विधानसभेत तंबाखूजन्य पदार्थ बंदीची चर्चा; मात्र प्रवेशद्वारावर सापडल्या गुटख्याच्या पुड्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई, २१ जुलै (वार्ता.) – विधानसभेत २१ जुलै या दिवशी तंबाखूजन्‍य पदार्थ आणि गुटखा यांच्‍या विक्रेत्‍यांवर कारवाई करण्‍याविषयी वादळी चर्चा झाली. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी तंबाखूजन्‍य पदार्थ आणि गुटखा यांची वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करण्‍याची मागणी केली, तर भाजपचेच आणखी एक आमदार अतुल भातखळकर यांनीही अशा विक्रेत्‍यांवर कठोर कारवाई करण्‍याची मागणी केली. एकीकडे विधीमंडळाच्‍या सभागृहात अशा विक्रेत्‍यांवर कारवाई करण्‍याची मागणी होत असतांना दुसरीकडे मात्र विधीमंडळात येणार्‍यांकडे तंबाखूजन्‍य पदार्थ आणि तंबाखूच्‍या पुड्या सापडल्‍या. यातून राज्‍यात तंबाखूजन्‍य पदार्थांवरील बंदीच्‍या कारवाईची वस्‍तूस्‍थिती समोर आली आहे.

विधीमंडळाच्‍या पावसाळी अधिवेशनासाठी येणारे विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्‍याकडे तंबाखूजन्‍य पदार्थ अन् गुटखा यांची पाकिटे आढळत आहेत.  विधीमंडळाच्‍या आवारात येणार्‍यांची प्रवेशद्वारावर पडताळणी केली जाते. त्‍या वेळी काही जणांच्‍या खिशात या पुड्या सापडतात. तंबाखूजन्‍य पदार्थ आणि गुटखा यांच्‍या पुड्या काढून घेण्‍यात येत असल्‍याने काही जण बॅगेत किंवा पिशवीत लपवून विधीमंडळामध्‍ये तंबाखूजन्‍य पदार्थ नेत असल्‍याचे आढळून आले आहे.

संपादकीय भूमिका 

तंबाखूजन्‍य पदार्थावरील बंदीचा कायदा ज्‍या विधीमंडळात होतो, तेथेच तंबाखूजन्‍य पदार्थ सापडतात, याला काय म्‍हणायचे ? याकडे सरकारने लक्ष देणे अपेक्षित !