भारताने चीनच्या इलेक्ट्रिक चारचाकी आस्थापनाच्या गुंतवणुकीला दिला नकार !

‘बीवायडी’ – चीनचे इलेक्ट्रिक चारचाकी वाहन निर्मिती करणारे बलाढ्य आस्थापन

नवी देहली – चीनची इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांची निर्मिती करणारे बलाढ्य आस्थापन ‘बीवायडी’ला भारतात ८ सहस्र १८६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची अनुमती नाकारण्यात आली आहे. बीवायडी आस्थापन भारतातील भाग्यनगर येथील ‘मेघा इंजीनियरिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ या आस्थापनासमवेत भागीदारीमध्ये प्रकल्प उभारू इच्छित होते. भारताने या प्रकल्पाला अनुमती नाकारण्यामागे सुरक्षेचे कारण दिले आहे.

बीवायडीने या प्रकल्पाद्वारे प्रतिवर्ष १० ते १५ सहस्र इलेक्ट्रिक चारचाकी वाहने उत्पादित करणार असल्याचे सांगितले होते. सध्या हे आस्थापन तिची २ इलेक्ट्रिक वाहने भारतात विकत आहे, तसेच इलेक्ट्रिक बसच्या संदर्भात भारतातील ओलेक्ट्रा ग्रीनटेक या आस्थापनाला तांत्रिक साहाय्य करत आहे.