छत्रपती संभाजीनगर येथील १ सहस्र ५६८ कारखान्‍यांतील विषारी पाणी थेट नाल्‍यांत !

केवळ २२४ उद्योगांचे पाणी येते प्रक्रिया प्रकल्‍पात !

प्रतिकात्मक चित्र

छत्रपती संभाजीनगर – वाळूज औद्योगिक परिसरात ३० एकर जागेवर ४३ कोटी रुपये व्‍यय करून वर्ष २००९ मध्‍ये १० एम्.एल्.डी. क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्‍प उभारण्‍यात आला. उद्योगांकडून सध्‍या २४.२४ रुपये प्रतिक्‍युबिक मीटर दरानुसार शुल्‍क आकारणी केली जाते; परंतु मागील

१४ वर्षांत केवळ २२४ उद्योगांचेच दूषित पाणी या प्‍लांटमध्‍ये आले. उर्वरित १ सहस्र ५६८ कारखान्‍यांतून निघणारे रसायनयुक्‍त पाणी चक्‍क नाल्‍यात सोडले जात असल्‍याचे आढळून आले आहे. यामुळे भूमीतील जलस्रोत दूषित होत आहेत. याकडे महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्‍याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. (जलस्रोत दूषित होण्‍याची ही कारणे तथाकथित पर्यावरणवादी, केवळ हिंदूंच्‍याच सणाला प्रदूषण होते असा कांगावा करणारे तथाकथित सुधारणावादी यांना लक्षात येत नाहीत का ? – संपादक)

कारखान्‍यांतून निघणारे दूषित पाणी ‘क्‍यू’ सेक्‍टरमधील प्रकल्‍पात येऊन त्‍याचे शुद्धीकरण केले जाते. हे पाणी आस्‍थापनांतील झाडांसाठी वापरले जाते, तर उर्वरित पाणी खाम नदीपात्रात सोडले जाते. प्रकल्‍पाकडे येणार्‍या पाण्‍यामध्‍ये २ प्रकारचे पाणी असते. त्‍यात जलवाहिनीद्वारे येणार्‍या पाण्‍याव्‍यतिरिक्‍त कारखान्‍यांतून निघणारे रसायनयुक्‍त पाणी टँकरने त्‍या-त्‍या परिसरात एम्.आय.डी.सी. प्रशासनाकडून उभारलेल्‍या टाक्‍यांमध्‍ये जमा करून पुढे प्रकल्‍पाकडे घेऊन जाण्‍याची व्‍यवस्‍था आहे. त्‍यासाठी जोगेश्‍वरी, रांजणगाव शिवार, तसेच ‘के-सेक्‍टर’मध्‍ये टाक्‍या बसवल्‍या आहेत; मात्र बहुतांश प्‍लेटिंग, इतर लघु आणि सूक्ष्म लघु कारखान्‍यांतून निघणारे पाणी थेट टँकरच्‍या साहाय्‍याने नाल्‍यांमध्‍ये सोडले जाते.

‘एम्.आय.डी.सी.’ने साठवण टाक्‍या बसवल्‍या !

 ‘एम्.आय.डी.सी.’ने परिसरात जलवाहिनी करून साठवण टाक्‍या बसवल्‍या आहेत. याशिवाय कारखान्‍यांतील पाणी प्रकल्‍पाकडेच दिले पाहिजे यासाठी प्रबोधनही केले जाते. – गणेश मुळीकर, अभियंता, एम्.आय.डी.सी.

(म्‍हणे), ‘दूषित पाण्‍याची माहिती द्या, कारवाई करू !’

अशा प्रकारे कोणत्‍याही कारखान्‍यांकडून उघड्यावर रसायनमिश्रित पाणी सोडले जात असेल, तर त्‍याची माहिती आम्‍हाला द्यावी. तसे आमच्‍या निदर्शनास आले, तर त्‍यांच्‍यावर नक्‍कीच कारवाई करण्‍यात येईल. – सुशील राठोड, अधिकारी, महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ