प्रत्येक मासात सूर्य एकेका राशीत संक्रमण करतो; परंतु अधिक मासात सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करीत नाही. म्हणजेच अधिक मासात सूर्य संक्रात नसते. त्यामुळे चंद्र आणि सूर्य यांच्या गतीत फरक पडतो आणि वातावरणातही ग्रहणकालाप्रमाणे पालट होतात. ‘या पालटत्या अनिष्ट वातावरणाचा आपल्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये; म्हणून या मासात व्रते आणि पुण्यकारक कृत्ये करावीत’, असे शास्त्रकारांनी सांगितले आहे.
संकलक : सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद), कुडाळ, सिंधुदुर्ग.
अधिक मासात वाढदिवस आल्यास काय करावे ?
एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या मासात झाला असेल, तोच मास अधिक मास आल्यास त्या व्यक्तीचा वाढदिवस निज मासात करावा, उदा. वर्ष २०२२ मध्ये श्रावण मासात जन्मलेल्या बालकाचा वाढदिवस या वर्षी श्रावण मास अधिक असल्याने अधिक मासात न करता निज श्रावण मासात त्या तिथीला करावा.
या वर्षी अधिक श्रावण मासात ज्या बालकाचा जन्म होईल, त्या बालकाचा वाढदिवस प्रतिवर्षी श्रावण मासात त्या तिथीला करावा.
अधिकमास असता श्राद्ध केव्हा करावे ?
‘ज्या मासात व्यक्तीचे निधन झाले असेल, त्याचे वर्षश्राद्ध तोच मास पुढील वर्षी अधिक मास येतो, तेव्हा प्रथम वर्षश्राद्ध त्या अधिक मासातच करावे, उदा. शके १९४४ च्या (वर्ष २०२२) श्रावण मासात व्यक्तीचे निधन झाले असेल, त्या व्यक्तीचे प्रथम वर्षश्राद्ध शके १९४५ च्या (या वर्षी) अधिक श्रावण मासात त्या तिथीला करावे. केवळ याच वर्षी असे करावे; कारण वर्ष २०२२ च्या श्रावण मासात निधन झालेल्या व्यक्तीचे वर्षश्राद्ध, म्हणजे १२ मास या वर्षी अधिक मासात पूर्ण होतात. ज्या वेळी अधिक मास नसेल, तेव्हा वर्षश्राद्ध त्या तिथीला करावे.
अ. शके १९४४ च्या श्रावण मासात मृत्यू झाला असेल, तर त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध शके १९४५ च्या अधिक श्रावण मासात त्या तिथीला करावे.
आ. प्रतिवर्षीचे श्रावण मासातील प्रतिसांवत्सरिक श्राद्ध या वर्षी निज श्रावण मासात करावे; मात्र पूर्वीच्या अधिक श्रावण मासात मृत्यू झालेल्यांचे प्रतिसांवत्सरीक श्राद्ध या वर्षी अधिक श्रावण मासात करावे.
इ. याशिवाय गेल्या वर्षी (शके १९४४ मध्ये) भाद्रपद, आश्विन इत्यादी मासांत मृत्यू झालेल्यांचे प्रथम वर्षश्राद्ध त्या त्या मासातील त्यांच्या तिथीसच करावे. १३ मास होतात; म्हणून १ मास आधी करू नये.
ई. यावर्षी अधिक श्रावण किंवा निज श्रावण मासात मृत्यू झाल्यास त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध पुढील वर्षी श्रावण मासात त्या तिथीला करावे.
(संदर्भ : धर्मसिंधु – मलमास निर्णय, वर्जावर्ज्य कर्मे विभाग)’ (संदर्भ : दाते पंचांग)
अधिक मासात करावयाची व्रते आणि पुण्यकारक कृत्ये
अ. अधिक मासात श्री पुरुषोत्तमप्रीत्यर्थ १ मास उपोषण, आयाचित भोजन (अकस्मात् एखाद्याच्या घरी भोजनासाठी जाणे), नक्त भोजन (दिवसा न जेवता केवळ रात्री पहिल्या प्रहरात एकदाच जेवणे) करावे अथवा एकभुक्त रहावे (दिवसभरात एकदाच जेवण) करावे. अशक्त व्यक्तीने या ४ प्रकारांपैकी एक प्रकार निदान ३ दिवस अथवा एक दिवस तरी आचरणात आणावा.
आ. प्रतिदिन एकच वेळ भोजन करावे. जेवतांना बोलू नये. त्यामुळे आत्मबळ वाढते. मौन भोजन केल्याने पापक्षालन होते.
इ. तीर्थस्नान करावे. किमान एक दिवस गंगास्नान केल्यास सर्व पापांची निवृत्ती होते.
ई. ‘या संपूर्ण मासात दान करणे शक्य नसेल, त्याने शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावास्या या तिथींना अन् व्यतिपात, वैधृति या योगांवर विशेष दानधर्म करावा’, असे शास्त्रात सांगितले आहे.
उ. या मासात प्रतिदिन श्री पुरुषोत्तम कृष्णाची पूजा आणि नामजप करावा. अखंड अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करावा.
ऊ. दीपदान करावे. देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते.
ए. तीर्थयात्रा करावी. देवदर्शन करावे.
ऐ. तांबूलदान (विडा-दक्षिणा यांचे दान) करावे. एक मास तांबूलदान दिल्यास सौभाग्यप्राप्ती होते.
ओ. गोपूजन करावे. गोग्रास घालावा.
औ. अपूपदान (अनारशांचे दान) करावे.
– सौ. प्राजक्ता जोशी, सिंधुदुर्ग.
अधिक मासात कोणती कामे करावीत ?
या मासात नित्य आणि नैमित्तिक कर्मे करावीत. जी केल्यावाचून गती नाही, अशी कर्मे करावीत. अधिक मासात सतत नामस्मरण केल्यास श्री पुरुषोत्तम कृष्ण प्रसन्न होतो.
अ. ज्वरशांती, पर्जन्येष्टी इत्यादी नेहमीची काम्य कर्मे करावीत.
आ. या मासात देवाची पुनःप्रतिष्ठा करता येते.
इ. ग्रहणश्राद्ध, जातकर्म, नामकर्म, अन्नप्राशन आदी संस्कार करावेत.
ई. मन्वादि आणि युगादि संबंधित श्राद्धादी कृत्ये करावीत. तीर्थश्राद्ध, दर्शश्राद्ध आणि नित्यश्राद्ध करावे.
उ. नारायण-नागबली, त्रिपिंडी या सारखी कर्मे गंगा, गोदावरी, गयातीर्थ क्षेत्री करता येतील.
अधिकमासात कोणती कामे करू नयेत ?
अधिक मासात सगळी सकाम कर्मे आणि व्रते वर्ज्य आहेत.
अ. नेहमीच्या काम्य कर्मांच्या व्यतिरिक्त अन्य काम्य कर्मांचा आरंभ आणि समाप्ती करू नये.
आ. महादाने (पुष्कळ मोठी दाने), अपूर्व देवदर्शन (पूर्वी कधी न गेलेल्या ठिकाणी देवदर्शनाला जाणे), गृहारंभ, वास्तुशांती, संन्यासग्रहण, नूतनव्रत ग्रहणदीक्षा, विवाह, नवविवाहितेचा गृहप्रवेश, उपनयन, चौल, बारसे, देवप्रतिष्ठा, नवे दागिने घालणे आदी करू नये.
इ. घरबांधणी, विहीर खोदणे, तलाव आणि उद्यान यांची निर्मिती करू नये.