तुळशी वृंदावनाच्या पुनर्विकासासाठी अहवाल सादर करण्याचे वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश !
मुंबई, २२ जुलै (वार्ता.) – पंढरपूर येथील कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बांधण्यात आलेल्या तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा आणि संत एकनाथ महाराज यांचे मंदिर कोसळल्याच्या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासकीय तंत्रनिकेतन यांच्याकडून प्राप्त झालेल्या बांधकामाच्या तपासणीच्या (स्ट्रक्चरल ऑडिटच्या) अहवालानुसार तुळशी वृंदावन येथील ८ संतांच्या संगमरवरी मंदिर प्रतिकृती आणि मूर्ती बसवण्यासाठी असणारे चौथरे हे निकृष्ट दर्जाचे असून यापुढे कोणत्याही प्रकारची संभाव्य हानी टाळण्याकरता उर्वरित सर्वच संतांच्या मूर्ती संरक्षित ठिकाणी हालवण्यात येऊन संगमरवरी मंदिर प्रतिकृती या पाडण्यात याव्यात, असे सुचवण्यात आले आहे, तसेच तुळशी वृंदावन येथे उभारण्यात आलेल्या भव्य विठ्ठल मूर्तीच्या चौथर्याचेही काम निकृष्ट दर्जाचे असल्याने विठ्ठल मूर्तीसाठी असुरक्षित असल्याचे नमूद केले आहे. तुळशी वृंदावनातील स्थापत्य कामांच्या बांधकामाच्या तपासणीच्या निष्कर्षानुसार प्रस्तावित उपाययोजना आणि तुळशी वृंदावनाच्या पुनर्विकासासाठी सिद्ध करण्यात आलेल्या आराखड्याविषयी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी २० जुलै या दिवशी विधान परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या वेळी दिली.
भाविकांना पंढरपूरमध्ये संत उद्यान पहाण्यास मिळावे, यासाठी वन विभागाने पंढरपूरमध्ये ६ कोटी रुपये व्यय करून तुळशी वृंदावन उभे केले आहे. तुळशी वृंदावनात अनुमाने ४ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या संत चोखामेळा आणि संत एकनाथ महाराज यांचे मंदिर २ मासांच्या कालावधीतच कोसळले. संत चोखामेळा यांचे मंदिर कोसळल्याने या मंदिरातील संत चोखामेळा यांच्या मूर्तीचीही हानी झाली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या ७ जून २०२३ च्या पत्रान्वये शासनाकडे केली होती.