यंदा श्रावण मास हा अधिक मास म्हणून आला आहे आणि याच श्रावण मासापासून साधनेला पूरक अशा पवित्र चातुर्मासाचा प्रारंभही होत आहे. मुळात श्रावण मास हाच पवित्र मास असतो; कारण हा मास देवाधिदेव शिवाशी संबंधित मास आहे. त्याचप्रमाणे अधिक मासाच्या रूपातील पुरुषोत्तम मासाला भगवान श्रीहरि विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे. यामुळे अधिक मासाच्या रूपाने या वेळी श्रावण मास विशेषतः ‘हरि’ (श्रीविष्णु) आणि ‘हर’ (शिव) या दोन्हींशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रात महादेव शंकर यांना ग्रहाध्यक्ष अर्थात् ग्रहांचा स्वामी मानले गेले आहे. त्यामुळे ग्रहशांतीसाठी या वेळी असलेला अधिक श्रावण मास विशेष उपयोगी आहे.
व्यावहारिक दृष्टीने कर्मे २ प्रकारची असतात. १. ‘पौष्टिक कर्म’ अर्थात् संसारिक व्यवहाराच्या संदर्भातील कर्म आणि २. ‘शांती कर्म’ अर्थात् पारलौकिक अथवा धार्मिक-आध्यात्मिक कर्म ! अधिकमासात ‘शांती कर्म’ अर्थात् पारलौकिक अथवा धार्मिक-आध्यात्मिक कर्म उदा. व्रत, उपवास, जप, ध्यान, पूजा, निष्काम यज्ञ अधिक आणि तत्परतेने केली पाहिजेत, तर ‘पौष्टिक कर्म’ अर्थात् संसारिक व्यवहाराशी संबंधित कर्म उदा. विवाह, गृहप्रवेश, उपनयन आदी मंगल कार्ये करू नयेत.