जागतिक आरोग्य संघटना कृत्रिमरित्या बनवण्यात येणार्‍या गोड पदार्थांना ‘कर्करोगकारक’ घोषित करणार !

शीतपेय, ऊर्जापेय, ‘च्युईंग गम’ यांवर परिणाम होणार !

लंडन (ब्रिटन) – जागतिक आरोग्य संघटना पुढील मासामध्ये कृत्रिमरित्या बनवण्यात येणार्‍या गोड पदार्थांना (नॉन सॅक्राईड स्वीटनर) ‘कर्करोगकारक’ घोषित करणार आहे. या निर्णयाचा सर्वप्रकारची शीतपेय, ऊर्जापेय, ‘च्युईंग गम’ यांवर परिणाम होणार आहे. येत्या १४ जुलैला याविषयी घोषणा होणार आहे.

१. जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ (आय.ए.आर्.सी.) या संस्थेने यापूर्वी वजन नियंत्रण करण्यासाठी ‘नॉन शुगर स्वीटनर’चा वापर न करण्याचा सल्ला खाद्यपदार्थ बनवणार्‍या आस्थापनांना दिला होता. त्यास विरोध झाला होता. त्यामुळे आता कृत्रिमरित्या बनवण्यात येणार्‍या गोड पदार्थांविषयी निर्णय घेतल्यास विरोध होण्याची शक्यता आहे.

२. आय.ए.आर्.सी. संस्थेने म्हटले आहे की, कृत्रिम गोड पदार्थांना कर्करोगकारक पदार्थ घोषित करण्याचा भ्रम निर्माण करणे, हा उद्देश नाही, तर यावर अधिक संशोधन करण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा उद्देश आहे.

३. या संदर्भात फ्रान्समध्ये गेल्या वर्षी १ लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातून लक्षात आले होते की, जे कृत्रिमरित्या बनवलेले गोड पदार्थांचे सेवन करतात त्यांना कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.

संपादकीय भूमिका

भारतात विदेशी शीतपेयांची मोठ्या प्रमाणात होणारी विक्री पहाता संबंधित विदेशी आस्थापने जागतिक आरोग्य संघटनेवर दबाव आणून त्यांना ही घोषणा करू देणार नाहीत. हे ओळखून भारत सरकारने स्वतःहूनच अशा पदार्थांच्या विक्रीवर देशात तात्काळ बंदी घातली पाहिजे !