लव्‍ह जिहादसाठी ‘टेरर फंडिंग’ करणार्‍यांचा शोध घ्‍या ! – प्रसाद लाड, आमदार, भाजप

उंबरे (अहिल्‍यानगर) येथील शाळकरी मुलींच्‍या धर्मांतराचे प्रकरण

अहिल्‍यानगर – उंबरे येथील घटना रात्री दीड वाजता कळली. त्‍यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्‍काळ कारवाई करण्‍याचे आदेश दिले. अधिवेशनात हा विषय घेण्‍यात आला आहे. आमच्‍या धर्माच्‍या आया-बहिणींकडे वाकड्या दृष्‍टीने पहाल, तर त्‍या दिवशी डोळे हातात काढून दिले जातील. बाँबस्‍फोटासाठी ‘टेरर फंडिंग’ (आतंकवादासाठी अर्थसाहाय्‍य) केले जात होते. त्‍याचप्रकारे लव्‍ह जिहादसाठी ‘टेरर फंडिंग’ केले जात आहे. यामागील धागेदोरे पोलिसांनी शोधले पाहिजेत, असे मत विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी व्‍यक्‍त केले. उंबरे गावात शाळकरी मुलींच्‍या धर्मांतर प्रकरणी प्रसाद लाड यांनी १ ऑगस्‍ट या दिवशी भेट दिली. त्‍या वेळी ग्रामस्‍थांच्‍या शांतता बैठकीत ते बोलत होते. या वेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, महसूलमंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे यांच्‍यासह पदाधिकारी उपस्‍थित होते.

प्रसाद लाड पुढे म्‍हणाले की, अटक केलेल्‍या आरोपींवर एम्.पी.डी.ए.नुसार कारवाई करावी, त्‍यासाठी पालकमंत्री विखे यांनी लक्ष घालावे. आरोपी ६ ते ८ वर्षे कारागृहातून बाहेर आले नाही पाहिजेत. यात आपल्‍या १३ जणांनाही अटक झालेली आहे. त्‍यांचा जामीन कसा लवकर होईल ? हे पहावे. येथील परिस्‍थिती पहाण्‍यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मला पाठवल्‍याचे लाड यांनी त्‍यांच्‍या भाषणात सांगितले.

लव्‍ह जिहादच्‍या घटना अहिल्‍यानगरमध्‍ये का घडतात ?

प्रसाद लाड, आमदार, भाजप

अहिल्‍यानगर जिल्‍ह्यात लव्‍ह जिहादच्‍या घटना का घडतात ? याची चौकशी केली पाहिजे. कुणी व्‍यक्‍ती, पोलीस अधिकारी यांत असतील, तर त्‍यांची चौकशी करून गुन्‍हे नोंद केले पाहिजेत. लव्‍ह जिहादच्‍या घटना घडल्‍यास स्‍थानिक पोलीस ठाणे, एल्.सी.बी. (स्‍थानिक गुन्‍हे विभाग) यांना उत्तरदायी धरले पाहिजे. या घटनेतील अल्‍पवयीन मुलींची तक्रार प्रविष्‍ट करून घेण्‍यास १३ घंट्यांचा कालावधी का लागला ? असा प्रश्‍न उपस्‍थित करत संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणीही प्रसाद लाड यांनी केली आहे.