शिक्षणाचा दर्जा ढासळल्‍याने आता शिक्षकांचीच ३० आणि ३१ जुलैला परीक्षा !

प्रतिकात्मक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्‍याचा आरोप होत असतांना मराठवाड्याचे विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्‍या विषयांवर सर्वेक्षण करत शिक्षकांची परीक्षा घेण्‍याचा निर्णय घेतला होता. ज्‍यात प्रशासनाकडून मराठवाड्यातील ८ जिल्‍ह्यांत शिक्षकांची परीक्षा घेण्‍याविषयी ठरले होते, तर आता या परीक्षा ३० आणि ३१ जुलै या दिवशी होणार आहे. त्‍यामुळे प्रथमच थेट शिक्षकांची परीक्षा होणार असल्‍याने याकडे पालकांसह विद्यार्थ्‍यांचे लक्ष लागले आहे. (जिल्‍हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि माध्‍यमिक शिक्षणाधिकारी, तसेच मुख्‍य कार्यकारी अधिकारी जिल्‍ह्यांतील शाळांची स्‍थिती आणि त्‍यांची अवस्‍था पहात नाहीत का ? खरेतर याच अधिकार्‍यांनी शाळांचे सर्वेक्षण करून अकार्यक्षम शिक्षकांविषयीचा अहवाल सिद्ध करून तो शासनाला पाठवणे आवश्‍यक होते. शाळांच्‍या स्‍थितीकडे दुर्लक्ष करणार्‍या अशा अधिकार्‍यांवर प्रथम कारवाई व्‍हायला हवी ! – संपादक)  

शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्‍याचा आरोप होत असतांना केंद्रेकर यांनी याची गंभीर नोंद घेतली होती. त्‍यामुळे त्‍यांनी मराठवाड्यातील ८ जिल्‍ह्यांत प्रथम सर्वेक्षण केले. ज्‍यात प्रत्‍यक्षात शाळेत जाऊन मुलांच्‍या गुणवत्तेची पहाणी करण्‍यात आली. या पहाणीत अनेक ठिकाणी पुष्‍कळ वाईट परिस्‍थिती असल्‍याचे समोर आले होते. लातूर जिल्‍ह्यात जेव्‍हा सर्वेक्षण करण्‍यात आले, त्‍या वेळी इयत्ता ८ वीच्‍या ४५ टक्‍के मुलांना भागाकार करता येत नव्‍हता.

लातूर जिल्‍ह्याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल पुष्‍कळ चांगले काम करतात; मात्र त्‍यांच्‍या जिल्‍ह्यात अशी परिस्‍थिती असेल, तर इतर जिल्‍ह्यांतही असणारच, असे केंद्रेकर यांनी यापूर्वी म्‍हटले होते. विशेष म्‍हणजे मराठवाड्यातील ८ जिल्‍ह्यांत वेगवेगळ्‍या विषयांवर सर्वेक्षण करण्‍यात आले, तेव्‍हा सर्वच ठिकाणी अशीच परिस्‍थिती असल्‍याचे जाणवले आहे, असे केंद्रेकर यांनी सांगितले होते. त्‍यामुळे थेट शिक्षकांचीच परीक्षा घेण्‍याचा निर्णय केंद्रेकर यांनी घेतला होता.

संपादकीय भूमिका

शिक्षणाचा दर्जा घसरल्यामुळे शिक्षकांची परीक्षा घ्यावी लागणे, हे मॅकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीचे फलीत !