चिपळूण आणि खेड येथील पूर ओसरला

परशुराम घाटातून दुहेरी वाहतूक चालू

चिपळूण – चिपळूण आणि खेड येथील पावसाचा जोर न्यून होताच येथील पूर ओसरल्यामुले विस्कळीत झालेले जनजीवन आता हळूहळू पूर्ववत् होत आहे. कुंभार्ली आणि आता परशुराम घाटातून दुहेरी वाहतूक चालू करण्यात आली आहे.

सध्या वशिष्ठी नदीची पातळी ४.२२ मीटर म्हणजेच चेतावणी पातळीच्या खाली आहे. शहरात सध्या कोणत्याही ठिकाणी पाणी भरलेले नाही. अतीवृष्टीमुळे येथील विद्युत् पुरवठा बंद करण्यात आला होता तो आता पूर्ववत् चालू करण्यात आला आहे. १९ जुलै या दिवशी मौजे कान्हे येथे घराजवळ दरड कोसळल्याने ३ कुटुंबातील १६ व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आलेले आहे.

पूरस्थितीविषयी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील १५ गावांमधील ५४० जणांना स्थलांतरित केले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सर्वेक्षणानुसार सूचित केलेल्या दरड प्रवण गावांत जावून तालुकास्तरीय यंत्रणेने नागरिकांना स्थलांतरित करा. येथील पुराचे पाणीही ओसरले आहे. तेथील स्वच्छता करण्यात आली आहे. जीवितहानी कोणतीही नाही. जनावरे आणि अन्य हानीच्या पंचनाम्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यानुसार हानीभरपाई दिली जाईल.

खेड – येथील जगबुडी नदीला आलेला पूरही आता ओसरला आहे. जिल्ह्यात सर्वांत अधिक १८९ मि.मी. पावसाची नोंद खेडमध्ये झाली आहे. पूरग्रस्त भागात नगर परिषदेकडून स्वच्छता केली जात आहे. व्यापार्‍यांनीही त्यांच्या दुकानातील चिखल काढण्याचे कामही चालू केले आहे.