पुनर्वसन कागदावरच ?

सातारा जिल्‍ह्यात ढगफुटीसदृश पावसामुळे झालेले भूस्‍खलन

२ वर्षांपूर्वी संपूर्ण सातारा जिल्‍ह्याला हदरवून सोडणार्‍या ढगफुटीसदृश पावसामुळे पाटण तालुक्‍यातील आंबेघर, ढोकावळे, मीरगाव आणि हुंबरळी येथे भूस्‍खलन झाले होते. मध्‍यरात्री घडलेल्‍या या घटनेमध्‍ये संपूर्ण वस्‍ती मातीच्‍या ढिगार्‍याखाली दबली गेली. या घटनेत २९ जणांना प्राण गमवावे लागले. या घटनेला २२ जुलै या दिवशी २ वर्षे पूर्ण झाली; मात्र अद्याप बाधितांचे पुनर्वसन होऊ शकलेले नाही. बाधितांपैकी कुणालाही शासनाकडून अजूनही पक्‍की घरे मिळालेली नाहीत. अनेक शासकीय अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री यांनी या ठिकाणी भेट देऊन पक्‍क्‍या घरांमध्‍ये पुनर्वसन करण्‍याचे आश्‍वासन दिले होते; मात्र ते आश्‍वासन केवळ कागदावरच राहिले !

पाटण तालुक्‍यातील युवकांनी प्रशासनाला सहकार्य करत शोध मोहिमेला साहाय्‍य केले होते. ५ दिवसांच्‍या अथक प्रयत्नानंतर २८ मृतदेह हाती लागले होते; मात्र आंबेघर येथील एका लहान बालकाचा मृतदेह आढळला नाही. स्‍थानिक नागरिकांनी प्रयत्नांची पराकाष्‍ठा केली; मात्र उपयोग झाला नाही. मारेणा विभागात ६०० फूट डोंगररांगच खचून ७ घरांच्‍या वस्‍तीवर कोसळली. या घटनेमध्‍ये तर एकाच कुटुंबातील ५ जणांवर एकाच वेळी अंत्‍यसंस्‍कार करण्‍याची हृदयद्रावक घटना घडली होती.

घटना घडल्‍यानंतर शासनाने बाधितांना १० फूट बाय १० फूटांचे पत्र्याचे शेड उभारून दिले; मात्र अजूनही तीच शेड बाधित कुटुंबे वापरत आहेत. या पत्र्याच्‍या शेडमध्‍ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, तसेच इतर सुविधांचीही वानवा आहेच. २ वर्षांनंतरही बाधितांना पक्‍की घरे मिळू शकत नाहीत, ही शोकांतिकाच आहे. अजूनही मातीच्‍या ढिगार्‍याखाली दबलेले घरांचे अवशेष, अस्‍ताव्‍यस्‍त पडलेले साहित्‍य सर्वत्र पहायला मिळत आहे. निसर्गाच्‍या प्रकोपामुळे घरदार, जीवलग माणसे, जनावरे, संसार सर्व मातीच्‍या ढिगार्‍याखाली दबून गेले. हे सर्व तर बाधितांना परत मिळवून देऊ शकत नाही; परंतु वाचलेल्‍यांचे पुनर्वसन करणे, हे तर शासनाच्‍या हातात आहे. असे असूनही २ वर्षे पुनर्वसन न होणे, ही प्रशासनाच्‍या असंवेदनशीलतेची परिसीमा आहे.
भूस्‍खलन आणि डोंगर खचण्‍याच्‍या घटना आताही घडत आहेत. या निमित्ताने प्रशासनाने पूर्वीच्‍या बाधित झालेल्‍या कुटुंबांचे पुनर्वसन झाले आहे ना ? याचा आढावा घ्‍यावा. यासाठी कालबद्ध कृतीशील कार्यक्रम आखावा, अन्‍यथा नेहमीप्रमाणे घोषणा केवळ कागदावरच, असे म्‍हणावे लागू नये !

– श्री. राहुल देवीदास कोल्‍हापुरे, सातारा