शेतीची हानी करणार्‍या माकडांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना हवी ! – अविनाश काळे

उपाययोजनेचा अभाव आढळल्यास आमरण उपोषण !

रत्नागिरी – सुरक्षित आणि भयमुक्त शेती हा शेतकर्‍यांचा अधिकार आहे. माकडे आणि वानरे यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. हानीभरपाई आकस्मित गोष्टीसाठी दिली जाते; मात्र माकडांचा त्रास हा आकस्मित नसून कायमस्वरूपी आहे. त्यामुळे हानीभरपाई हा पर्याय होऊ शकत नाही. वानर आणि माकड यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा, अशी मागणी गोळप येथील श्री. अविनाश काळे यांनी केली. जिल्हा नगर वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या शेतकर्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. २ ऑगस्ट या दिवशी झालेल्या या बैठकीला शेती, बागायत, भाजीपाला यांच्या उत्पन्नावर अवलंबून असलेले आणि वानर अन् माकड यांच्या प्रतिदिनच्या त्रासामुळे त्रस्त झालेले दोनशे शेतकरी उपस्थित होते.

या बैठकीत अविनाश काळे यांच्यासह अनेक शेतकर्‍यांनीही समस्या विशद केल्या, तसेच माकडांच्या त्रासाला कंटाळून शेतकरी भाजीपाला करणे सोडू लागले आहेत. शासनाने याची गांभीर्याने दखल न घेतल्यास गावे रिकामी होतील आणि शेती करणार्‍यांची संख्याही घटेल. हा उपद्रव न्यून झाल्यास शेतीच्या क्षेत्रात निश्चित वृद्धी होईल.

याविषयी एक मासात योग्य निर्णय घेण्यात आला नाही, तर शेतकरी आमरण उपोषणाला बसतील, अशी चेतावणी या बैठकीत देण्यात आली. या बैठकीनंतर शेतकर्‍यांनी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, वन अधिकारी कार्यालयात जाऊन प्रत्येकाने स्वतंत्र वैयक्तिक निवेदन सादर केले.

या बैठकीत चवे येथील सचिन काळे, भडे येथील सुधीर तेंडुलकर, फणसोप येथील दिलीपकुमार साळवी आणि अन्य शेतकर्‍यांनी मनोगते मांडली.