पोलिसांनी शिकवल्‍यानुसार पंच नितीन जाधव साक्ष देत आहेत ! – अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्‍यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

कॉ. गोविंद पानसरे हत्‍या प्रकरणातील पंचाच्‍या साक्षीला आरोपीच्‍या अधिवक्‍त्‍यांचा जोरदार आक्षेप !

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

कोल्‍हापूर, २० जून (वार्ता.) – कॉ. गोविंद पानसरे यांच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणाची सुनावणी जिल्‍हा आणि सत्र न्‍यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्‍यासमोर चालू आहे. या प्रकरणी २० जून या दिवशी संशयित आरोपीच्‍या अधिवक्‍त्‍यांनी समीर गायकवाड यांच्‍या अटकेचा पंचनामा करणारे पंच नितीन जाधव यांची उलट तपासणी घेतली. त्‍या वेळी पंच नितीन जाधव यांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना उत्तर न देता वेळकाढूपणा करत होते, तसेच एकाच प्रश्‍नाची वेगवेगळी उत्तरे देत होते. त्‍यामुळे आरोपीचे अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्‍ता समीर पटवर्धन आणि अधिवक्‍ता अनिल रुईकर यांनी साक्षीदाराच्‍या साक्षीविषयी आक्षेप घेतला.

‘पोलिसांच्‍या दबावाखाली आहेत का ?, तसेच प्रश्‍न पूर्ण होण्‍याअगोदरच जाधव माहिती देत आहेत. याचा अर्थ ते स्‍वत:हून नव्‍हे, तर पोलिसांनी सांगितल्‍यानुसार माहिती देत आहेत’, असेही त्‍यांनी न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून दिले. अधिवक्‍ता रुईकर यांनी साक्षीदाराचा उलट तपास घेत असतांना पंचनाम्‍यातील फोलपणा न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून दिला. सरकारी पक्षाच्‍या वतीने अधिवक्‍ता शिवाजीराव राणे यांनी काम पाहिले. संशयितांच्‍या वतीने अधिवक्‍ता अनिल रुईकर, अधिवक्‍ता समीर पटवर्धन, अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्‍त्‍या प्रीती पाटील, अधिवक्‍ता प्रवीण करोशी आणि अधिवक्‍ता डी.एम्. लटके यांनी काम पाहिले.