मुंबई – ४ वर्षांपूर्वी फुटलेले तालुक्यातील तिवरे धरणाला नव्याने बांधण्याची तात्काळ संमती द्यावी. या धरणफुटीमुळे १९ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ५४ कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्यापैकी २४ कुटुंबियांना घरे मिळाली असून उर्वरित ३० कुटुंबियांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत केली. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिवरे धरण क्षेत्रातील ३० कुटुंबियांचे पुनर्वसन झाले नसेल, तर त्यामागील अडचणी दूर करू. उंबरे आणि राजवाडी या पाझर तलावांच्या दुरुस्तीच्या सूचना तात्काळ देण्यात येतील.
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान आमदार निकम यांनी तिवरे धरणाचा प्रश्न उपस्थित केला.
आमदार निकम म्हणाले की, तिवरे धरणाचा विषय गंभीर आहे. आम्हाला मोठ्या धरणांची आवश्यकता नसून छोटे-छोटे पाझर तलाव व्हावेत, अशी आमची मागणी आहे. तिवरे धरण फुटून चार वर्षे लोटली, तरी धरण नव्याने बांधण्याला संमती मिळालेली नाही. त्यामुळे धरणाखालील लोकांना पाण्याचा प्रश्न आहे. धरणांची दुरुस्ती ज्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीत धरणामध्ये पाणी साठतच नाही. त्यामुळे या दुरुस्त्या केवळ खर्चिक ठरतात. राजेवाडी, उंबरे या धरणांची दुरुस्ती झाली; मात्र त्यामध्ये पाणी साठत नाही. त्यामुळे त्याचा लोकांना लाभ होत नाही आणि पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे तिवरे धरण नव्याने बांधण्यासाठी तातडीने संमती द्यावी. त्याचा प्रस्ताव सिद्ध झालेला आहे.