हिंदु धर्म आणि हिंदूंच्या देवता यांचा अवमान करणारे चित्रपट समाज नाकारत आहे, हे निर्मात्यांनी लक्षात घ्यावे !
मुंबई – प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांचे चित्रण चित्रपटातील ‘अभिनेता-अभिनेत्री’ यांप्रमाणे दाखवण्यात आले आहे, तर मारुतिरायांच्या तोंडी आक्षेपार्ह वक्तव्य दाखवण्यात आले आहे. या कारणास्तव समाजातून या चित्रपटातील संवाद आणि एकंदर चित्रपटाची निर्मिती यांविषयी मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त केला होता. त्याचा परिणाम म्हणून या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. ६०० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करून सिद्ध करण्यात आलेल्या या चित्रपटाला ९ दिवसांत निम्मा गल्लाही जमवता आलेला नाही.
300 करोड़ का आंकड़ा छूने में हांफ रही ‘आदिपुरुष’#Adipurush #AdipurushBoxOfficeDay10 #Adipurushcollection #KritiSanon #Prabhas #Saifalikhanhttps://t.co/DD7nhprdqM
— Amar Ujala (@AmarUjalaNews) June 25, 2023
१६ जून या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी भारतात ८६ कोटी ७५ लाख रुपये इतकी कमाई केलेल्या या चित्रपटाच्या मिळकतीला दुसर्या दिवसापासूनच उतरती कळा आली. या चित्रपटाची चौथ्या दिवसाची देशभरातील मिळकत १६ कोटी रुपयांपर्यंत घसरली. चित्रपटाचा ‘ट्रिझर’ (चित्रपटाचा संक्षिप्त भाग) प्रसिद्ध झाल्यावर चित्रपटामध्ये हनुमानाची वेशभूषा मुसलमानाप्रमाणे, तसेच रावणाला मोगल आक्रमकाप्रमाणे दाखवण्यात आल्याविषयी सामाजिक माध्यमांवरून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर प्रदर्शनापूर्वी ‘तेरे ही भरोसे हैं हम, तेरे ही सहारे, दुविधा की घड़ी में ये मन तुझको ही पुकारे। तेरे ही बल से है बल हमारा। तू ही करेगा मंगल हमारा। मंत्रों से बढकर है तेरा नाम& जय श्रीराम, जय श्रीराम’ या गाण्यावरून चित्रपटाचे ‘प्रमोशन’ करण्यात आले. हे गाणे समाजाच्या पसंतीस उतरले. गाण्याला प्रसिद्धी मिळूनही चित्रपटाकडे मात्र प्रेक्षकवर्गाने पाठ फिरवली. ओम राऊत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होऊनही मागील ९ दिवसांत भारतभरात या चित्रपटाचा गल्ला जमतेम ३०० कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे. ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून या चित्रपटाच्या निर्मात्यांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. हिंदुत्वनिष्ठांच्या मागणीनंतर या चित्रपटातील काही आक्षेपार्ह संवाद वगळण्यात आले आहेत; मात्र त्यानंतरही प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यापर्यंत चित्रपटगृहात हा चित्रपट रहाणार नाही, अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.