‘आजकालच्या काळात दूरचित्रवाहिन्यांचा (टीव्ही चॅनेलवाल्यांचा) जो सुळसुळाट झाला आहे, त्यावरून असे लक्षात येते की, सध्या कुठेच बातम्या नसतात, तर केवळ तमाशेच चालू असतात. एक विषय घ्यायचा आणि त्यावर चर्चेची गुर्हाळे चालवायची. दोन्ही विरुद्ध पक्षकारांना स्टुडिओमध्ये बोलवायचे आणि दोघांमध्ये भांडणे लावून द्यायची. मग थोडे मध्ये मध्ये ‘रॉकेल’ ओतायला वृत्तनिवेदक (न्यूज अँकर) बसलेलेच असतात. कधी कधी जेव्हा कायद्याचे विषय चर्चिले जातात, तेव्हा कुठे जरा तज्ञ मंडळी येतात आणि मग दर्शकांना थोडी ज्ञानवृद्धी होते. मा. ज्येष्ठ अधिवक्ता उज्वल निकम यांना दूरचित्रवाहिन्यांवर ऐकायला पुष्कळ बरे वाटते, पुष्कळ ज्ञान मिळते. मुळात विषय अधिकृत (ऑथेंटीक) आणि बोलणारे सक्षम (काँपिटन्ट) असल्यामुळे विषयाची सखोल माहिती मिळते. सध्या ‘धर्मांतरविरोधी कायदा’ या विषयावर कायदा ठाऊक नसलेले अनेक जण बोलत असतात; परंतु कायदे पंडित जेव्हा बोलतात, तेव्हा हे सर्व वाचाळवीर बोलायचे बंद होतात.
१. विविध देशांच्या राज्यघटनेने धर्म स्वीकारलेला असून भारताने सर्वधर्मसमभाव स्वीकारणे
भारतातील अनेक राज्यांमध्ये वेगवेगळी सरकारे आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार कायदे कुणी करायचे आणि कुणी करायचे नाहीत, याचे स्पष्ट संकेत आहेत. ‘सेंट्रल लिस्ट’ (केंद्रीय सूची), ‘स्टेट लिस्ट’ (राज्य सूची) आणि ‘कॉनकरंट लिस्ट’ (समवर्ती सूची – यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार या दोघांनी विचारात घेण्याच्या सूचीचा समावेश होतो), अशी वर्गवारी केलेली आहे. आपल्या देशाची घटना अस्तित्वात आली वर्ष १९५० मध्ये. त्यानंतर घटना दुरुस्ती करून वर्ष १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यात ‘सेक्युलर’ या शब्दाची पेरणी केली. ‘सेक्युलर’ याचा सरधोपट अर्थ म्हणजे ‘सर्वधर्मसमभाव’; परंतु प्रत्यक्षात असा समभाव कधीच राखला गेला नाही. भारतात प्रामुख्याने हिंदु, त्याच्या खालोखाल मुसलमान, मग ख्रिस्ती, जैन, शीख, बौद्ध असे लोकसंख्येच्या विवरणावरून धर्म नांदतात. असे खरे तर सर्वच देशांमध्ये नांदतात; परंतु प्रत्येक देशाचा धर्म त्यांच्या राज्यघटनेनुसार वेगवेगळा आहे. त्यामुळे धर्माच्या आधारावर त्यांचे काही कायद्याचे ठोकताळे आहेत. युरोप, अमेरिका येथे ‘ख्रिस्ती धर्म’ हा अधिकृत मानलेला आहे. ‘मध्य पूर्व’मध्ये ‘इस्लाम’ धर्म तेथील देशांनी स्वीकारलेला आहे. सर्वांत मोठी लोकशाही असलेला आपला भारत ‘सर्वधर्मसमभाव’ या प्रकारात मोडतो. चीनमध्ये ‘निधर्मी’वादी ‘कम्युनिझम’ (साम्यवाद) आहे.
भारताच्या राज्यघटनेत कलम २५ नुसार प्रत्येक भारतियाला त्याचा धर्म पाळायचा, स्वखुशीनेे दुसरा धर्म स्वीकारायचा, निधर्मी बनायचा, शांततेने धर्माचरण करण्याचा पूर्ण अधिकार दिलेला आहे. यात ‘प्रोपॅगेट’ या शब्दाने जरासा समजुतीमध्ये घोटाळा झालेला आहे. ‘प्रोपॅगेट म्हणजे प्रसार, प्रचार करणे.’ त्यामुळे एखाद्याला आपल्या धर्माचा दुसर्या कुणाकडे प्रचार आणि प्रसार करायचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. इस्लाममध्ये ‘शरीयत’नुसार वैयक्तिक कायद्याचे पालन होते, तर हिंदु धर्मात ‘हिंदु कोड बिल’नुसार वैयक्तिक कायदे पाळले जातात. आपल्या राज्यघटनेनुसार एखादा भारतीय स्वेच्छेने, कुणाच्याही दबावाविना धर्मांतर करू शकतो, कुणीही कोणताही धर्म स्वीकारू शकतो. ‘स्वेच्छेने’ हा शब्द अतिशय महत्त्वाचा असून यावर अनेक उच्च न्यायालयांनी एकमत केलेले आहे की, स्वेच्छेने आणि दबावाविना हे बघणे अत्यंत आवश्यक आहे.
२. धर्मांतराचे प्रकार आणि ते कसे करावे ? याविषयीची माहिती
धर्मांतर २ प्रकारे करता येते.
अ. कायदेशीर पद्धत
आ. वेगवेगळ्या पद्धती आणि रितीरिवाजानुसार
कायदेशीर पद्धत म्हणजे भारतातील कोणताही नागरिक जो १८ वर्षांपेक्षा अधिक वयाचा आणि सज्ञान अवस्थेत आहे, तो त्याला पाहिजे त्या धर्मात कायदेशीर प्रवेश करू शकतो. त्यासाठी त्याला स्वतःचे एक ‘अॅफिडेव्हिट’ (सत्यप्रतिज्ञापत्र) करायचे असते, ज्यात तो कोणता धर्म स्वीकारत आहे ? तसेच त्याचे नवीन नाव काय असेल ? आणि ‘तो ते स्वखुशीने करत आहे’, असे स्टँप पेपरवर लिहून नोटरी करून घ्यावे. त्यानंतर जिल्ह्यातील ‘गॅझेट’ ऑफिसमध्ये (शासकीय राजपत्र कार्यालयात) जाऊन कमीत कमी ६० दिवस आधी नोटीस देणे आवश्यक असते. त्यानंतर प्रमुख वर्तमानपत्रात ज्यांचा खप (वितरण) चांगला आहे, त्यामध्ये ती नोटीस ‘विज्ञापन’ म्हणून द्यावी लागते. समवेत आधार कार्ड, छायाचित्र (फोटो) आणि त्याचे शुल्क द्यावे लागते. मग तो कायदेशीर धर्म पालटू शकतो.
मा. सर्वोच्च न्यायालयाने अशी टिपणी केलेली आहे, ‘एखाद्याला धर्म पालटता येतो; पण जात पालटता येत नाही.’ त्याची जात दुसर्या धर्मातही तीच रहाते, म्हणजे आधीच्या धर्मात अनुसूचित जमाती (ST)/ अनुसूचित जात (SC) असेल, तर नवीन धर्मातही तो अनुसूचित जमाती/अनुसूचित जात यातील समजला जाईल. यामुळे शासकीय नोकर्यांतील आरक्षण आणि बढती प्रक्रियेमध्ये धर्म पालटानंतर गुंतागुंतीची प्रकरणे वाढू लागली.
२ अ. धर्मानुसार करण्यात येणारे धर्मांतर आणि त्याची माहिती : दुसरा प्रकार हा धार्मिक प्रकारात धर्मांतर करता येते.
२ अ १. हिंदु धर्म : हिंदूंच्या अनेक मंदिरांमध्ये याविषयी सोय नाही; परंतु पुष्कळ करून विश्व हिंदु परिषदेच्या माध्यमातून हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करण्यासाठी एखाद्याला जे काही सोपस्कार वा संस्कार करायचे असतील, तर ते करून प्रवेश घेता येतो. उत्तर भारतात काही मंदिरांमध्ये सुद्धा संस्कार करून हिंदु धर्मात प्रवेश दिला जातो.
२ अ २. मुसलमान धर्म : यांच्या मशिदीमध्ये मौलवींना (इस्लामचे धार्मिक नेते) नियुक्त करून ही सोय केलेली असते. धर्मांतर करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला ते आयते (कुराणात एकूण ११४ भाग आहेत. त्याला ‘सुरा’ असे म्हणतात. त्यात एकूण ६ सहस्र २३६ आयते (वाक्ये) आहेत.) आणि नमाज वगैरे गोष्टी सांगतात अन् मुसलमान धर्माची बंधने वगैरे जी काही असतील ते सांगतात अन् त्यानंतर एका प्रक्रियेनंतर स्वतःच्या धर्मात घेतात, तसेच नाव पालटतात.
२ अ ३. ख्रिस्ती धर्म : चर्चमध्ये ‘बाप्तिस्मा’ करून धर्मप्रवेश करतात. तेथील पाद्री त्यांच्या धर्माची शिकवण सांगून काही सोपस्कार करतात आणि धर्मात प्रवेश देतात.
२ अ ४. शीख : शिखांमध्ये त्यांच्या गुरुद्वारामध्ये अशीच सोय असते. तिथे विधी करून कट्यार, कृपण अशा गोष्टी दिल्या जातात.
३. शासकीय पद्धतीने धर्मांतर करणे महत्त्वाचे !
‘जबरदस्ती (बळजोरीने) आणि सक्तीने धर्मांतर’, या प्रकाराला येथे कुठेच थारा दिला जात नाही. एखादा व्यक्ती लग्न करण्यासाठी स्वखुशीने धर्म पालटू शकतो; पण त्याचा जर दुरुपयोग होणार असेल, तर ते धर्मांतर निषिद्ध मानले जाते. एखाद्याला ‘धर्मवापसी’ (घरवापसी) करावयाची असल्यास शासकीय पद्धतीने ती करता येते. सध्या ‘लव्ह जिहाद’ची अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत. ती खरी कि खोटी ? हे त्या त्या प्रकरणावर अवलंबून आहे. ‘स्वच्छेने आणि कायदेशीर प्रक्रियेने धर्मपरिवर्तन केल्यास किंवा घरवापसी केल्यास फारसे घोटाळे होत नाहीत’, अशी टिपणी अनेक न्यायालयांनी केलेली आहे.’ (३.७.२०२३)
– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.