पॅरोलवर फरार असणारा गोध्रा हत्याकांडातील दोषी सत्तार याला पोलिसांनी केली अटक !

१ वर्षापासून होता फरार !

गोध्रा (गुजरात) – वर्ष २००२ मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांडाच्या वेळी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा सत्तार नावाचा दोषी पॅरोलवर होता. तो १ वर्षापासून फरार होता. त्याला राज्यातील पंचमहल जिल्ह्यातून नुकतीच अटक करण्यात आली. तो लिमखेडा गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला उर्वरित शिक्षा भोगता येण्यासाठी कर्णावतीच्या साबरमती केंद्रीय कारागृहात पाठवण्यात येणार आहे.
२७ फेब्रुवारी २००२ या दिवशी गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेस या रेल्वेगाडीतील दोन डब्यांना आग लावण्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर झालेल्या खटल्यामध्ये त्याला दोषी ठरवण्यात आले आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

मार्च २०११ मध्ये रेल्वेला आग लावल्याच्या घटनेवर विशेष न्यायालयाने एकूण ११ दोषींना मृत्यूदंड, तर २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. वर्ष २०१७ मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने ११ दोषींच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला जन्मठेपेच्या शिक्षेत पालटले, तर २० अन्य जणांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.

संपादकीय भूमिका

पॅरोलवर असणारा दोषी पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक कशी काय करतो ? यासाठी उत्तरदायी असलेल्या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई व्हायला हवी !