… तर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाऊ शकते ! – श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

मुंबई, १४ जुलै (वार्ता.) – कोणता पक्ष ‘शिवसेना’ याविषयी ३१ जुलै या दिवशी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी यावर निर्णय झाला नाही, तर या निवडणुकींसाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांना प्रतिकात्मक पक्षाचे नाव अन् चिन्ह द्यावे लागेल. त्या वेळी ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह गोठवले जाऊ शकते, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

‘सर्वाेच्च न्यायालयाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला म्हणजे न्यायालयाने ‘शिवसेना’ हे नाव एकनाथ शिंदे यांना दिले, तर न्यायालयाचा हा निकाल ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षासाठी अजित पवार यांनाही लागू पडू शकतो. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालावरून पुढील धोरण निश्चित होईल’, असे या वेळी श्रीकांत देशपांडे म्हणाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘शिवसेना’ पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला ठाकरे गटाकडून सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यावर ३१ जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे.