पाकमध्ये जोपर्यंत धर्मांधांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे चालूच रहातील !

पाकिस्तानमधील मानवाधिकार संघटनेच्या हिंदु नेत्याने व्यक्त केली चिंता !

कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानमधील सिंध प्रांतात हिंदूंच्या मंदिरांवर होत असलेल्या आक्रमणांवरून तेथील ‘पाकिस्तान देरावर इत्तेहाद’ या मानवाधिकार संघटनेचे प्रमुख शिव काछी यानी सिंध सरकारकडे चिंता व्यक्त करत मंदिरांवर आक्रमण करणार्‍यांना शिक्षा करण्याची मागणी केली आहे. ‘जोपर्यंत धर्मांधांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत हिंदूंच्या मंदिरांवर अशी आक्रमणे चालूच रहातील’, असे त्यांनी म्हटले आहे.

शिव काछी पुढे म्हणाले की, सिंधमधील हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणे सिंधमध्ये पाकिस्तानी हिंदूंच्या अग्नीपरीक्षेचा प्रारंभ आहे, असे वाटते. नदी खोर्‍याच्या भागांत लपून दरोडेखोरी करणारे प्रतिदिन व्हिडिओ प्रसारित करतात. त्यात ते पाकिस्तानी महिला सीमा हैदर ही हिंदु तरुणाशी विवाह करण्यासाठी भारतात पळून गेल्याचा सूड हिंदूंना ठार मारून, त्यांचे अपहरण करून, हिंदु महिलांवर बलात्कार करून, तसेच मंदिरांची तोडफोड करून उगवत आहेत. सीमाने जे काही केले, ते चुकीचे आहे; मात्र त्याच्याशी येथील हिंदूंचा काय संबंध आहे ? ती एक मुसलमान महिला असून तिने जे काही केले तो तिचा व्यक्तीगत निर्णय होता. सिंधमध्ये हिंदूंच्या महिलांवरील अत्याचार, हिंदूंचे धर्मांतर आदी घटनांविषयी  सिंध सरकारकडे काही मासांपासून आम्ही सातत्याने तक्रारी करत आहोत.