पशूवधगृहातील जनावरांची आरोग्य पडताळणी न केल्यास विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांची आंदोलन करण्याची चेतावणी !

पशूवधगृहातील जनावरांची आरोग्य पडताळणी करणे आणि नोंद ठेवणे बंधनकारक !

मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना निवेदन देतांना दुर्गावाहिनीच्या जिल्हा संयोजिका सपनाताई थेटे आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांचे कार्यकर्ते

 अहिल्यानगर – श्रीरामपूर नगर परिषदेने जनतेच्या कररूपी पैशांतून, लाखो रुपये व्यय करून अधिकृत ‘मटन मार्केट’ उभारले होते. त्यात शासन नियमानुसार कत्तलीसाठी वापरणार्‍या जनावरांची नोंद ठेवली जायची. जनावरांची शारीरिक पडताळणी केल्यानंतरच त्यांची विक्री केली जात होती; मात्र १० ते १५ वर्षांपासून ‘मटन मार्केट’ बंद करून उघड्यावर जनावरांची कत्तल करून त्यांची कोणतीच नोंद श्रीरामपूर नगर परिषद आरोग्य विभागात होत नव्हती. तसेच जनावरांची आरोग्य पडताळणी न करताच कत्तल केली जात आहे. त्यामुळे ते जनावर निरोगी आहे कि रोगट आहे ? हे निष्पन्न होत नाही. रोगट जनावरांचीही कत्तल झाल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यासाठी शासन नियमानुसार श्रीरामपूर नगर परिषद आरोग्य विभागाने पशूवधगृहातील जनावरांची आरोग्य पडताळणी आणि नोंद ठेवणे बंधनकारक आहे.

आरोग्य विभागाने पशूवधगृहातील जनावरांची आरोग्य पडताळणी न केल्यास आंदोलन छेडण्याची चेतावणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, तसेच दुर्गावाहिनीच्या जिल्हा संयोजिका सपनाताई थेटे यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना निवेदनाद्वारे दिली आहे. (अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक)

श्रीरामपूर नगरपालिकेत नमाज पढतांना आवक-जावक लिपिक  

नगरपालिकेत निवेदनाची पोच घेण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी गेले असता, आवक-जावक नोंद ठेवणारी मुसलमान महिला कर्मचारी नमाज पढत होती. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्‍यांना १५ ते २० मिनिटे उभे रहावे लागले.  (कार्यालयीन वेळेत असे कसे चालू शकते ? हे प्रशासनाने स्पष्ट करून लोकांना ताटकळत रहावे लागल्याने संबंधित कर्मचार्‍याची चौकशी करणे आवश्यक आहे. – संपादक)