फ्रान्समधील दंगलींसाठी व्हिडिओ गेम्स, ‘टिकटॉक’ आणि ‘स्नॅपचॅट’ उत्तरदायी ! – इमॅन्युएल मॅक्रॉन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (वर्तुळात)

पॅरिस – फ्रान्समध्ये गेल्या ४ दिवसांपासू ठिकठिकाणी दंगली चालू आहेत. या पार्श्‍वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या दंगलीसाठी व्हिडिओ गेम्ससह ‘टिकटॉक’ आणि ‘स्नॅपचॅट’ या सामाजिक माध्यमांनाही उत्तरदायी ठरवले आहे. देशात चालू असलेल्या दंगलींवर चर्चा करण्यासाठी आयोजित एका सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या सामाजिक माध्यमांच्या मालकांनी यांवरील चिथावणीखोर मजकूर हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

फ्रान्समध्ये एका १७ वर्षीय मुलावर पोलिसांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर ठिकठिकाणी दंगली उसळल्या होत्या. या मुलाने पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पोलिसांनी केला होता.

दंगलखोरांमध्ये मुलांचा समावेश !

या दंगली रोखण्यासाठी ४० सहस्र सैनिक तैनात करण्यात आले असून एका रात्रीत ८७५ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुलांचा समावेश असून यांतील बहुतांश मुले ही १४-१५ वर्षांची आहेत. या पार्श्‍वभूमीवर मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘पालकांनी त्यांच्या मुलांना घरीच सुरक्षित ठेवावे. देशात शांतता प्रस्थापित करणे, हे मोठे आव्हान असून त्यासाठी मुलांना हिंसेपासून दूर ठेवावे’, असे आवाहनही मॅक्रॉन यांनी केले आहे.

मुले प्रत्यक्ष आयुष्यातही रस्त्यावर व्हिडिओ गेम्समध्ये दाखवल्याप्रमाणे दंगली घडवून आणतात !

मॅक्रॉन पुढे म्हणाले की, ज्या मुलांना व्हिडिओ गेम्सचे व्यसन आहे, ते प्रत्यक्ष आयुष्यातही रस्त्यावर व्हिडिओ गेम्समध्ये दाखवल्याप्रमाणे दंगली घडवून आणतात. मॅक्रॉन यांनी ‘टिकटॉक’ आणि ‘स्नॅपचॅट’ या सामाजिक माध्यमांना दंगली घडवणार्‍या व्यक्तींची ओळख समोर आणण्याची विनंती केली आहे.

संपादकीय भूमिका

व्हिडिओ गेम्स आणि सामाजिक माध्यमे यांचा मुलांवर कशा प्रकारे नकारात्मक परिणाम होऊ शकतो, याचे हे उदाहरण होय. हे लक्षात घेऊन पालकांनी वेळीच सावध होऊन मुलांना त्यापासून दूर ठेवावे !