जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावण्‍याचे प्रकार खपवून घेणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

त्र्यंबकेश्‍वर येथील शिव मंदिरात मुसलमानांनी प्रवेश करण्‍याचा प्रयत्न केल्‍याचे प्रकरण

देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

मुंबई, २४ जुलै (वार्ता.) – त्र्यंबकेश्‍वर (जिल्‍हा नाशिक) येथे १३ मे २०२२ या दिवशी काही मुसलमानांनी संबल मिरवणुकीच्‍या निमित्ताने शिव मंदिरामध्‍ये प्रवेश केला. या प्रकरणी ‘विशेष अन्‍वेषण पथक’ (एस्.आय.टी.) स्‍थापन केले असून त्‍याचा अहवाल एक मासामध्‍ये उपलब्‍ध करण्‍यात येईल. शासन कोणत्‍याही प्रथा, परंपरा यांमध्‍ये हस्‍तक्षेप करत नाही; मात्र कुणी जाणीवपूर्वक, खोडसाळपणे धार्मिक भावना दुखावण्‍याचे प्रकार करत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाहीत. त्‍यांच्‍यावर कडक कारवाई करण्‍यात येईल, असे चोख प्रत्‍युत्तर राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले. याविषयी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी तारांकित प्रश्‍न उपस्‍थित केला होता.

त्र्यंबकेश्‍वर येथे मुसलमानांनी शिव मंदिरामध्‍ये प्रवेश करून ‘सेल्‍फी’ आणि ‘व्‍हिडिओ’ सिद्ध केला. त्‍याची चलचित्रफितही उपलब्‍ध आहे. ‘मंदिराच्‍या पायरीला धूप दाखवण्‍याची कोणतीही परंपरा किंवा प्रथा नाही’, असे मंदिर विश्‍वस्‍तांचे म्‍हणणे आहे. त्‍यामुळे त्‍यांनी धार्मिक भावना दुखावल्‍याची तक्रार केली आहे. या वेळी देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, ‘‘काही धर्मांधांनी शिव मंदिरामध्‍ये धार्मिक तेढ निर्माण करण्‍याचा प्रसंग निर्माण केला आहे. प्रत्‍येक धर्माच्‍या प्रथा आणि परंपरा यांचा आदर ठेवा. त्‍याच्‍या नावाखाली धुडगूस घालता येणार नाही.’’

संपादकीय भूमिका :

हिंदूंच्‍या मंदिरांमधील धर्मांधांचा हैदोस खपवून घेतला जाणार नाही, असा वचक पोलीस कधी निर्माण करणार ?