नाशिक येथे एफ्.डी.ए.च्‍या पडताळणीत आढळलेले ३ सहस्र २० लिटर भेसळयुक्‍त दूध नष्‍ट !


नाशिक
– नाशिक शहरासह जिल्‍ह्यातून मुंबई येथे दूध घेऊन जाणार्‍या टँकरची अन्‍न आणि औषध प्रशासन विभाग, जिल्‍हा दुग्‍धव्‍यवसाय विभाग अन् अन्‍न चाचणी प्रयोगशाळा यांच्‍या संयुक्‍त पथकाने अचानक पडताळणी केली. यात संगमनेर तालुक्‍यातील एका आस्‍थापनाच्‍या वाहनात भेसळयुक्‍त दूध आढळल्‍याने टँकरमधील दुधाचे नमुने घेऊन ३ सहस्र २० लिटर दूध जागेवर नष्‍ट केले. नाशिकसह जळगाव, धुळे, नगर आदी जिल्‍ह्यांतून मुंबई येथे दूध वितरित केले जाते. नाशिक शहरात येणारे आणि जिल्‍ह्यातून मुंबई येथे वितरित होणारे दूध भेसळ पडताळणीसाठी अन्‍न आणि औषध प्रशासन विभाग, जिल्‍हा दुग्‍धव्‍यवसाय विभाग अन् अन्‍न चाचणी प्रयोगशाळा यांच्‍या संयुक्‍त पथकाने सिन्‍नर-घोटी महामार्गावर संयुक्‍त पडताळणी मोहीम राबवली.

या मोहिमेत एकूण ४ वाहनांतील ६६ सहस्र ७६३ लिटर दुधाच्‍या साठ्याची पडताळणी करण्‍यात आली. त्‍यातील एका वाहनात प्रथमदर्शनी दुधात भेसळ केल्‍याचे उघड झाले. टँकरमधील दुधाचा नमुना विश्‍लेषणासाठी घेऊन उर्वरीत १ लाख १३ सहस्र २५० रुपये किमतीचा ३ सहस्र २० लिटर साठा नाशवंत असल्‍याने जनआरोग्‍याच्‍या हिताच्‍या दृष्‍टीने जागेवरच नष्‍ट करण्‍यात आला. या मोहिमेत ४ अन्‍न नमुने विश्‍लेषणासाठी घेण्‍यात आलेले असून अहवाल प्राप्‍त होताच अन्‍नसुरक्षा आणि मानके कायदा २००६ अन्‍वये पुढील कारवाई घेण्‍यात येणार आहे, असे सहआयुक्‍त संजय नारागुडे यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

भेसळयुक्‍त दुधाचा पुरवठा करून जनतेचे आरोग्‍य धोक्‍यात आणणार्‍या आस्‍थापनाचा परवाना रहित करायला हवा ! तसेच आस्‍थापनाच्‍या मालकासह आतापर्यंत भेसळयुक्‍त दुधाची पडताळणी न करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवरही कठोर कारवाई करायला हवी !