ऐतिहासिक पांडववाडा (जळगाव) येथील अनधिकृत मदरसा आणि नमाजपठण प्रशासनाकडून बंद !

  • पांडववाडा प्रशासनाच्या कह्यात !

  • कलम १४४ लागू !

  • आदेश रहित करण्यासाठी याचिका प्रविष्ट

जळगाव – जिल्ह्यातील एरंडोल येथील ऐतिहासिक पांडववाड्यातील अनधिकृत मदरसा आणि तेथील नमाजपठणावर बंदी घातल्याचा अंतरिम आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिला आहे. या आदेशाच्या विरोधात मशीद प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेत जिल्हाधिकार्‍यांचा आदेश रहित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी १८ जुलै २०२३ या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी जुम्मा मशीद विश्‍वस्तांना पांडववाड्याच्या चाव्या जिल्हा अधिकार्‍यांकडे देण्यास सांगितले. त्यांच्या आदेशात प्रतिदिन दोनच व्यक्तींना नमाज पढण्याची अनुमती देण्यात आली आहे. दोनपेक्षा अधिक लोकांना येथे नमाज पढण्यापासून रोखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या अंतर्गत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

१. ‘पांडववाडा संघर्ष समिती’चे म्हणणे आहे की, स्थानिक मुसलमानांनी अतिक्रमण केले असून ते तेथे नमाजपठण करत आहेत.

२. जुम्मा मशीद कमिटीने केलेले हे अतिक्रमण हटवण्याची मागणी हिंदु संघटनांनी केली आहे.

३. तहसीलदार म्हणाले, ‘‘हिंदू वर्ष १९८० पासून या परिसरावर दावा करत आहेत. हा परिसर महाभारतातील पांडवांशी संबंधित असल्याचे ते सांगतात; कारण त्यांनी या भागात काही वर्षे घालवली होती. पांडववाडा संघर्ष समितीने १८ मे २०२३ या दिवशी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार अर्ज दिला होता.’’

पांडववाडा संघर्ष समितीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

पांडववाडा संघर्ष समितीच्या वतीने जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, प्रत्यक्षात हे एक प्राचीन हिंदु ठिकाण आहे. येथे असलेली प्राचीन रचना मंदिराची आहे. महाभारत काळातील कलाकृती आजही येथे सापडतील.

(म्हणे) ‘ही तर वक्फ नोंदणीकृत मालमत्ता !’

महाराष्ट्र वक्फ बोर्डाचा धूर्त डाव !

महाराष्ट्र वक्फ बोर्डाने सांगितले, ‘ही वर्ष २००९ पासून राज्य वक्फ बोर्डाच्या अंतर्गत नोंदणीकृत मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोईन तहसीलदार यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून ‘ही वक्फ नोंदणीकृत मालमत्ता आहे. त्यामुळे निर्बंध लादण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही’, असे सांगितले आहे.’’

पांडववाड्यातील अनधिकृत मदरसा आणि सामूहिक नमाज पठण बंद ! – प्रसाद दंडवते, एरंडोल, पांडववाडा संघर्ष समिती

धर्मांधांनी येथील पांडववाड्यावर अनधिकृत नियंत्रण मिळवून अतिक्रमण केले. याविषयी मी १८ मे २०१८ या दिवशी तक्रार प्रविष्ट केली होती. त्यावर आतापर्यंत अनेक सुनावण्या झाल्या. ११ जुलै २०२३ या दिवशी झालेल्या सुनावणीत ‘जुम्मा मशीद ट्रस्टचा पांडववाड्याशी कोणताही संबंध नाही’, हे मी सिद्ध करून दिले; कारण मशीद ट्रस्टने धर्मादाय आयुक्त कार्यालयात दिलेले भूमीचे दस्तऐवज आणि पांडववाड्याच्या भूमीची कागदपत्रे पूर्णतः वेगळी आहेत. जुम्मा मशीद ट्रस्टने ज्या भूमीची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयात केलेली आहे, तिचा गट नंबर ४७७/४७८/४७९ असा आहे आणि पांडववाडा भूमीचा गट क्रमांक ११०० आहे. या दोन्ही गट क्रमांकांमध्ये ४ किलोमीटरचे अंतर आहे. तेथे दोन मदरसे चालू होते. ‘तेही अनधिकृत असून ते तात्काळ बंद करावेत, तेथील नमाजपठण बंद करण्यात यावे’, अशा मागण्या त्यात केलेल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी अनधिकृत मदरसे आणि सामूहिक नमाजपठण बंद केले. ‘पांडववाड्यात केलेले अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश द्यावेत’, अशीही माझी मागणी आहे.

पुढील सुनावणी १८ जुलैला होणार ! – अमन मित्तल, जिल्हाधिकारी, जळगाव

या प्रकरणी ३ वेळा सुनावणी झाली आहे. दोन्ही बाजू समजून घेतल्या आहेत. पुढील सुनावणी १८ जुलैला आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करू.