आवश्यकता भासल्यास अबकारी घोटाळ्याचे अन्वेषण दक्षात खात्याकडे सोपवणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पेडणे, ४ जुलै (वार्ता.) – आवश्यकता भासल्यास अबकारी खात्याच्या घोटाळ्याचे अन्वेषण दक्षता खाते करणार आहे, तसेच पुढेही आवश्यकता भासल्यास हा घोटाळा भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे सोपवला जाणार आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विशेष पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना ही माहिती दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘या घोटाळ्याची खात्याअंतर्गत चौकशी केल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील सूत्रधार तथा खात्यातील अव्वल कारकून हरिश नाईक याच्यासह अबकारी निरीक्षक दुर्गेश नाईक आणि विभूती शेट्ये यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. याखेरीज संबंधितांकडून मूळ रक्कम १८ लाख रुपये आणि व्याज म्हणून १० लाख रुपये मिळून एकूण २८ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. या प्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.’’

 (सौजन्य: Prudent Media Goa)

अबकारी खात्याच्या पेडणे विभागात मद्यविक्री अनुज्ञप्ती (लायसन्स) आणि अनुज्ञप्ती नूतनीकरण यांना अनुसरून संशयित अव्वल कारकून हरिश नाईक अन् इतर यांनी संबंधित व्यावसायिकांकडून पैसे घेऊन ते पैसे अबकारी खात्यात जमा केले नाहीत. मद्यविक्री व्यावसायिकांना अबकारी खात्याने अनुज्ञप्ती नूतनीकरण न झाल्याने नोटीस पाठवल्याने हा घोटाळा उघडकीस आला. यानंतर सरकारने दोषींवर कारवाई करून त्यांच्याकहून रक्कम वसूल करून घेतली. हा घोटाळा २ कोटी रुपयांच्या घरात असून संबंधितांच्या विरोधात फौजदारी गुन्हा प्रविष्ट न केल्याने विरोधक सरकारवर टीका करत आहेत.