सर्पदंशावरील संपूर्ण उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करावेत !

विधानसभा अध्यक्षांचे सरकारला निर्देश !

मुंबई – सर्पदंशावरील संपूर्ण उपचार महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करावेत, असे निर्देश २७ जुलै या दिवशी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी सर्पदंशामुळे एखादा रुग्णाला खासगी रुग्णालयात हालवावे लागते. रुग्णाला ‘व्हेंटिलेटर’वर ठेवल्याचे सिद्ध झाले, तरच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून साहाय्य मिळते, हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर अध्यक्षांनी वरील निर्देश दिले.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर

४ रुग्णालयांत सर्पदंशावरील लस उपलब्ध होऊ न शकल्याने मुलीचा मृत्यू !

काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत रायगडमधील जत तालुक्यातील इयत्ता ७ वीमध्ये शिकणार्‍या कु. सारा ठाकूर या विद्यार्थिनीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याविषयी सभागृहात स्थगन प्रस्ताव उपस्थित केला.

कु. सारा हिला रायगड येथील ४ रुग्णालयांत नेऊनही सर्पदंशावरील लस उपलब्ध होऊ शकली नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला ही न शोभणारी घटना आहे, असे नमूद करत राज्यात संर्पदंशावरील इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी या वेळी केला.