कोल्हापूर, २६ जून (वार्ता.) – विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती ५ पट वाढवली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात मोठ्या शिक्षक भरतीसाठी आमच्या सरकारने मान्यता दिलेली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे या भरतीसाठी स्थगिती आहे; मात्र त्यावर आम्ही पर्यायी उपाययोजना काढत आहोत. आमची बांधलकी ही विद्यार्थ्यांसमवेत असल्याने यापुढील काळात शाळांमधील शिक्षणाचा दर्जा कसा असेल, याकडे आमचे लक्ष असणार आहे. विद्यार्थ्यांना जे शिकवण्यात येते ते त्यांना ग्रहण होते का, तसेच अन्य गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी भविष्यात प्रत्येक शाळेत आणि परिसरात ‘सीसीटीव्ही’ बसवण्यात येतील, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात सुमारे ३० हजार शिक्षकांची भरती होणार आहे. आज मराठा समाज व आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाच्या विद्यार्थी शिष्टमंडळाने याबाबत भेट घेतली. बिंदूनामावली व रोस्टर इत्यादी मुद्यांवर शिष्टमंडळासमवेत चर्चा झाली. शिल्लक राखीव जागा तत्काळ भराव्यात, अशी मागणी या वेळी शिष्टमंडळाने केली. pic.twitter.com/J6HWhCJ5F4
— Deepak Kesarkar (@dvkesarkar) June 23, 2023
१. यापुढील काळात स्थानांतराचा कोणताही त्रास शिक्षकांना होणार नाही. पहिल्या टप्प्यात आम्ही ३० सहस्र शिक्षक भरती करणार असून पुढील टप्प्यात २० सहस्र शिक्षकांची भरती करणार आहोत. या शिक्षकांनी पुढील काळात त्या त्या शाळांचे दायित्व घ्यावे आणि शाळा आदर्श होण्यासाठी प्रयत्न करावेत.
२. सर्व शाळांमध्ये एकच गणवेश देण्यामागे विद्यार्थ्यांना शिस्त लागावी हाच उद्देश आहे. काही शाळांमध्ये गणेवश अद्याप न मिळाल्याचे समोर आले आहे; मात्र गणवेश देण्याचे काम त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर असलेल्या शिक्षण समित्या करतात. काही शाळांनी अगोदर एक गणवेश खरेदी केला होता; त्यामुळे त्यांना मुभा देण्यात आली होती. एक गणवेश घेण्यासाठी शाळांना शासन निधी पुरवणार आहे. पुढील एक-दीड मासात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्वांना गणवेश मिळेल.
३. विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिकाधिक सुलभ होण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. ग्रंथपालांचे मानधन वाढवण्यात आले आहे. आता विद्यार्थ्यांना शाळेत जातांना केवळ एकच पुस्तक घेऊन शाळेत जावे लागते.