शिवरायांनी नष्‍ट केलेल्‍या वतनदार्‍या शरद पवार यांनी पुन्‍हा चालू केल्‍या ! – सदाभाऊ खोत, अध्‍यक्ष, रयत शिक्षण संस्‍था

सदाभाऊ खोत व शरद पवार

मुंबई – वर्ष १९७८ मध्‍ये शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले आणि त्‍यानंतर महाराष्‍ट्राच्‍या राजकारणाला जातीपाती अन् घराणेशाही यांचे वळण मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रस्‍थापितांच्‍या वतनदार्‍या नष्‍ट केल्‍या होत्‍या. त्‍या निर्माण होण्‍याचा प्रारंभ शरद पवार यांच्‍यामुळे झाला, अशी टीका रयत शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्‍यावर केली.

दोन दिवसांपूर्वी सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांचा उल्लेख ‘सैतान’ असा केला होता. यावरून राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाच्‍या पदाधिकार्‍यांनी सदाभाऊ खोत यांच्‍यावर टीका केली. या टीकेला उत्तर देतांना सदाभाऊ खोत यांनी स्‍वत:च्‍या वक्‍तव्‍याचे समर्थन केले. या वेळी सदाभाऊ खोत म्‍हणाले, ‘‘मी गावगाड्याची भाषा बोललो. त्‍याचा शुद्ध उच्‍चार काय असावा ? हे कळण्‍याइतकी शाळा मी शिकलो नाही; पण मी हे का बोललो, यामागची भूमिका जाणून घ्‍यावी लागेल. शरद पवार यांच्‍या राजकारणाचे परिणाम आमचा गावगाडा भोगत आहे. शरद पवार यांनी शेतकर्‍याला समवेत न घेता त्‍याचे शेत लुटण्‍याचे काम केले. शरद पवार यांनी केवळ काटे-कुटे पेरले. आता त्‍यांवरून चालण्‍याची वेळ शरद पवार यांवर आली आहे. त्‍यामुळे त्‍यांचे पाय रक्‍तबंबाळ झाले आहेत. मी खरे बोललो; म्‍हणून अनेकांच्‍या नाकाला मिरच्‍या झोंबल्‍या. तुम्‍ही त्‍यांच्‍या पत्रावळीवर पंगतीला बसला असाल; परंतु आम्‍ही आमच्‍या बापाचे खातो.’’