ट्विटरवर पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान दिसत आहे भारताचा भाग !

नवी देहली – पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेला गिलगिट-बाल्टिस्तान हा भाग ट्विटरकडून भारतामध्ये दाखवण्यात आला आहे. येथील नागरिकांनी जेव्हा पाक सरकारचे अधिकृत ट्विटर खाते पहाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते प्रतिबंधित  करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. गिलगिट-बाल्टिस्तानला भारताच्या  काश्मीरमध्ये दाखवण्यात आल्याचेही त्यांच्या लक्षात आले; कारण ज्या वेळी या नागरिकांनी ट्वीट केले, तेव्हा त्यांना ते भारतीय असल्याचे दाखवण्यात आले. त्यांचे ठिकाण (लोकेशन) काश्मीरमध्ये दाखवण्यात आले.

१. या नागरिकांनी पाक सरकारच्या खात्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ‘भारताकडून या खात्यांना प्रतिबंधित करण्यात आले आहे’, असा संदेश येत होता. मार्च २०२३ पासून भारताने ही खाती प्रतिबंधित केली आहेत. या नागरिकांना भारताच्या काश्मीरमध्ये दाखवण्यात आल्याने त्यांना वरील संदेश येऊ लागला होता.

२. येथील नागरिकांनी ट्वीट करतांना ते आता कुठे आहेत ?, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना ‘जम्मू-काश्मीर’ असे दिसले होते. या प्रकरणाविषयी पाककडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.