माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि साहाय्‍यक पोलीस निरीक्षक राहुल राऊत यांना ५ दिवस पोलीस कोठडी !

माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि साहाय्‍यक पोलीस निरीक्षक राहुल राऊत

कोल्‍हापूर – गडहिंग्‍लज येथील ‘अर्जुन उद्योग समुहा’चे प्रमुख संतोष शिंदे यांना खोट्या गुन्‍ह्यात अडकवून १ कोटी रुपयांची खंडणी मागून त्‍यांना आत्‍महत्‍या करण्‍यास भाग पाडणार्‍या माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि साहाय्‍यक पोलीस निरीक्षक राहुल राऊत यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्‍यात आली आहे. या दोघांवर गुन्‍हा नोंद झाल्‍यावर हे दोघेही पसार झाले होते. या दोघांना कोल्‍हापूर पोलिसांनी सोलापूर येथून कह्यात घेतले आणि न्‍यायालयात उपस्‍थित केले. आत्‍महत्‍या करण्‍याच्‍या पूर्वी संतोष शिंदे यांनी लिहिलेल्‍या चिठ्ठीत पुण्‍यातील अन्‍य दोघांचीही नावे असून पोलीस या प्रकरणाचे अधिक अन्‍वेषण करत आहेत.

या प्रकरणातील अन्‍य घडामोडी

१. गडहिंग्‍लज येथील सर्वपक्षीय नेत्‍यांनी २६ जून या दिवशी कोल्‍हापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांची कोल्‍हापूर येथील शासकीय विश्रामधाम येथे भेट घेतली. राहुल राऊत यांच्‍या संदर्भात यापूर्वीही अशाच प्रकारच्‍या तक्रारी आल्‍या आहेत त्‍यामुळे राहुल राऊत यांना सेवेतून कायमस्‍वरूपी बडतर्फ करावे, या प्रकरणी विशेष सरकारी अधिवक्‍ता नियुक्‍त केला जावा, अशा मागण्‍या शिष्‍टमंडळाने केसरकर यांच्‍याकडे केल्‍या. या प्रकरणी मुख्‍यमंत्र्यांशी बोलण्‍याचे आश्‍वासन दीपक केसरकर यांनी शिष्‍टमंडळास दिले.

२. संशयितांना न्‍यायालयात उपस्‍थित केल्‍याचे समजताच नागरिकांचा मोठा जमाव न्‍यायालयाच्‍या आवारात आला. संशयितांचे वकीलपत्र घेण्‍यासाठी आलेल्‍या अधिवक्‍त्‍यांसमोर ‘त्‍यांनी वकीलपत्र घेऊ नये’; म्‍हणून घोषणा करण्‍यात आली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये; म्‍हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला होता.