लाचखोर अधिकारी पुन्हा कार्यरत होतात, यासाठी कायद्यात पालट करण्याविषयी अभ्यास करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये निलंबित केलेल्या अधिकार्‍यांना ९ मासांनंतर पुन्हा अकार्यकारी आणि त्यानंतर पुन्हा कार्यकारी पदावर नियुक्त केले जाते. त्याच पदावर येऊन ते पुन्हा अपहार करतात, अशी खंत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केली. नाशिक येथील शिक्षणाधिकार्‍यांच्या लाचखोरीच्या प्रकरणात उत्तर देतांना गृहमंत्र्यांनी वरील खंत व्यक्त केली. या दृष्टीने लाचखोरांना शिक्षा होण्यासाठी कायद्यात पालट होण्यासाठी विधी विभागाने अभ्यास करण्याची सूचना गृहमंत्र्यांनी केली.

या वेळी काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेले अधिकारी पुन्हा त्याच पदावर नियुक्त होतात. ही केवळ सरकारची नव्हे, तर विधीमंडळाची हतबलता आहे, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. यावर कायद्यामध्ये आवश्यक पालट किंवा नवीन कायदा करणे याविषयी अभ्यास करण्याचे आश्वासन गृहमंत्री फडणवीस यांनी दिले.