रत्नागिरी, २० जून (वार्ता.) – येथील शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर नसल्याने सामान्य माणसांची गैरसोय होत आहे. या समस्येवर उपाययोजना काढण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी यांनी आमदार डॉ. राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांची भेट घेतली. या वेळी आमदार राजन साळवी यांच्या समवेत रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा शासकीय रुग्णालयात बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, भूलतज्ञ, तसेच अस्थिरोगतज्ञ उपलब्ध नाहीत. त्यामुळे या समस्येवर तात्काळ उपाययोजना काढावी, अशी मागणी आमदार डॉ. राजन साळवी यांनी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांच्याकडे केली. या वेळी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी शासकीय जिल्हा रुग्णालयातील समस्या दूर करण्याच्या दृष्टीने सचिव, आरोग्य विभाग, मंत्रालय यांच्याशी चर्चा करून उचित यंत्रणेच्या माध्यमातून तातडीने कार्यवाही करण्याचे मान्य केले. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले उपस्थित होत्या.