देशातील ६७.२ टक्के मुसलमान महिला समान नागरी संहितेसाठी अनुकूल ! – सर्वेक्षण

मुसलमान महिलांनी केले समान नागरी कायद्याचे समर्थन

नवी देहली – समान नागरी संहितेविषयी सध्या देशभरात चर्चा चालू असतांना एका इंग्रजी वृत्तवाहिनीने याविषयी केलेल्या सर्वेक्षणात बहुतांश मुसलमान महिला कायद्याच्या बाजूने असल्याचे समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार ६७.२ टक्के मुसलमान महिलांनी या विवाह, तलाक आणि दत्तक घेणे, यांसारख्या सूत्रांसंदर्भात समान नागरी कायद्याचे समर्थन केले आहे.

१. या सर्वेक्षणात देशातील २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश येथील ८ सहस्र ३५ मुसलमान महिलांच्या माहितीचा समावेश आहे.

२. याउलट २५.४ टक्के महिलांनी समान नागरी संहितेला विरोध दर्शवला, तर ७.४ टक्के मुसलमान महिलांनी यासंदर्भात ‘माहिती नाही’ अथवा ‘सांगता येत नाही’ अशा प्रकारची उत्तरे दिली.

३. शैक्षणिक योग्यतेच्या आधारावर विचार करता सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पदवीधर महिलांपैकी ६८.४ टक्के, म्हणजे २ सहस्र ७६ महिलांनी कायद्याचे समर्थन केले, तर २७ टक्के पदवीधर महिलांनी विरोध दर्शवला.

४. वयोगट विचारात घेता, १८ ते ४४ वर्षे वयोगटातील ६९.४ टक्के मुसलमान महिलांनी कायद्याला त्यांचे समर्थन असल्याचे सांगितले, तर याच वयोगटातील २४.२ टक्के महिलांनी कायद्याला त्यांची नापसंती असल्याचे नमूद केले.