वाराणसी सेवाकेंद्रातील साधिका सौ. सानिका संजय सिंह यांना सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांच्‍या सर्वज्ञतेच्‍या संदर्भात आलेली अनुभूती

‘२०२२ या वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त छापणार्‍या स्‍मरणिकेच्‍या सेवेच्‍या वेळी सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ आमच्‍या सेवेचा पाठपुरावा घेत होते. तेव्‍हा ‘संतांच्‍या सर्वज्ञतेविषयी’ आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

१. गुरुपौर्णिमा स्‍मरणिका छपाईसाठी गेल्‍यावर सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी उत्तरदायी साधिकेला त्‍यातील सर्व पडताळणी झाल्‍याविषयी विचारणे : ऑगस्‍ट २०२२ मध्‍ये उत्तरप्रदेशची गुरुपौर्णिमा स्‍मरणिका छपाईसाठी छापखान्‍यात (प्रेसमध्‍ये) पाठवली होती. त्‍यानंतर सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी उत्तरदायी साधिकेला विचारले, ‘‘गुरुपौर्णिमा स्‍मरणिकेमध्‍ये सर्वकाही नीट पडताळलेले आहे ना ?’’ उत्तरदायी साधिकेने सांगितले, ‘‘ती सेवा करणार्‍या साधकांनी सर्वकाही पडताळले आहे.’’

२. सद़्‍गुरु नीलेशदादा यांनी पुन्‍हा गुरुपौर्णिमा स्‍मरणिकेत सर्व काही नीट पडताळल्‍याविषयी विचारल्‍यावर साधिकेला त्‍याचे गांभीर्य लक्षात येणे : दुसर्‍या दिवशी पुन्‍हा सद़्‍गुरु नीलेशदादांनी त्‍यांना विचारले, ‘‘गुरुपौर्णिमा स्‍मरणिकेत सर्वकाही नीट पडताळले आहे ना ?’’ तेव्‍हा त्‍या साधिकेला वाटू लागले, ‘सद़्‍गुरु दादांच्‍या मुखातून साक्षात् ईश्‍वरच बोलत आहे. त्‍यामुळे गुरुपौर्णिमा स्‍मरणिका पुन्‍हा एकदा पडताळणे आवश्‍यक आहे.’ त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘आता स्‍मरणिका छापायलासुद्धा गेली आहे, तर कसे करावे ?’’

सौ. सानिका सिंह

३. स्‍मरणिका छपाईसाठी गेलेली पाहून सद़्‍गुरु नीलेशदादा म्‍हणाले, ‘‘स्‍मरणिकेची छपाई थांबवायला सांगावी आणि पुन्‍हा पडताळणी करावी.’’

४. छपाई थांबवून स्‍मरणिकेची पुनर्पडताळणी केल्‍यावर त्‍यात ५ गंभीर चुका सापडणे : स्‍मरणिका पुन्‍हा पडताळण्‍यात आली. तेव्‍हा आम्‍हाला त्‍यांमध्‍ये ५ गंभीर चुका सापडल्‍या. सद़्‍गुरु नीलेशदादांनी सांगितल्‍यामुळेच आमच्‍याकडून होणारी मोठी चूक होण्‍यापूर्वीच लक्षात आली आणि आम्‍हाला तिच्‍यामध्‍ये सुधारणा करणे शक्‍य झाले.

५. सद़्‍गुरु नीलेशदादा यांनी साधकांना चुकीमुळे लागणार्‍या पापापासून वाचवणे : या प्रसंगातील चुकीच्‍या क्रियमाणाचे पाप आम्‍हाला लागले असते; मात्र सद़्‍गुरु नीलेशदादांनीच आम्‍हाला या पापापासून वाचवले. त्‍या वेळी ‘गुरु त्‍याच्‍या साधकांची कशी काळजी घेतात ?’, हे लक्षात आले.

६. कृतज्ञता

अ. या प्रसंगात आम्‍हाला सद़्‍गुरु नीलेशदादा यांची निरपेक्ष प्रीती अनुभवण्‍यास मिळाली आणि त्‍यांच्‍या चरणी पुष्‍कळ कृतज्ञता वाटली.

आ. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव, सद़्‍गुरु नीलेशदादांच्‍या मार्गदर्शनानुसार आम्‍हाला साधना करता यावी आणि प्रत्‍येक सेवा परिपूर्ण अन् भावपूर्ण होण्‍याच्‍या दृष्‍टीने आमच्‍याकडून प्रयत्न व्‍हावेत, तसेच यासाठी आपणच आमच्‍यामध्‍ये तीव्र तळमळ निर्माण करावी आणि समर्पणभाव प्रदान करावा’, अशी आपल्‍या चरणी प्रार्थना !’

– सौ. सानिका संजय सिंह, वाराणसी सेवाकेंद्र , वाराणसी. (२९.९.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक