विद्यार्थ्यांचे एस्.एस्.सी. बोर्डातून सी.बी.एस्.ई. बोर्डात बळजोरीने स्थलांतर !

  • नवी मुंबईतील ज्ञानपुष्पा शाळेला इंग्रजीचा पुळका !

  • पालकांचे शाळा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन

नवी मुंबई – येथील सीबीडी बेलापूरच्या ज्ञानपुष्पा शाळेने विद्यार्थी किंवा पालक यांना कोणतीही पूर्वसूचना न देता बळजोरीने एस्.एस्.सी. बोर्डातून (राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातून) सी.बी.एस्.ई. बोर्डात (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात) विद्यार्थ्यांना स्थलांतरीत केले. त्यामुळे पालकांनी शाळेच्या प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले. या आंदोलनाला मनसे विद्यार्थी सेनेने पाठिंबा दिला आहे. शाळेतील मराठी माध्यम बंद करून शाळा पूर्णतः सीबीएस्ई बोर्डाची करण्याचा शाळा प्रशासनाचा डाव आहे. मराठी माध्यमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मराठी माध्यम चालू ठेवण्यासाठी शाळेबाहेर आंदोलन केले.

‘ज्ञानपुष्प विद्यालय प्रशासनाकडून मराठी माध्यमात प्रवेश न देता सीबीएस्ई माध्यमात प्रवेश घ्या’, असा तगादाही विद्यार्थ्यांकडे लावला जात आहे. शाळेच्या प्रशासनाने त्यांचा निर्णय मागे न घेतल्यास मनसे विद्यार्थी सेनेकडून अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी मनसेचे उपशहर अध्यक्ष योगेश शेटे यांनी दिली.

संपादकीय भूमिका 

सरकार मराठी वाचवण्यासाठी प्रयत्नरत असतांना, सरकारच्या अनुदानावर चालणारे मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा डाव रचत आहेत. अशांची मान्यता रहित का करू नये ?