पाकमधून ड्रोनद्वारे भारतात अमली पदार्थ पाठवले जातात ! – मलिक महंमद अहमद खान, पाकच्या पंतप्रधानांचे संरक्षणविषयक साहाय्यक

पाकच्या पंतप्रधानांचे संरक्षणविषयक साहाय्यक मलिक अहमद खान यांची स्वीकृती !

मलिक महंमद अहमद खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतातील पंजाबमध्ये अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर केला जातो, अशी स्वीकृती पाकच्या पंतप्रधानांचे संरक्षण संदर्भातील विशेष साहाय्यक मलिक महंमद अहमद खान यांनी दिली. ते पाकच्या पंजाबमधील आमदारही आहेत. त्यांचा कसूर घाटी हा मतदारसंघ भारताच्या पंजाबच्या सीमेला लागून आहे.

१. पाकिस्तानी पत्रकार हामिद मीर यांनी घेतलेल्या मुलाखतीत मलिक यांनी सांगितले की, नुकतेच २ घटनांमध्ये १० किलोग्राम हेरॉईन ड्रोनला बांधून भारतात पाठवण्यात आले. पाकमधील पूरग्रस्तांना सरकारकडून साहाय्य करण्यात आले नाही, तर तेही अमली पदार्थांची तस्करी करू लागतील.

२. हामिद मीर यांनी म्हटले की, मलिक अहमद खान यांनी दिलेली स्वीकृती महत्त्वाची आहे. ते पाकच्या सरकारमध्ये आणि सैन्याच्या जवळचे आहेत. माजी सैन्यदल प्रमुख बाजवा यांच्याही ते जवळचे आहेत. संरक्षण यंत्रणांनी कसूर घाटीजवळील भ्रमणभाषचे सिग्नल रोखले आहेत, तरीही या भागातून अमली पदार्थ आणि मद्य यांची तस्करी केली जात आहे. येथे भ्रमणभाषला ‘नेटवर्क’ मिळत नसल्याने स्थानिकांकडून खान यांना विरोध केला जातो.

३. भारतातील पंजाब राज्याच्या पोलिसांच्या आकडेवारीनुसार जुलै २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत अमली पदार्थांच्या संदर्भात ७९५ गुन्हे नोंदवण्यात आले. या प्रकरणात अमली पदार्थ जप्त करण्याच्या घटना पाक सीमेलगत असणार्‍या भागांतील आहेत. या सीमेवरून ड्रोनच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी केली जाते. गेल्या वर्ष भरात २६० किलोग्राम हेरॉईन, १९ बंदुका, ३० काडतुसे आणि ३० पाकिस्तानी ड्रोन जप्त करण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका 

पाकला हे ठाऊक असूनही पाक सरकार हे रोखत नाही, हे लक्षात घ्या !