जोरदार पावसामुळे हिमाचल प्रदेशात १४ ठिकाणी भूस्‍खलन, ५ जण मृत्युमुखी !

  • १३ ठिकाणी पाण्‍याचा लोंढा आल्‍याच्‍या घटना

  • राज्‍यातील ७३६ रस्‍ते बंद !

हिमाचल प्रदेशात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

शिमला (हिमाचल प्रदेश) – राज्‍यात होत असलेल्‍या जोरदार पावसामुळे गेल्‍या ३६ घंट्यांत १४ ठिकाणी भूस्‍खलन झाले असून १३ ठिकाणी पाण्‍याचा लोंढा आल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. यामुळे ५ जणांचा मृत्‍यू झाला असून अनेक जण घायाळ झाले आहेत. राज्‍यातील ७३६ रस्‍ते बंद करण्‍यात आले आहेत. रावि, बिआस, सतलज, स्‍वान आणि चिनाब या राज्‍यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वहात आहेत. या परिस्‍थितीमुळे सामान्‍य जीवन विस्‍कळीत झाले आहे. राज्‍यात ‘रेड अलर्ट’ घोषित करण्‍यात आला असून पुढील दोन दिवसांसाठी शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्‍याचा आदेश सरकारने दिला आहे.

( सौजन्य : Ritam English )

मनाली येथील दुकाने वाहून गेली, तर किन्‍नौर, चंबा आणि कुल्लू येथे पाण्‍याच्‍या लोंढ्यामध्‍ये वाहने वाहून गेल्‍याचे व्‍हिडिओ समोर आले आहेत. शिमला जिल्‍ह्यातील कोटगड क्षेत्रात भूस्‍खलनामुळे एक घर कोसळले असून यामध्‍ये एकाच कुटुंबातील तिघे ठार झाले. गेल्‍या २४ घंट्यांत बिलासपूर येथील नंगल धरण क्षेत्रात २८२.५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून उना १६६.२, चंबा १४६.५, कांगडा १०८, तर राजधानी शिमला येथे ७९.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.