.

२ अ. ‘७.७.२०२३ या दिवशी आम्‍ही पू. आजींकडे गेलो. तेव्‍हा आम्‍हाला ‘त्‍यांच्‍या गळ्‍यावर उजव्‍या बाजूला ‘ॐ’ उमटला आहे’, असे दिसले.

२ आ. श्री महालक्ष्मीदेवीच्‍या मंदिरात असतांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा भ्रमणभाष येणे आणि ‘साक्षात् श्री महालक्ष्मीदेवीचा आशीर्वाद मिळाला’, असे वाटणे : १३.७.२०२३ या दिवशी सकाळपासून माझा भाचा कु. विवान अमित कुलकर्णी (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ७ वर्षे) श्री महालक्ष्मीदेवीच्‍या मंदिरात घेऊन जाण्‍याचा हट्ट करत होता. मी आणि विवान श्री महालक्ष्मी मंदिरात असतांनाच श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा भ्रमणभाष आला. तेव्‍हा त्‍यांनी पू. आजींच्‍या प्रकृतीविषयी विचारपूस केली. त्‍या वेळी ‘साक्षात् श्री महालक्ष्मीदेवीचा आशीर्वाद मिळाला’, असे वाटून माझ्‍याकडून कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

२ आ १. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी पू. आजींविषयी सांगितलेली सूत्रे

अश्विनी अनंत कुलकर्णी

२ आ १ अ. पू. आजींचा नामजप अखंड चालू असून त्‍या देवाच्‍या अनुसंधानात आहेत ! : मी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांना पू. आजींच्‍या स्‍थितीविषयी सांगितल्‍यावर त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘पू. आजींचा नामजप अखंड चालू आहे आणि त्‍या देवाच्‍या अनुसंधानात आहेत. त्‍यामुळे तुम्‍ही नामजप करून त्‍यांच्‍या चैतन्‍याचा लाभ करून घ्‍या.’’ तेव्‍हा मी त्‍यांना म्‍हणाले, ‘‘तिन्‍ही गुरूंनी (परात्‍पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी) पू. आजींचा हात धरला आहे. त्‍यामुळे आम्‍ही निश्‍चिंत आहोत.’’ तेव्‍हा त्‍यांनी मला ‘हो’ म्‍हणून आश्‍वस्‍त केले.

२ आ १ आ. पू. आजी कशातही अडकलेल्‍या नसून त्‍यांचा पुढील साधनाप्रवास चांगला होणार आहे ! : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘पू. आजी कशातही अडकलेल्‍या नाहीत आणि त्‍यांचा साधनाप्रवास चांगला होणार आहे; कारण देव त्‍यांच्‍या प्रवासात कोणतेही अडथळे येऊ देणार नाही.’’ त्‍याच दिवशी सकाळी माझ्‍या आईला पू. आजी केवळ देहाने येथे असून त्‍यांचा पुढचा प्रवास चालू झाल्‍याचे जाणवले होते. त्‍याविषयी मी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांना सांगितले. तेव्‍हा त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘आईंना जसे वाटले, तसेच आहे.’’

२ इ. १४.७.२०२३ या दिवशी पू. आजींच्‍या उजव्‍या हाताला सूज आली होती. त्‍या वेळी त्‍यांच्‍या त्‍या हातावर ‘ॐ’ उमटला होता.

२ ई. पू. आजी शून्‍यात पहात असल्‍याप्रमाणे जाणवणे आणि त्‍यांच्‍या कपाळावर नाम ओढल्‍याप्रमाणे उभा तेजस्‍वी पट्टा दिसणे : १५.७.२०२३ या दिवसानंतर पू. आजी डोळे उघडायच्‍या; पण त्‍या कुणाकडेही पहात नव्‍हत्‍या. त्‍या शून्‍यात पहात असल्‍याप्रमाणे जाणवायचे. त्‍या १० – १२ सेकंदांनी डोळे मिटून घ्‍यायच्‍या. त्‍या दिवशी त्‍यांच्‍या चेहर्‍यावर काहीसा काळसरपणा दिसत होता; पण त्‍यांच्‍या कपाळावर नाम ओढल्‍याप्रमाणे उभा तेजस्‍वी पट्टा दिसत होता.

२ उ. ‘पू. आजी सूक्ष्मातून वाईट शक्‍तींशी लढत आहेत, तसेच देव पू. आजींकडून समष्‍टी कार्य करून घेत आहे आणि त्‍यांना शक्‍ती देत आहे’, असे जाणवणे : १६ ते १९.७.२०२३ या कालावधीत पू. आजींचा चेहरा पूर्ववत् झाला; मात्र १९.७.२०२३ या दिवशी त्‍यांचा चेहरा पुन्‍हा काळवंडला. ‘पू. आजी सूक्ष्मातून वाईट शक्‍तींशी लढत आहेत, तसेच ‘त्‍यांचे स्‍थुलातील कार्य पूर्ण झाले असून देव त्‍यांच्‍याकडून समष्‍टी कार्य करून घेत आहे आणि त्‍यांना शक्‍ती देत आहे’, असे मला जाणवत होते.

२ ऊ. पू. आजी बेशुद्ध असतांनाही आपला मोठा मुलगा भेटायला आल्‍याचे त्‍यांना समजणे, पू. आजींना आनंद झाल्‍याचे जाणवणे अन् त्‍यांच्‍याकडून आनंदाच्‍या लहरी येणे : २१.७.२०२३ या दिवशी पू. आजींना भेटण्‍यासाठी माझा मोठा मामा (श्री. मोहन भास्‍कर दर्भे) आणि त्‍याचा मुलगा (श्री. योगेश मोहन दर्भे) आले होते. त्‍या वेळी पू. आजी बेशुद्ध होत्‍या, तरीही मामा येऊन गेल्‍याचे त्‍यांना कळले. ते दोघे भेटल्‍याने पू. आजींना पुष्‍कळ आनंद झाल्‍याचे मला आणि आईला जाणवले. पू. आजींकडून आमच्‍याकडे आनंदाच्‍या लहरी येत होत्‍या आणि आम्‍ही त्‍या ग्रहण करत होतो. त्‍या वेळी मला आनंदाने बोलताही येत नव्‍हते. आम्‍हा दोघींच्‍याही मनात गुरुदेव आणि पू. आजी यांच्‍याप्रती पुष्‍कळ भाव दाटून आला होता. आम्‍ही दोघी भावविभोर स्‍थितीत होतो.

श्रीमती अंजली कुलकर्णी

२ ए. सूक्ष्मातून दिसलेले दृश्‍य आणि त्‍याच्‍या माध्‍यमातून पू. आजींनी सूक्ष्मातून केलेल्‍या प्रस्‍थानाची झालेली जाणीव ! : त्‍या क्षणी अकस्‍मात् माझ्‍याकडून माझ्‍या दोन्‍ही हातांचे अंगठे एकमेकांत अडकवून माझ्‍या हातांची पक्ष्याने पंख उघडझाप केल्‍याप्रमाणे कृती झाली. मी आईला विचारले, ‘‘हे कोणत्‍या पक्ष्याचे पंख आहेत ?’’ तेव्‍हा आईने ‘गरुड’, असे उत्तर दिले. त्‍या वेळी मी डोळे मिटल्‍यावर मला सूक्ष्मातून पुढील दृश्‍य दिसले, ‘एका मोठ्या गरुडाच्‍या पाठीवर मोठी अंबारी आहे. त्‍या अंबारीत सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव विष्‍णुरूपात उभे आहेत. त्‍यांच्‍या शेजारी डाळिंबी रंगाची नऊवारी साडी नेसलेल्‍या पू. आजी उभ्‍या आहेत. तेव्‍हा त्‍या अत्‍यंत तेजस्‍वी आणि समाधानी दिसत आहेत. त्‍यांच्‍या समोर सर्व साधक उभे आहेत. पू. आजी सर्व साधकांकडे पाहून नमस्‍कार करत आहेत आणि त्‍या अत्‍यंत मृदू स्‍वरात म्‍हणत आहेत, ‘बरं, आता मी येऊ का ?’ त्‍यानंतर त्‍या सर्व साधकांना आशीर्वाद देत आहेत आणि प.पू. गुरुदेवांना विचारत आहेत, ‘आपण निघूया ?’ त्‍यानंतर प.पू. गुरुदेव त्‍यांना विष्‍णुलोकात घेऊन जात आहेत.’

हे दृश्‍य दिसल्‍यावर मला ‘पू. आजींनी सूक्ष्मातून प्रस्‍थान केले आहे’, असे जाणवले. त्‍या वेळी पू. आजींच्‍या अनाहतचक्रातून ‘ॐ’चा सूक्ष्म ध्‍वनी ऐकू येत होता. माझी प.पू. गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

२ ऐ. शेजार्‍यांनी पू. आजींना बद्रिकेदार येथून आणलेले गंगाजल देणे आणि तेव्‍हा त्‍यांना शिवाचा आशीर्वाद मिळाल्‍याचे जाणवणे : पू. आजींचा कुलदेव श्री महादेव असल्‍याने त्‍यांनी शिवाची पुष्‍कळ भक्‍ती केली होती. मामाच्‍या घराच्‍या शेजारी रहाणार्‍या व्‍यक्‍तीने पू. आजींना बद्रिकेदार येथून आणलेले गंगाजल दिले. तेव्‍हा मला ‘पू. आजींना शिवाचा आशीर्वाद मिळाला’, असे जाणवले.

२ ओ. पू. आजींच्‍या देहत्‍यागानंतर जाणवलेली सूत्रे

१. ‘पू. आजी शांत झोपल्‍या आहेत. त्‍यांचा श्‍वासोच्‍छ्‌वास चालू असून पापण्‍यांची हालचाल होत आहे’, असे मला जाणवत होते. (आईची मावस बहीण आणि अन्‍य एक मामी यांनाही असेच जाणवले.)

२. पू. आजींच्‍या शेजारी बसल्‍यावर मला शांती आणि शक्‍ती यांची स्‍पंदने जाणवली.

३. त्‍यांच्‍या कपाळावर आज्ञाचक्राच्‍या बाजूला ‘ॐ’ उमटला होता.

४. ‘पू. आजींच्‍या आज्ञाचक्रातून प्रकाश बाहेर पडत आहे’, असे मला दिसत होते. आईने पू. आजींच्‍या कपाळावर बुक्‍का लावल्‍यानंतर पू. आजींच्‍या आज्ञाचक्रातील प्रकाश पांडुरंगाच्‍या कपाळावर असलेल्‍या गोल टिळ्‍याप्रमाणे दिसत होता.

५. पू. आजींचा देह ज्‍या वस्‍त्रावर ठेवला होता, त्‍याच्‍या चारही बाजूंनी सोनेरी रंगाची बारीक कडा दिसत होती.

६. पू. आजींचा तोंडवळा अत्‍यंत तेजस्‍वी दिसत होता आणि त्‍यांचा देह ठेवलेल्‍या खोलीतील प्रकाशात वाढ झाली होती.

७. ‘पू. आजींच्‍या डोक्‍याजवळ हनुमान हात जोडून बसला आहेे’, असे माझ्‍या आईला सूक्ष्मातून दिसले.

८. पू. आजींचा देह घरातून बाहेर आणल्‍यावर त्‍या आणखी तेजस्‍वी दिसू लागल्‍या.

९. पू. आजींना अंतिम संस्‍कारासाठी नेतांना पुष्‍कळ मोठा पाऊस आला.

१०. पू. आजींच्‍या देहावर अग्‍निसंस्‍कार करण्‍यापूर्वी ‘त्‍यांच्‍या चेहर्‍यावरील तेजात पहिल्‍यापेक्षा पुष्‍कळ वाढ झाली’, असे नंतर एका परिचितांनी सांगितले.

११. पू. आजींच्‍या देहत्‍यागानंतर घरात (केवळ मामाच्‍याच नाही, तर आमच्‍या घरातही) चैतन्‍य आणि आनंद यांची स्‍पंदने जाणवतात. (भेटायला आलेल्‍या साधकांनाही ती जाणवली आणि त्‍यांना पुष्‍कळ कृतज्ञता वाटली.)

१२. ‘पू. आजींचे चैतन्‍य आणि आनंद सतत आमच्‍या समवेत आहे’, असे मला जाणवते.

१३. माझा नामजप एकाग्रतेने होतो आणि मनाला शांत वाटते.’

३. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘प.पू. गुरुदेवा, ‘केवळ आपल्‍या कृपेनेच आम्‍हाला पू. आजींचा सहवास मिळाला आणि त्‍यांच्‍याविषयीची सूत्रे लक्षात आली. आम्‍हाला पू. आजींच्‍या माध्‍यमातून जे प्रेम आणि आशीर्वाद मिळाले, तीही केवळ अन् केवळ आपली कृपाच आहे’, त्‍याबद्दल आम्‍ही आपल्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.

‘पू. आजींमधील ‘प्रीती, सहनशीलता आणि संयम’, यांसारखे अनेक दैवी गुण आमच्‍यात येण्‍यासाठी आपणच आम्‍हा लेकरांवर कृपा करावी’, अशी आपल्‍या चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.’

(समाप्‍त)

– श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी आणि अश्‍विनी अनंत कुलकर्णी

(सर्व सूत्रांचा दिनांक : २७.७.२०२३)

देहत्‍यागाच्‍या वेळीही इतरांचा विचार करणार्‍या पू. दर्भेआजी !

‘२२.७.२०२३ या दिवशी रात्री ९.१५ वाजता पू. आजींनी देहत्‍याग केला. त्‍या दिवशी शनिवार होता. पू. आजींनी त्‍यांच्‍या संपूर्ण जीवनात केवळ इतरांचा विचार केला. त्‍यांनी देहत्‍यागाच्‍या वेळीही तसेच केल्‍याचे मला जाणवले. पू. आजींनी शनिवारी घरातील व्‍यक्‍तींची सर्व कामे झाल्‍यावर आणि ‘त्‍यांची नोकरी आणि व्‍यवसाय यांत कोणताही अडथळा येणार नाही’, याचा विचार करून देहत्‍याग केला. (दुसर्‍या दिवशी रविवारची सुटी होती.) देवाने आम्‍हाला संतांच्‍या समष्‍टीवरील निरपेक्ष प्रीतीची अनुभूती दिली.’

– अश्‍विनी अनंत कुलकर्णी  (पू. आजींची नात, मुलीची मुलगी), फोंडा, गोवा. (२७.७.२०२३)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.